Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : उमेदवारांचा सुकाळ, तरीही पक्ष बकाल!

पडसाद : उमेदवारांचा सुकाळ, तरीही पक्ष बकाल!

नगरपरिषदांच्या निवडणुकांचा सध्या चांगलाच धुरळा उडाला आहे. उमेदवारी अर्ज भऱण्याची अभूतपूर्व उत्सुकता पाहिल्यावरच सगळ्याच पक्षांच्या हातून नियंत्रण सुटल्यासारखे दिसत होते. जिल्ह्यातील नगराध्यक्षांच्या अकरा जागांसाठी १०६ तर नगरसेवकांच्या २५६ जागांसाठी तब्बल १,३४४ उमेदवार रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षासारख्या शिस्तीच्या पक्षातही बंड, असंतोषाचे वारे वाहिले. महायुती व महाविकास आघाडी अशा दोन्हीही गटांमध्ये समन्वय राहिला नाही. भाजपने अनेक ठिकाणी आपली ताकद ओळखून सावध पवित्रा घेतल्याचे दिसले तर इतर पक्षांनी मात्र आपल्या ताकदीचा फुगा बराच फुगवून ठेवलेला असल्याने त्यांना स्वबळाशिवाय पर्याय नव्हता.

- Advertisement -

भाजपने त्र्यंबकेश्वर येथे स्वबळ आजमावण्याचे ठरविले, कारण गेली काही वर्षे तेथे पक्षाचा प्रभाव चांगला राहिला आहे. त्यामुळे त्यांनी तेथे आपल्या मित्रपक्षांचीही डाळ शिजू दिली नाही. त्याचवेळी चांदवड, ओझर, पिंपळगाव बसवंत, मनमाड व नांदगाव येथे मात्र पक्षाची तोळामासा प्रकृती पाहून सहजपणे शिंदेंच्या शिवसेनेशी हातमिळवणी केली. याशिवाय सटाणा व सिन्नरमध्येही भाजप स्वबळाची परीक्षा पहात आहे. येवला, भगूरमध्य भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे. आमदार सुहास कांदे यांच्या प्रभावाला कंटाळून शिवसेना उबाठामधून भाजपमध्ये अलिकडेच आलेले बाजार समितीचे माजी सभापती गणेश धात्रक यांना कांदेंचेच नेतृत्व मान्य करण्याची वेळ आली.

YouTube video player

धात्रकांच्या अहंकारापेक्षा पक्षाचा पाय रोवणे महत्वाचे हा विचार कदाचित नेत्यांनी केला असावा. त्यामुळेच ज्या कांदेंमुळे बाजार समितीची सत्ता गेली त्याच कांदेंपुढे शेवटी युतीसाठी हात पसरावे लागले. येवल्यातही भाजप व राष्ट्रवादी अजित पवार पक्षात युती झाली असून त्यांचा लढा शिंदेंच्या शिवसेनेशी राहणार आहे. येथे शिवसेनेला शरद पवारांची राष्ट्रवादीची साथ आहे. भुजबळांच्या प्रभावातही गेल्याखेपेस भाजपने नगराध्यक्षपद खिशात घातले होते. शहरात भाजपचे जुने अस्तित्व असल्याने व आता देखील नगराध्यक्षपदाची उमेदवारी रा. स्व. संघाच्या जुन्या कार्यकर्त्याला देऊन भाजपने मोठीच लढाई जिंकली आहे.

भगूर पालिकेत शिवसेनेच्या विजय करंजकरांकडे गेली पंधरा वर्षे एकहाती सत्ता आहे. भाजप – शिवसेना युती असतांनाही भगूरमध्ये मात्र नेहमीच या दोन पक्षातच संघर्ष झालेला होता. प्रत्येकवेळी शिवसेनेनेच बाजी मारलेली असल्याने यंदाही शिवसेना स्वबळाच्या बेटया फुगविणार हे दिसत होते. झालेही तसेच. राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे व करंजकर यांचे विळ्याभोपळ्याचे नाते सर्वश्रुत असल्याने अहिरेंनीच करंजकरांविरोधात आघाडी उघडून भाजपला सोबत घेतले आहे. सिन्नरमध्ये पूर्वी भाजपचे काही प्रमाणात अस्तित्व जरुर होते. पण यंदा उदय सांगळे यांची पक्षात एंट्री होताच उत्साह संचारला आणि पक्षाने स्वबळाचा नारा दिला. शिवसेना उबाठाचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे यांनाच गळाला लावून नगराध्यक्षपदाचे उमेदवार करुन भाजपने एकाच पक्षात वाजे व कोकाटे या दोघांनाही आव्हान देण्याचा प्रयत्न चालविला आहे. येथे सगळ्याच पक्षांनी आपापले स्वतंत्र उमेदवार उभे केलेले असले तरी भाजप व शिंदेंच्या शिवसेनेला काही जागांवर उमेदवार मिळालेले नाही.

सटाण्यात भाजपसह राष्ट्रवादी व शिंदे सेना असे सगळेच स्वतंत्रपणे नशीब आजमावित आहेत. चांदवडला भाजप – शिंदेसेनेच्या विरोधात राष्ट्रवादीने दंड थोपटले आहे. इगतपुरीत शिंदेंच्या शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बरोबर घेतले आहे. येथे महाराष्ट्र विकास आघाडीने आव्हान दिले आहे. साधारण सगळीकडेच बहुरंगी लढती होत आहेत. महायुती व महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्येही काही ठिकाणी संघर्ष असल्याने हे सारे कोणत्या आधारावर मते मागतील हा प्रश्न अगदी कार्यकर्त्यांनाही पडला आहे. म्हणजे नांदगाव तालुयात जे भाषण चालू शकेल तेच येवल्यात अजिबात चालणार नाही. सत्तारुढ महायुतीतील घटक पक्षही काही ठिकाणी एकमेकांसमोर उभे ठाकलेले असल्याने अशांच्या प्रचाराची मोठी गंमत पहायला मिळणार आहे. सिन्नरमध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांना थेट आव्हान देण्यासाठी भाजपने जोरदार तयारी चालविली आहे तर तिकडे भगूरला शिंदेंच्या सेनेपुढे राष्ट्रवादीच्या आमदारांनी इतरांना सोबत घेत राजकीय फिट्टंफाट करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

गंमत म्हणजे काही ठिकाणी या पक्षांना उमेदवारही मिळू शकलेले नाहीत, ही देखील लक्षणीय वस्तुस्थिती आहे. एकाही पक्षाला जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी उमेदवार मिळू नये, ही स्थिती केवळ शोचनीय नाही तर त्या त्या पक्षांनी आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. एकीकडे पक्षांतराला ऊत आला असतानाही जर सत्तारुढ पक्षांना सगळीकडे उमेदवार मिळणार नसतील तर हे कसले लक्षण म्हणायचे. पक्षांच्या फोडाफोडीत विशेष रस घेणार्‍यांनी खरे तर पक्ष संघटन अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भाजपसारखा जगातील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून मिरवित आहे, त्यांचे कार्यकर्ते त्याची आत्मप्रौढीही मिरवितात. सध्या सर्वाधिक इनकमिंग याच पक्षात आहे, तरीही त्यांना अनेक नगरपरिषदांमध्ये उमेदवार मिळणार नसतील तर कुठेतरी काहीतरी चुकते आहे, याचा विचार पक्षाच्या धुरीणांनी करायला हवा. बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना पायघड्या जरुर घाला, किंवा गिरीश महाजन म्हणतात तसे पक्षविस्तारासाठी हे सारे गरजेचे आहे, हे मान्य. पण मग जे वर्षानुवर्षे पक्षात आहेत, गुण्यागोविंदाने पडेल ते कार्य करतात त्यांच्या स्वाभिमानाचे काय, त्यांनी किती दिवस हे असे उपर्‍यांचे ओझे वहायचे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. खासगीत हे असे विषय मांडले जातात. पण उघडपणे बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही. आता या निवडणुकांमध्ये कोण किती पाण्यात हे कळले तरी त्यात कोणत्या पक्षाचा किती वाटा हे मात्र गुलदस्त्यातच राहील.

ताज्या बातम्या

AMC Election : पैसे वाटपाचा संशय, विनानंबर दुचाकीतून लाखाची रोकड पकडली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याच्या संशयावरून एका पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी दोन दुचाकी अडवून त्या तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिल्या....