मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
शहरातील कुसूंबारोड लगत असलेल्या एकबाल डाबीलगत नया इस्लामपुरा भागात कचरा संकलन करणार्या डंपरने सायकलला धडक दिल्याने १२ वर्षीय बालक डंपरच्या चाकाखाली येवून चिरडला गेल्याने जागीच ठार झाला. आज १२ वाजेच्या दरम्यान या घटनेने संतप्त झालेल्या नागरीकांनी आंदोलन करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मनपा अतिरिक्त आयुक्तांनी महासभेत प्रस्ताव ठेवत मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
रमजानपुरा भागात राहणारा दस्तगीर अली सय्यद सईद (१२) हा बालक आईने खाद्यपदार्थ आणण्यास सांगितल्याने तो लहान सायकलवर इकबाल डाबी बाजारात जात होता. यावेळी कचरा संकलन ठेकेदार कोणार्क कंपनीच्या डंम्पर एम.एच.-४१-ए-३१८५ हा कचरा उचलण्यासाठी त्या ठिकाणी गर्दीत घुसला यावेळी चालकाने अकस्मात डंपर मागे घेतल्याने सायकलीला धडक बसून दस्तगीर चाकाखाली येवून चिरडला गेल्याने जागीच गतप्राण झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
कचरा संकलन कोणार्क कंपनीचा डंपर चालक हा मद्याच्या नशेत होता व त्याने या नशेतच जोरात डंपर मागची परिस्थिती लक्षात न घेता मागे घेतल्यामुळेच बालक चिरडला जावून मृत्यूमुखी पडल्याचा आरोप यावेळी संतप्त नागरीकांनी केला. संतप्त नागरिकांनी खानका मशीदजवळ धरणे आंदोलन सुरू करत या भागातील रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढावीत तसेच अवजड वाहनांना गर्दीचा ठिकाणी बंदी घालावी अशी मागणी केली.
दस्तगीरला उपचारार्थ सामान्य रूग्णालयात दाखल केले असता डॉटरांनी तपासून मृत घोषित केले. डंपर चालकाच्या चुकीनेच एकुलत्या एक बालकाचा बळी गेल्याने कचरा संकलन ठेका कंपनीने मृत बालकाच्या कुटूंबियांना २० लाखाची मदत करावी या मागणीसाठी नातेवाईक व रमजानपुरा भागातील नागरीकांनी सामान्य रूग्णालयाजवळ ठिय्या आंदोलन करत लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.
अतिरिक्त आयुक्त सुनीता कुमावत यांनी घटनास्थळी येवून नुकसान भरपाई देण्यासाठी महासभेकडे प्रस्ताव देवू महासभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यास त्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नगरसेवक करण चव्हाण, शफिक ऑरगन, जब्बार मेंबर, रशीद शाह आदींसह कुटूंबीय व नागरीक उपस्थित होते. या प्रकरणी आयशानगर पोलिसांनी डंपर चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.




