नाशिक | प्रतिनिधी Nashik
मान्सूनच्या सक्रियतेमुळे महाराष्ट्रात पूर्ण आठवड्यात मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी बरसणार असल्याचे आयएमडीने जाहीर केले आहे. विशेषतः रविवारी (दि.१४) आणि सोमवारी (दि.१५) संपूर्ण राज्यात अतिजोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील एकूण २४ जिल्ह्यांत यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले असून, पावसामुळे भूस्खलन, पूर आणि वाहतूक अडथळ्यांची शक्यता नाकारता येत नाही.
ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार (दि.१८) पर्यंत राज्यभर जोरदार पावसाचे सत्र कायम राहील. मान्सून प्रणाली पुन्हा सक्रिय झाल्याने हा पाऊस सुरू होत आहे. उद्या अतिजोरदार पावसाची तीव्रता सर्वाधिक असेल असे खुळे यांनी सांगितले.
आयएमडीच्या अलर्टनुसारही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जड ते अतिजड पावसाची शक्यता आहे, ज्यात मराठवाड्यात आणि कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात १४ तारखेला अतिजड पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मंगळवार (दि.१६) पासून मराठवाडा, खानदेश, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरसह १८ जिल्ह्यांत पावसाची तीव्रता किंचित कमी होईल, मात्र पूर्ण थांबणार नाही. २४ सप्टेंबरपर्यंत पूर्व आणि पेनिनसुलर भारतात जड पावसाचे स्पेल कायम राहू शकते. परतीच्या पावसाची वाट पाहत असताना, इतर प्रणालींमुळे तो १५ सप्टेंबर किंवा त्यानंतर उशिरा होण्याची शक्यता आहे. वातावरणीय निरीक्षणानंतरच परतीच्या तारखेची अधिकृत घोषणा होईल,” असे खुळे यांनी स्पष्ट केले.
आयएमडीने नागरिकांना सावध राहण्याचा इशारा दिला असून, घाट रस्ते, नद्या-नाले ओलांडणारे पूल आणि कमी उंचीवरील भाग टाळण्याचे आवाहन केले आहे.




