नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोला आज गुरुवारी सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागला. याचा देशभरातील विमान कंपनीच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरूसह अनेक प्रमुख विमानतळांवर २०० उड्डाणे रद्द करण्यात आल्याने विमानतळावर प्रवाशांची झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. परिणामी विमान प्रवास प्रचंड महागला आहे. काल (3 डिसेंबर) इंडिगोची विमानसेवा खोळंबल्यानंतर जो अभूतपूर्व गोंधळ झाला त्यानंतर हैदराबाद ते भोपाळ एअर इंडियाचे तिकीट तब्बल 1 लाख 3 हजार रुपयांवर गेले होते. यावरून विमान प्रवाशांचे किती मानसिक हाल, शारीरिक त्रास आणि किती आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला असेल, याची कल्पना येते.
दोन दिवसांपासून शेकडो उड्डाणे रद्द
आज सकाळी दिल्लीहून निघालेल्या इंडिगोच्या 30 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. सकाळपासूनच दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांब रांगा लागल्या होत्या, अनेक प्रवाशांनी संपूर्ण रात्र त्यांच्या उड्डाणांच्या प्रतीक्षेत घालवली. हैदराबादमध्येही सुमारे 33 उड्डाणे रद्द करण्यात आली. आज देशभरात इंडिगोच्या 170 हून अधिक उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. यापूर्वी, मंगळवार आणि बुधवारी इंडिगोच्या जवळपास 200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. बेंगळुरूमध्ये 42, दिल्लीत 38, मुंबईहून 33, हैदराबादमध्ये 19, अहमदाबादमध्ये 25, इंदूरमध्ये 11, कोलकातामध्ये 10 आणि सुरतमध्ये 8 उड्डाणे रद्द करण्यात आली होती.
बुधवारी इंडिगोने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की किरकोळ तांत्रिक बिघाड, हिवाळ्यातील वेळापत्रकात बदल, खराब हवामान, मंद विमान वाहतूक नेटवर्क आणि क्रू शिफ्ट चार्ट (फ्लाइट ड्युटी टाइम मर्यादा) शी संबंधित नवीन नियमांचे पालन यामुळे त्यांच्या ऑपरेशन्सवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. हे आधीच सांगणे शक्य नव्हते. कंपनीने म्हटले आहे की पुढील ४८ तासांत ऑपरेशन्स स्थिर होतील.
DGCA ने मागवले स्पष्टीकरण
इंडिगो एअरलाइन्सची सेवा बुधवारपासून कोलमडली आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक तास प्रवाशी विमानतळावर खोळबंळे आहेत. या त्रासामुळे काल दिल्ली विमानतळावर प्रवाशांनी ‘इंडिगो हाय हाय’च्या घोषणा देत निषेध केला. या सर्व गोंधळाची आणि समाज माध्यमांवरील प्रवाशांच्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगो एअरलाइन्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने चर्चेसाठी बोलावले आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या अभूतपूर्व गोंधळाला जबाबदार कोण आणि यावर काय उपाययोजना करणार, यावर आज (4 डिसेंबर) इंडिगोकडे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. सध्या पर्यटनाचा सीझन सुरू असताना भारतातील मोठी विमानसेवा कोलडमल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होते आहेत. त्यामुळे इंडिगोच्या या गोंधळाची DGCA कडून चौकशी केली जात आहे.
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोला सध्याच्या समस्यांची कारणे आणि त्या सोडवण्याच्या योजनांबद्दल तपशील मागितले आहेत. डीजीसीएने म्हटले आहे की ते या प्रकरणाची चौकशी करत आहे आणि उड्डाण रद्द करणे आणि विलंब कमी करण्याचे मार्ग मूल्यांकन करत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) मते, क्रूची कमतरता हे प्राथमिक कारण आहे. गेल्या महिन्यापासून इंडिगोला या समस्येचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबरमध्ये 1,232 उड्डाणे रद्द करण्यात आली. मंगळवारी 1,400 उड्डाणे उशिराने सुरू झाली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





