Saturday, June 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : बात निकली है, तो….

पडसाद : बात निकली है, तो….

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

देवळाली गाव, विहितगाव आणि नाशिकरोड अशा तीन परिसरात अक्राळविक्राळ पद्धतीने पसरलेल्या सोमवारच्या आठवडे बाजारासंदर्भात झेरॉक्स नगरसेवकाकडून घडलेल्या एका प्रकरणाचा गुरुवारी याच सदरात धांडोळा घेतल्यानंतर असंख्य लोकांनी या विषयाचे अनेक कंगोरे पुढे आणले. स्थानिक काही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तर अतिशय तावातावाने यासंदर्भात चर्चा चालू आहे. संबंधित नगरसेवकाला दोष दिला जातोय हे ठीक, मुळात या विषयाच्या मुळाशीही जात अनेक जण काही चांगल्या सूचनाही करीत आहेत.

हा विषय सार्वजनिक असल्याने त्याच्याशी संबंधित समस्त लोकांचा विचार व्हावा, अशी एक रास्त सूचना आहे. लोकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्यांनीच जर एकांगी भूमिका घेतली तर इतरांनी कुणाकडे पाहावयाचे, असा प्रश्न पडतो. महापालिका या सर्वच विक्रेत्यांकडून व्यवसायाच्या पावत्या फाडत असल्याने मुळात ही जबाबदारी त्यांची आहे. नगरसेवकांनी खरे तर पालिकेच्या अधिकार्‍यांना तेथे पाचारण करून हा विषय ‘याचि देही याचि डोळा’ दाखवायला हवा. गोरगरीब व्यावसायिकांचा माल लाथाडण्यापेक्षा त्यांना पर्यायी जागा देता येईल का, स्थानिक रहिवाशांची अडचण कशी दूर होईल, हॉस्पिटल्स, इतर आस्थापने यांची कोंडी कशी दूर होईल, नियमाप्रमाणे पार्किंगची व्यवस्था किती जणांनी केली आहे, कोणी नियम धाब्यावर बसविले, अशा काही मुद्यांचा विचार व्हावा.

एवढेच नव्हे तर पालिकेच्या जबाबदार्‍या व कर्तव्याचीही यानिमित्ताने चर्चा व्हावी. केवळ हाच बाजार लक्ष्य न करता नाशिकरोड-जेलरोड-रेल्वे स्टेशन अशा सर्वच परिसरातील भाजीबाजार व इतर विक्रेत्यांच्या अतिक्रमणाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. दुर्दैवाने संबंधित अधिकारी असा विचार न करता सोयीसोयीने निर्णय घेतात. मुक्तिधाम तसेच गायकवाड मळा हे दोन रस्ते व त्यावरील राजरोस अतिक्रमण कोणाच्या आशीर्वादाने चालले आहे, याचाही एकदा सोक्षमोक्ष लागायला हवा. मुक्तिधाम मंदिराच्या भिंतीला खेटून व समोरच्या बाजूला तसेच प्रेसच्या भिंतीला लागून असलेल्या टपर्‍या या कायदेशीर आहेत की अतिक्रमण, याचा फैसला तर व्हायला हवाच शिवाय वाढता वाढता वाढे असे मारुतीच्या शेपटाप्रमाणे वाढत चाललेल्या अतिक्रमित टपर्‍या कोणत्या लोकप्रतिनिधींच्या आहेत, बेकायदा व्यावसायिकांकडून दररोज कोण पैसे गोळा करतो, अतिक्रमण अधिकारी अमित पवार यांची यात काय भूमिका आहे, अशा सगळ्यांचीच चर्चा व्हावी.

‘आपला तो बाळ्या अन् दुसर्‍याचे ते कार्टे’ असे करून चालणार नाही. मुक्तिधामसमोरील पदपथामुळे अपघात होऊन गेल्या वर्षी तीन जणांचे बळी गेले तेव्हा याच अमित पवार यांची दुसर्‍या विभागात बदली झाली. पण अवघ्या काही दिवसांत हे महाशय पुन्हा त्याच जागी स्थानापन्न झाले. हे कोणाच्या आशीर्वादाने झाले हे सर्वश्रुत आहे. काही टपर्‍यांमध्ये तर अधिकार्‍यांचीच भागीदारी असल्याचे सर्रास बोलले जाते. पालिका अधिकारी डोळे झाकून काम करतात की काय, हे कळायला मार्ग नाही. प्रश्न केवळ रस्तोरस्ती वाढत चाललेल्या व्यावसायिकांच्या अतिक्रमणाचा नाही, तर अशांवर योग्य वेळी कारवाई न करता त्यांच्याकडून चिरीमिरी घेऊन त्यांना या जागा आंदण देणार्‍या खंडणीखोरांचे काय करणार हादेखील आहे.

ज्या भाजीबाजारावरून हा विषय पुढे आला, त्या समस्येत येत असलेला आर्टिलरी सेंटर रस्ता व त्यावरील रस्ते दुभाजक आणि तेथील आसपासचे अतिक्रमण याकडेही कधी पाहणार आहोत की नाही? संरक्षण दलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा रस्ता जेमतेम साठ मीटर असताना त्यावर दुभाजक टाकून तो आणखी अरूंद केला गेला. आसपासच्या इमारतींमधील व्यावसायिकांकडे येणारी वाहने आधीच रस्ता व्यापत होतीच. आता या दुभाजकांमुळे एक गाडीही मोठ्या मुश्किलीने जा-ये करू शकते. अशा ठिकाणी कोणतेही काम करताना साधे सामान्यज्ञानही कोणी वापरू नये याचे आश्चर्य वाटते. हा असाच बिनडोकपणा अनेक ठिकाणी केला आहे, केला जात आहे. कोणातरी नगरसेवकाच्या वा त्याचे कर्तेकरविते असलेल्या अधिकार्‍यांच्या मनात येते आणि काही दिवसांतच एखादे बांधकाम, रस्ता, दुभाजक वगैरे उभे राहते. अशा कामांची गरज आहे का? स्थानिक लोकांना त्याबद्दल काय वाटते याची कोणीच काळजी घेत नाही.

सगळे काही आम्हाला किती वाटा मिळेल यासाठीच असणार असेल तर निवडणुका तरी कशाला घेता, असा प्रश्न विचारावासा वाटतो. विषय निघालाच आहे तर तो आता दूरपर्यंत जाईल, (बात निकली है तो बहोत दूर तलक जाएगी) असे या विषयावरून सुरू झालेल्या चर्चेचे सध्या स्वरूप आहे. पालिकेने त्याची प्रामाणिकपणे खरोखरच दखल घ्यायची ठरविली आणि त्याला सिंहस्थाचा मुलामा दिला तर नाशिकरोडचे रुपडे पालटू शकेल. पूर्वी काय झाले, कोणामुळे झाले या फंदात आता न पडता भविष्यात काय करता येईल, सिंहस्थासाठी रेल्वेने येणार्‍या भाविकांना परिसराचे चांगले चित्र कसे दिसेल, भावेल याचा विचार करायला हवा. पालिकेत सध्या नवे गडी नवे राज आहे. त्यांनी हे करून दाखवावे आणि नाशिकरोडकरांचा दुवा घ्यावा.

ताज्या बातम्या

दुर्दैवी : विजेच्या धक्क्याने मंडप व्यावसायिकाचा मृत्यू

0
वणी | प्रतिनिधी वणी येथे लग्नाचा मंडप सोडण्यासाठी गेलेल्या मंडप व्यावसायिकाचा मंडप सोडताना लोखंडी पाईप वरून गेलेल्या विजेच्या तारांच्या संपर्कात आल्याने विजेचा धक्का लागून मृत्यू...