येवला | प्रतिनिधी Yeola
तालुक्यातील पारेगाव येथील गावालगतच्या तळ्यात सुरू असलेल्या कथित अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदारास मारहाण झाल्याची घटना शनिवारी (दि. २०) दुपारी घडली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात राहुल बद्रीनाथ आहेर व शुभम परदेशी या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवासी नायब तहसीलदार पंकज कृष्णराव नेवसे यांना तहसीलदार आबा महाजन यांनी पारेगाव येथील तळ्यात अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार नेवसे हे ग्राम महसूल अधिकारी संतोष आठवले व वैभव भड यांच्यासह घटनास्थळी गेले. तेथे एमएच-१७ सीव्ही-४५२२ क्रमांकाचा मुरूमाने भरलेला डंपर आढळून आला.
यावेळी उपस्थित राहुल आहेर व शुभम परदेशी यांच्याकडे उत्खननासंदर्भातील परवान्याची मागणी करण्यात आली. मात्र त्यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. उलट दोघांनी महसूल पथकाशी अरेरावीची भाषा करत वाद घातल्याचा आरोप आहे.
फिर्यादीनुसार, राहुल आहेर याने नायब तहसीलदार नेवसे यांना मारहाण करून खाली पाडले तसेच गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये नेवसे यांना दुखापत झाली. तसेच दोघांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून धमकी दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.
घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीतही संबंधितांकडून शिवीगाळ सुरू असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सागर कोते करीत आहेत.




