Sunday, February 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजराज-का-रण : राष्ट्रवादीतील निर्नायकी!

राज-का-रण : राष्ट्रवादीतील निर्नायकी!

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक

- Advertisement -

अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे राष्ट्रवादी या पक्षाचे काय होणार, दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण होणार का, या प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत. विलिनीकरण झाले तर शरद पवार गटाला धुगधुगी जरूर येईल; पण अजितदादा गटाच्या नेतृत्वाविषयीचा तिढा कौशल्याने सोडविता आला तरच काही भविष्य आहे, अन्यथा इतर पक्ष लचके तोडायला बसलेले आहेतच.

YouTube video player

अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे राष्ट्रवादी या पक्षाचे काय होणार, शरद पवारांची राष्ट्रवादी व अजितदादांची राष्ट्रवादी या दोन पक्षांचे विलिनीकरण होणार का, अशा काही प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीत आहेत. सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद देऊन काही शंकांचे निरसन झाले असले तरी पक्षाध्यक्षपदाचे काय याला नेत्यागणिक वळसे घातले जात आहेत. मध्यंतरी भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचे जाहीर करून वादळ उठवून दिले. नंतर ते शमले असले तरी उपमुख्यमंत्रिपद व पक्षाचे अध्यक्षपद या दोन्ही पदांची जबाबदारी नवख्या सुनेत्राताईंना पेलवेल का असाही सूर दबक्या आवाजात तेव्हापासूनच चर्चिला जात आहे. ही चर्चा नैसर्गिक की मुद्दाम घडविली जात आहे, याची खातरजमा होऊ शकत नाही.

मात्र, दस्तुरखुद्द सुनेत्राताईंनी या सर्वच प्रश्नांविषयी मौन बाळगले असल्याने सस्पेन्स कायम आहे. येत्या काही दिवसांत ही गुंतागुंत सुटेल असे समजायला हरकत नाही. दरम्यानच्या काळात दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा मुद्दा फेटाळण्यापासून ते ताई विचार करून ठरवतील इथपर्यंत पोहोचला असल्याने या मार्गक्रमणालाही किती वेळ लागतो हे पाहावे लागेल. अजितदादांच्या निधनाने दोन्ही पक्ष सुन्न झाले. त्याचा परिणाम पक्षसंघटनेवर झालेला आता गावोगावी दिसत आहे. नुकत्याच झालेल्या काही जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला विक्रमी यश मिळाले ते सहानुभूतीच्या लाटेमुळे हे कोणीही मान्य करतील. परंतु त्याचवेळी हेदेखील विसरता येणार नाही की, या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढल्या होत्या. तेदेखील अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या निशाणीवर. थोडक्यात काय तर, विलिनीकरणाची चर्चा निश्चितपणे कोणत्यातरी निष्कर्षापर्यंत आली होती, याचा हा पुरावा मानायला हरकत नसावी. परंतु दुर्दैवाने ती फलद्रुप होण्यापूर्वीच दादांच्या निधनाने ती थांबली.

अजितदादांच्या गटातील काही ज्येष्ठ नेते असा काही विषयच नाही, आम्हाला काहीच माहिती नाही, आमच्याशी साधी चर्चाही नाही वगैरे सांगून हा विषय टोलवित आहेत. दस्तुरखुद्द सुनेत्राताईंनी याविषयी अद्याप चकार शब्द काढलेला नसल्याने विलिनीकरणासंदर्भातील संभ्रम कायम आहे. तो लवकरात लवकर मिटायला हवा; कारण सध्या पक्षसंघटनाही संभ्रमित आहे. दादांना मानणारा गट त्यांच्या पश्चात इतर नेत्यांवर कितपत विश्वास ठेवेल याविषयी शंका आहे. त्यामुळेच प्रफुल्ल पटेल यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येताच तमाम आमदारांसह कार्यकर्त्यांनीही निर्विवादपणे हे नाव धुडकावून लावले. परिणामी प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे या नेत्यांविषयी सध्या केवळ राष्ट्रवादीच्या गोटातच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही चर्चा आहे. सध्या ही चौकडी ज्या पद्धतीने सुनेत्राताईंच्या अवतीभवती प्रत्येक ठिकाणी दिसत आहेत, त्याबाबतही बरीच उलटसुलट चर्चा ऐकिवात येते.

आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
साधारण अशा परिस्थितीत राष्ट्रवादी या पक्षाचे भवितव्य काय असा विचार साहजिकच अनेक जण करीत आहेत. शरद पवार यांचे वय तसेच त्यांचे आजारपण या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतील प्रत्येक जण अजितदादांकडेच मोठ्या आशेने पाहत होता. आता दादांच्या पश्चात नेमके काय होणार याचा काहीही अदमास येत नसल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. गावागावांत ही अस्वस्थता जाणवते. खरे तर अजितदादांनी भाजपशी घरोबा केला तो धक्कादेखील अनेकांना अजूनही पचविता आलेला नव्हता. आता तर दादाच नाहीत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जनाधार राहिलेला नाही. साहजिकच अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुढे काय, हा सवाल अधिक तीव्रतेने आता पुढे आला आहे. नाशिकपुरता विचार करायचा झाला तर, या जिल्ह्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत. पैकी दोघे मंत्रीही आहेत. तिसरे रिक्त मंत्रिपद अद्याप भरले गेलेले नाही.

भाजपबरोबर सत्तेत गेल्यानंतरच्या कार्यकाळात या सात आमदारांच्या कार्यक्षमतेचा विचार करता, परिस्थिती फारशी सुखद नाही, हे दिसते. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ सिन्नरमध्ये निर्विवाद यश मिळविता आले. विशेष म्हणजे, या काळातच माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेले होते, पक्षाची राज्यभर बरीच बदनामी झालेली होती, तरीही सिन्नरवासियांनी कोकाटेंवरच भरवसा ठेवल्याचे दिसते. दुर्दैवाने इतर आमदारांच्या कार्यक्षेत्रात असे निर्भेळ यश काही कोणाला मिळविता आले नाही. नाही म्हणायला आमदार सरोज अहिरेंमुळे भगूरमध्ये राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद जरूर आले; परंतु तेथे शिवसेनेचे विजय करंजकर यांच्या पराभवासाठी राष्ट्रवादी, भाजप, उबाठा असे सगळेच पक्ष एकत्र आले होते. त्याचमुळे त्याला निर्विवाद यश म्हणता येत नाही. येवला हा तर छगन भुजबळांचा बालेकिल्ला. पण तेथेही भाजपच्या साथीने नगरपालिकेत यश मिळविता आले. तेथेही दस्तुरखुद्द भुजबळ रुग्णालयात असल्याने अपेक्षित यशाने हुलकावणी दिली असे फार तर म्हणता येईल.

सर्वाधिक वाईट कामगिरी आमदार दिलीप बनकर यांच्या कार्यक्षेत्रातील ओझर व पिंपळगाव बसवंत या त्यांच्या स्वगृहातील संस्थांंमध्ये झाली. दोन्ही परिषदांमध्ये राष्ट्रवादीला लोकांनी नाकारले. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी या दोन पालिकांमध्ये शिवसेनेने बाजी मारल्याने आमदार हिरामण खोसकरांचीही मात्रा फार काही चालली नाही हे दिसले. दोन्ही ठिकाणी ते सत्तेत सहभागी झालेले असले तरी सत्तारूढ आमदार म्हणून असलेली कार्यक्षमता त्यांना सिद्ध करता आली नाही. मंत्री नरहरी झिरवाळ व नितीन पवार यांच्या कार्यक्षेत्रातील पालिकांमध्ये निवडणुका नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेची झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहिली. अर्थात, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत झिरवाळ तसेच खोसकर यांनी बरेच लक्ष घातले आणि केवळ चार जागांवर त्यांची नाशिककरांनी बोळवण केली.

मालेगावमध्ये तर पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्याही संघटनशक्तीची परीक्षा झाली अन् त्यात ते नापास झाले. या निवडणुकांच्या काळातही राष्ट्रवादीत जी काही गटबाजी झाली त्याची वेळोवेळी दखल घेतली आहेच. परंतु दादांच्या पश्चात या गटबाजीला अनंत धुमारे फुटू लागल्याचे दिसते. महापालिकेत अवघ्या चार जागा पक्षाला मिळाल्या. त्यात अपक्ष मुकेश शहाणे यांची भर घालून बेरजेचे राजकारण करू पाहणार्‍या शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांना पक्षातूनच अवसानघात झाला. अर्थात, त्यालाही ठाकरे यांची पायाकडे पाहण्याची वृत्तीच कारणीभूत ठरली.

रंजन ठाकरे यांच्या सौभाग्यवती सीमा या प्रथमच निवडून आल्या. मात्र डॉ. हेमलता पाटील या चार वेळा विजयी झालेल्या असल्याने त्यांच्याकडे पक्षाचे गटनेतेपद जाणे अपेक्षित होते. पण रंजन ठाकरे यांनी पत्नीकडेच ते पद दिल्याने नाराज हेमलता पाटलांनी पक्षालाच ठेंगा दाखवून स्वतंत्र गटनोंदणी केली. या रागालोभाची चर्चा होत असतानाच त्यातील काही अंतर्गत गोष्टी बाहेर आल्याने पक्षाचे पुढे काय होणार हा प्रश्न अधिक गहिरा झाला.


दादा हयात असताना हेमलता पाटील यांना गटनेतेपदाचा शब्द दिला गेला होता, तोदेखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत, असा पाटील यांचा दावा आहे. असे असताना त्यांना डावलून सीमा ठाकरेंना गटनेतेपद दिले गेले. पाटील यांनी स्वभावधर्मानुसार हा सारा प्रकार माध्यमांकडे कथन केला. तटकरेंनी सोयीनुसार आपण ते पत्रच दिले नसल्याचा खुलासा करून स्थानिक गटबाजीत तेल ओतण्याचे काम केले. वास्तविक, संबंधित दोघांना खासगीत बोलावून आदेश दिला असता तरी काम होण्यासारखे होते. परंतु तेवढी प्रगल्भता ना त्यांना ना स्थानिक नेत्यांना दाखविता आली. परिणामी दादांच्या पश्चात कोण पक्ष चालविणार आणि त्यात काय होऊ शकते याची झलक मिळाली. यामुळे तर पक्षाच्या तटस्थ कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता आणखीनच वाढली.

शोभेची पदे
एकंदरीत सध्या परिस्थिती अशी गोंधळाची असताना पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांचे दुर्दैवी निधन झाले. गेल्या चौदा वर्षांहून अधिक काळ त्यांनी हे पद भूषविले. राष्ट्रवादीसारख्या मातब्बर नेते असलेल्या पक्षात एवढा दीर्घकाळ असे पद भूषविणे सोपी बाब नाही. पगार हे भुजबळांचे समर्थक म्हणूनच नेहमी वावरले. पण, त्यांच्या पदाला भुजबळ विरोधकांनीही कधी आव्हान दिले नव्हते. आता पगार यांच्या पश्चात या पदाचाही विषय आहेच. आजपर्यंत या पदासाठी कोणी आव्हानवीर तयार नसले तरी आता कदाचित संघर्ष होऊ शकेल. संघटना कोणाच्या दावणीला बांधायची याचा फैसला म्हणून या पदाच्या नियुक्तीकडेही पाहिले जाऊ शकते. ठाकरे-हेमलता पाटील वादाने ती झलक दाखवून दिली आहेच. दुसरे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे यांच्याबाबत तर यांना आपण ओळखता का, असे विचारण्याची वेळ येईल. रंजन ठाकरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाशिवाय म्हाडाचे विभागीय अध्यक्षपदही आहे. आता पत्नीमुळे गटनेतेपदही घरात आल्याने याबाबत आवाज उठू शकतो. महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे या भगूरच्या नगराध्यक्ष झाल्याने त्यांना स्थानिक प्रशासन व राजकारणासाठी अधिक वेळ द्यावा लागेल. साहजिकच त्यांच्या जागेवर नव्या नियुक्तीची गरज राहील.

शहराध्यक्ष योगिता आहेर यांची कामगिरीही यथातथाच आहे. नाशिक जिल्ह्यात सात आमदार, दोन मंत्री अशी स्थिती असलेल्या या पक्षाची संघटनात्मक ताकद मधल्या काळात कितीतरी पटीने वाढलेली असायला हवी. दुर्दैवाने प्रत्येक जण आपापल्या कोषातच असल्याने संघटनेच्या बांधणीकडे दुर्लक्ष होत आहे. दादांच्या पश्चात त्याला इतरही अनेक कंगोरे लाभणार असल्याने नजीकच्या भविष्यात नेतृत्व कोणाकडे जाते आणि ते स्थानिक राजकारणात कोणाकडे कमान सोपवतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तर अत्यंत दारूण अवस्था आहे. त्याविषयी खरे तर काही न लिहिणेच बरे. तरीही संघटनेपासून ते नेत्यांपर्यंत निर्नायकी अवस्थेत पक्ष आहे. गजानन शेलार यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देऊन महिना उलटला. पक्षाने त्याची साधी दखलही घेतलेली नाही. पर्यायी व्यवस्था तर दूरच. जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय पाटील यांना दिंडोरीशिवाय करमत नाही. साहजिकच उर्वरित तालुक्यांकडे दुर्लक्ष होते. अशा स्थितीत विलिनीकरण झाले तर शरद पवार गटाला धुगधुगी येईल; पण अजितदादा गटाच्या नेतृत्वाविषयीचा तिढा कौशल्याने सोडविता आला तरच काही भविष्य आहे, अन्यथा इतर पक्ष लचके तोडायला बसलेले आहेतच. म्हणूनच सावध ऐका पुढल्या हाका, असे म्हणावसे वाटते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : सोनईचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी निलंबीत

0
अहिल्यानगर | Ahilyanagar नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाणे हद्दीत दोनवेळा गोळीबारासह गंभीर गुन्हे वाढल्याने सहायक पोलीस निरीक्षक विजय माळी यांचे निलंबन करण्यात आले आहे. याबाबत...