मुंबई | Mumbai
देशातील लोकसभेच्या (Loksabha) ५४३ जागांचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निकालात भाजपप्रणित एनडीएला (NDA) २९४ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. अशातच आता एनडीएचा महाराष्ट्रातील घटक पक्ष असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून त्यांच्या गटातील १० आमदार घरवापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बारामतीमधून सुप्रिया सुळे (Supriya Sule) निवडून आल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या निमित्ताने अजित पवारांच्या राष्ट्र्वादीच्या दहा आमदारांनी त्यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. हे दहा आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. महायुतीच्या जास्त जागा निवडून येतील असा विश्वास असताना त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांमध्ये चलबिचल पाहायला मिळत आहे.
दरम्यान, दुसरीकडे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनीही (Rohit Pawar) सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे काही आमदारांना घेऊन भाजपमध्ये (BJP) जातील असा दावा केला होता. तसेच ज्या आमदारांनी आतापर्यंत शरद पवारांवर टीका केलेली नाही त्यांच्यासाठी परतीचे दरवाजे उघडे असतील असेही त्यांनी म्हटले होते. त्यानंतर आता १० आमदारांच्या परतीच्या या वृताने अजित पवार गटात खळबळ माजली आहे.