Friday, May 3, 2024
Homeनगर21 डिसेंबरपूर्वी झेडपी अध्यक्षांची निवड

21 डिसेंबरपूर्वी झेडपी अध्यक्षांची निवड

शुक्रवारी सभापती पदांचे आरक्षण जाहीर ?

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम एक महिना आधीच होणार आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार आता 21 डिसेंबरपूर्वी नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश सोमवारी सायंकाळी उशीरा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसांत झेडपीच्या नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी यांच्याकडून जाहीर करण्यात येणार आहे.

- Advertisement -

दरम्यान प्रशासनाच्या प्राथमिक नियोजनानुसार जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापतींच्या सोडती या शुक्रवारी 13 डिसेंबर काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ 21 सप्टेंबरला संपला होता. मात्र, याच काळात विधानसभा निवडणूका होणार असल्याने राज्यातील 21 सप्टेंबरमध्ये मुदत संपणार्‍या जिल्हा परिषदांना 120 दिवस (चार महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली. त्यानूसार ही मुदत 21 जानेवारीला संपणार होती.

मुदत संपल्यानंतर नूतन पदाधिकारी यांच्या निवडीच्या कार्यक्रमाची आखणी ही आधीच्या पदाधिकार्‍यांच्या निवडीची अधिसूचना जाहीर होण्याची तारिख अथवा अधिसूचना जाहीर झाल्यानंतरची तारखी गृहीत धरून निश्‍चित करण्यात येते. यात विद्यमान पदाधिकार्‍यांना 21 जानेवारीची मुदत ही अधिसुचना जाहीर झाल्यानंतरच्या तारखेनूसार होती. मात्र, आता ग्रामविकास विभागाने अधिसूचना जाहीर होण्यापूर्वीची तारीख गृहीत धरल्याने जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकार्‍यांच्या निवडी या आता एक महिना आधी होणार आहेत.

यामुळे सरकारच्या ग्रामविकास विभागाने 21 डिसेंबरपूर्वी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि अन्य सभापतींच्या निवडी कराव्या लागणार आहेत. यासाठी निवड कार्यक्रम जाहीर होणार असून निवडीच्या वेळी सर्वच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्या ठिकाणी सभागृहात मतदान होवून बहूमत सिध्द करावे लागणार आहे. याबाबत कार्यक्रम एक दोन दिवसांत जिल्हाधिकारी जाहीर करणार असून त्यापूर्वी 13 तारखेला पंचायत समितीच्या सभापती पदाची आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे पुढील अडीच वर्षाचे आरक्षण हे सर्वसाधारण गटासाठी असल्याने पदासाठी चांगलीच चुरस होणार आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली असून तोच फॉम्यूला नगरमध्ये वापरल्यास विद्यमान अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांची अडचण होणार आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत यापूर्वी एकदा ऐनवेळी विखे यांनी ‘चमत्कार’ केलेला असल्याने महाआघाडीही सावध आहे. त्यामुळे कोंडी कोणाची आणि सरशी कोणाची याविषयी उत्सुकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या