नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
नाशिकच्या पवित्र भूमीत येत्या ३१ ऑटोबरला होणारा सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीच्या उपस्थितीत पार पडणारा एक ऐतिहासिक क्षण आहे. राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार्या या ध्वजारोहणामुळे संपूर्ण देशाचे लक्ष नाशिककडे लागले आहे. सोहळ्याची तयारी जोरात सुरू असून शंखनादाबरोबरच एक लक्ष दिव्यांच्या गोदा आरतीने या सोहळ्याला सोनेरी किनार लाभणार आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या कार्यक्रमास राष्ट्रपतींना बोलावले नाही, यावरून तेव्हा विरोधकांनी भाजपच्या तथाकथित सर्वधर्मसमभावाच्या तत्त्वाची पिसे काढली होती.
नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनालाही राष्ट्रपती आमंत्रित नव्हत्या. या दोन घटनांवरून भाजप टीकेचा धनी झाला असला तरी सवयीप्रमाणे त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले गेले होते. आता सिंहस्थाच्या ध्वजारोहणाचा सोहळा राष्ट्रपतींच्या शुभहस्ते करण्याचे ठरवून पक्षाने पापक्षालन करण्याचे ठऱविलेले दिसते. यावेळी साडेसहा हजार आदिवासी बांधवांकडून आरती केली जाणार आहे. अशा प्रतीकात्मकतेच्या प्रेमात भाजप नेहमीच राहिला असून या दिखाऊ कार्यक्रमाने आदिवासींचा सन्मान होईल असे भासविले जात आहे. प्रत्यक्षात गेली काही वर्षे आदिवासी आपल्या मागण्यांसाठी जो संघर्ष करीत आहे, त्याकडे महिनोमहिने ढुंकूनही न पाहण्याचे काम मात्र मंत्री इमानेइतबारे करीत आहेत. असो, विषयांतर झाले असले तरी, या पार्श्वभूमीशिवाय या विषयाचे महत्त्वही कळणार नाही.
महाकुंभ सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी तीरी होत असलेल्या दोन आरत्यांच्या संयोजकांमधील वादावर पडदा टाकून उभयतांमध्ये तडजोड केली गेल्याची चर्चा आहे. प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री गिरीश महाजन, सिंहस्थ आयुक्त शेखर सिंह व पालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी ही यशस्वी मध्यस्थी केली. गेली दोन वर्षे अनेकांनी या दोन गटात मध्यस्थी करण्याचे प्रयत्न केले, ते यशस्वी झाले नव्हते. ते मोलाचे काम यांनी केले, याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद द्यायला हवेत. अर्थात, या तोडग्याचे स्वरूप मात्र गुलदस्त्यातच आहे. राष्ट्रपतींच्या मुख्य उपस्थितीत होणार्या सोहळ्यात आधी पुरोहित संघाची व लागलीच श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांची आरती पाठोपाठ पण एकाच ठिकाणी होईल, असे समजते. याचाच अर्थ प्राचीन परंपरा असलेली व नवी खास तयार केलेली अशा दोन आरत्या होतील, असे दिसते.
गेल्या दोन वर्षांपासून पंचकोठी गंगा गोदावरी पुरोहित संघ आणि श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समिती यांच्यातील आरतीवरून उफाळलेला अहंकार व वर्चस्ववाद अद्यापही पूर्णपणे शमलेला नाही, असेच यातून प्रतीत होते. मूळ गंगेची आरती ही प्राचीन व अखंड परंपरेचा भाग असल्याचा दावा पुरोहित संघाचा आहे आणि त्यांनी तो सोडून दिलेला नाही. राष्ट्रपतींना या सोहळ्याचे निमंत्रणही पंचकोठी गंगा गोदावरी पुरोहित संघानेच दिलेले आहे. साहजिकच जे काही होईल, ते आमच्याच अधिकार क्षेत्रात असेल, असा संघाचा हेका आहे. ध्वजारोहण विषय हा पुरोहित संघाच्या अखत्यारित असला तरी नंतरची आरती व तिचे वैश्विकरण कोणत्याही परिस्थितीत करायचेच, हा समितीचा निर्णय आहे.
राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणार्या या आरतीसाठी गेल्या तीन महिन्यांपासून साडेसहा हजार आदिवासी मुलांना प्रशिक्षण दिले जात आहे. आदिवासी संस्कृतीमध्ये होत असलेल्या या घुसखोरीविषयी काही जणांमध्ये कमालीची अस्वस्थता असली तरी सिंहस्थाच्या निमित्ताने या सोहळ्याला जागतिक व्यासपीठ मिळणार असल्याने नाके मुरडणार्यांकडे दुर्लक्ष करण्याचे ठरलेले दिसते.
धर्म, अध्यात्म आणि भक्तीचा मूळ गाभा नम्रता, समर्पण आणि सर्वसमावेशकता हा आहे. परंतु आज दुर्दैवाने साधू, संत, महंत आणि पुरोहित हे सगळेच धर्माभिमानी आपापसातील हेवेदावे आणि वर्चस्वाच्या संघर्षात अडकलेले दिसतात. गोदामाईच्या पावन तीरावर जेव्हा आरतीसारख्या पवित्र उपक्रमाचे राजकारण होते, तेव्हा सामान्य भाविकांच्या श्रद्धेचा खेळखंडोबा होतो. राष्ट्रपतींच्या आगमनासारख्या राष्ट्रीय कार्यक्रमात प्रतिमा मलीन होऊ नये, म्हणून राजकीय आणि प्रशासकीय कौशल्याची मलमपट्टी केली जात असली तरी कार्यक्रमाचे पावित्र्य संपताच पुन्हा तोच जुना अहंकार, तोच तुच्छतेचा भाव आणि श्रेष्ठत्व व वर्चस्वाची खोटी प्रतिष्ठा उफाळून येऊ नये, ही अपेक्षा.
सिंहस्थ हा कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. कुंभमेळा हा आपापले अहंकार बाजूला सारून आत्मिक शुद्धीकरणाचा काळ मानला जातो. परंतु इथे तर ‘माझी आरती मोठी की तुझी’ याच संघर्षात ऊर्जा वाया जात आहे. राष्ट्रपतींच्या दौर्यापुरती आरती एक होणार आणि नंतर पुन्हा आपापले आखाडे रंगणार, हा प्रकार व्हायला नको. सीमोल्लंघन म्हणजे केवळ सोन्याची पाने लुटणे नव्हे, तर आपल्या मनातील वाईट प्रवृत्ती, मत्सर आणि अवास्तव अहंकार यांचे सीमोल्लंघन करणे होय.
संत ज्ञानेश्वर महाराज मनातील या विकारांवर मात करण्याचे महत्त्व सांगताना म्हणतात, दुष्टपणाचा विसर, सज्जनांचा नमस्कार. आता वेळ आली आहे की, या मंडळींनी आत्मपरीक्षण करावे. प्रशासनाने तात्पुरत्या समन्वयाच्या भूलभुलैयात न अडकता या वादाची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत. जोवर काही जण संस्थात्मक किंवा व्यक्तिगत विषयातून बाहेर येत नाहीत, तोवर सिंहस्थाची भव्यता झाकोळलेलीच राहणार.




