नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (MIDC Police Station) हद्दीत अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एका संशयितास (Suspected) पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून १५ हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा पिस्टल (गावठी कट्टा) आणि दोन राउंड, असा एकूण १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.२२) पोलीस अंमलदार प्रशांत नागरे व स्वप्निल जुंद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली. एक व्यक्ती पहाटे सातच्या सुमारास अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. रात्रगस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे व गुन्हेशोध पथकातील अंमलदारांनी महानगरपालिका जलशुद्धीकरण केंद्रासमोरील मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या रस्त्यावर सापळा रचला. पहाटे सुमारे ६.५० वाजता विल्होळी गावाच्या दिशेने दोन व्यक्ती पायी येताना दिसले.
पोलिसांना पाहताच त्यातील एक जण डोंगराच्या दिशेने पळून गेला, तर दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचा पिस्टल आणि दोन राउंड आढळून आले. त्याचे नाव विनोद पुंजा जाधव (रा. गोंदे, जाधव वस्ती, वाडीवऱ्हे, नाशिक) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील करीत आहेत. फरार झालेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.
दरम्यान, ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप शेवाळे, उपनिरीक्षक राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार सुभाष जाधव, तुकाराम शेळके, अविनाश चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार जनार्दन ढाकणे, स्वप्निल जुंद्रे, श्रीहरी बिराजदार, किरण सोनवणे, प्रशांत नागरे, जितेश शिंदे, योगेश्वर जाधव, संदीप खैरणार, अर्जुन कांदळकर, विजय सोनवणे आणि आवेज शेख यांनी केली.




