Friday, May 3, 2024
Homeनगरनेत्रदान चळवळीतून 1 हजार 270 दृष्टीहीनांना मिळाली नवदृष्टी

नेत्रदान चळवळीतून 1 हजार 270 दृष्टीहीनांना मिळाली नवदृष्टी

अहमदनगर (प्रतिनिधी) – करोनाच्या भितीने माणुस माणसापासून दुरावत असताना, फिनिक्स सोशल फाऊंडेशनने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेऊन समाजातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, महिला, मजूर, कामगार व आर्थिक दुर्बलघटकांना आधार दिला. तर नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून तब्बल 1 हजार 270 दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली.

‘अंधांना दृष्टी, पाहतील तेही सृष्टी’ या उक्तीनुसार नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील एका छोट्याश्या गावातून फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही नेत्रदान चळवळ उदयास आली. जलसंपदा विभागात कार्य करीत असताना जालिंदर बोरुडे या अवलियाने नेत्रदान चळवळीत उत्तुंग शिखरा एवढे कार्य उभे केले. तर गरजूंसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे कार्य सुरु आहे. या चळवळीच्या माध्यमातून महिन्यांला पाच वेळा जिल्ह्यातील विविध ठिकाणी नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर घेतले जात आहे. करोना सारख्या महामारीत देखील दृष्टीदोष असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाचे नियम पाळून शिबीर घेण्यात आले.

- Advertisement -

आतापर्यंत 1 लाख 93 हजार रुग्णांची मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आली. नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानाने मरणोत्तर नेत्रदानातून 1270 दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेत, सामाजिक बांधिलकीतून 1991 मध्ये फिनिक्स फाऊंडेशनची स्थापना बोरुडे व त्यांच्या सहकार्‍यांनी केली.

सुरुवातीला असं काही ठरलेल नव्हत की, नेत्रदान चळवळती कार्य करायचे मात्र, शहरातील विडी कामगार, बांधकाम कामगार, हमाल, कष्टकरी, शेतकरी, मजूर, महिला, गरीब वंचितघटकांसाठी काहीतरी केले पाहिजे. यासाठी त्यांनी नेत्रदान चळवळ हाती घेतली. गेल्या 28 वर्षांपासून नेत्रदान चळवळ, उपक्रम सुरु आहे. तसेच रक्तदान शिबीर महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने समाजात विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या कर्तृत्वान महिला पुरुषांना जीवन गौरव पुरस्कार दरवर्षी दिला जातो.

………………

बोरूडे यांना नागरदेवळ्याचे गौरव बोरुडे, सौरभ बोरुडे, राजू बोरुडे, वैभव दाणवे, आकाश धाडगे, बाबासाहेब धिवर आदी फिनिक्स फाऊंडेशनच्या सदस्यांचे सहकार्य लाभत असते. जिल्ह्यातील नव्हे तर सोलापूर, नंदुरबार, धुळे, वैजापूर आदी ठिकाणांचे गरजू रुग्ण शिबीराचा लाभ घेत असून नेत्रदान चळवळीचा भाग बनत आहे.

…………….

- Advertisment -

ताज्या बातम्या