अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्यभर लौकिक असणार्या आणि शहरातील मनमाड रोडवर प्रेमदान चौकात असलेल्या वेदांतनगर दत्त देवस्थानमध्ये सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या श्रद्धास्थानाचे दर्शन मिळणे दुर्लभ झाले आहे. या देवस्थानमध्ये सध्या विश्वस्त कोण आहेत, त्यांच्या नावाचा फलक लावला जावा, देवस्थानचे स्टेट बँकेतील खाते बंद असल्याने अन्य कोणत्या खात्यातून व्यवहार होतात, हे फलकाद्वारे जाहीर करावे, वयोवृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी नव्या व्हीलचेअर व रॅम्प तेथे असावा, अशा मागण्याही भाविकांनी व्यक्त केल्या. दरम्यान, या देवस्थानचा सुमारे 100 कोटींचा टर्नओव्हर (आर्थिक उलाढाल) आहे, पण त्याचा हिशेब मिळत नाही. देवस्थानच्या विश्वस्त मंडळावर धर्मादाय आयुक्त व सरकारचे नियंत्रण नाही, असा दावाही भाविकांनी केला आहे.
रामकृष्ण क्षीरसागर महाराज असल्यापासून म्हणजे सुमारे 1960 पासून दत्त देवस्थानचे उपासक असलेले पुणे येथील दत्तात्रय खानापूरकर, नगर येथील अमेय कानडे व राहाता येथील मुरलीधर ऋषीपाठक यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधताना वेदांतनगर दत्त देवस्थानसंदर्भात विविध तक्रारी केल्या. या तक्रारींचे निरसन देवस्थानद्वारे व्हावे व भाविकांना येथे सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यासंदर्भात त्यांनी सांगितले, रामकृष्ण क्षीरसागर महाराज जुन्या मंदिरात जेथे बसून भाविकांना मार्गदर्शन करीत होते. तो निलकांतीवर्ण हॉल व सद्गुरू अधिष्ठान स्थान हे नित्य दर्शनासाठी उपलब्ध नाही. या सभागृहात प्रत्यक्ष महाराजांनी निलकांती प्रकाशात भाविकांना दर्शन दिले होते. त्यामुळे भाविकांचे ते दत्तात्रय निवास श्रद्धास्थान आहे. 2007 मध्ये नवीन मंदिर झाल्यावर जुने देवस्थान बंद केले गेले, भाविकांच्या उपोषण आंदोलनानंतर ते पुन्हा सुरू केले असले तरी तेथील दर्शन व्यवस्थेसाठी अनेक आंदोलने करावी लागली आहेत.
देवस्थानच्या पैशाचा हिशोब मागणार्यांवर विनयभंग, दरोडासारखे गंभीर गुन्हे दाखल होत असल्याने भाविकात दहशतीचे वातावरण आहे. विश्वस्त मंडळाचा नाम फलक लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असताना, ते पाळले जात नाहीत. कर्मचारी व व्यवस्थापन उद्धट उत्तरे देतात. कोर्टात केस करा म्हणतात, देवस्थानमध्ये प्रवेशाचा सध्याचा प्रवेश मार्ग मनपाच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेला आहे. यामुळे पश्चिमेचा मार्ग दर्शनासाठी खुला करावा, वेद विद्यापीठात विद्यार्थी किती व त्यांची प्रगती काय याची माहिती दिली जात नाही. वृद्ध-आजारी-दिव्यांग भाविकांना असलेल्या दोन व्हीलचेअर मोडल्या आहेत व त्या नेण्यासाठी रॅम्प नाही, असा दावाही या भाविकांनी केला. विश्वस्त मंडळाचा चेंज रिपोर्ट स्वीकारला गेलेला नसल्याने स्टेट बँकेने देवस्थानचे बँक खाते गोठवले आहे.
त्यामुळे आता येणारा पैसा कोणत्या खात्यात जातो व भक्तांनी दान केलेल्या पैशाचा विनियोग कोणत्या कारणासाठी केला जातो, याचा समाधानकारक खुलासा व्यवस्थापनाकडून होत नाही, असा दावाही भाविकांचा आहे. भाविकांसाठी पश्चिमेचा दरवाजा उघडावा, विश्वस्त मंडळाचा फलक लावावा, नव्या व्हीलचेअर घ्याव्यात, देवस्थान परिसरात सुरू असलेले बांधकाम नेमके कशाचे आहे त्याची माहिती द्यावी, सद्गगुरूंचे अधिष्ठान असलेल्या दत्तात्रय निवास येथे जाण्यास भाविकांना सुविधा द्यावी, अशा मागण्याही भाविकांनी केल्या.
सुवर्ण महोत्सव करू दिला नाही
रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांचे पुतणे मिलिंद क्षीरसागर हे देवस्थानचे शेड्युल्ड वन वर नाव असलेले एकमेव विश्वस्त आहेत. त्यांनी चिटणीस म्हणून अभय ब्रम्हे यांची नियुक्ती केली आहे. 1974 मध्ये स्थापन झालेल्या या देवस्थानला 50 वर्षे पूर्ण झाल्याने सुवर्ण महोत्सवाचे नियोजन केले होते. मात्र, हा महोत्सव देवस्थानच्या व्यवस्थापनाने साजरा करू दिला नाही, अशी तक्रार ब्रम्हे यांची आहे. त्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रारही केली असल्याचे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.