विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा धक्कादायक व दारुण पराभव होत असतानाच तिकडे मालेगावात मात्र शेतकरी सहकारी संघ या बहुचर्चित संस्थेवर शिवसेनेचे नेते दादा भुसे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनलने निर्विवाद यश मिळविले. विधानपरिषद निवडणुकीत दादा भुसे यांनी प्रसाद हिरे यांच्या माघारीसाठी थोडेफार प्रयत्न केल्यानंतर त्यांच्याकडे दुसरे मंत्री उदय सामंत यांनी फारसे काम ठेवले नव्हते. त्यामुळे त्यातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग दादा भुसेंनी शेतकरी संघ ताब्यात घेण्यासाठी केलेला दिसतो. अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारा हा शेतकरी संघ गेल्या काही वर्षांपासून ओसाड पडलेला होता.
७२ वर्षांपूर्वी म्हणजे १९५४ साली भाऊसाहेब हिरे यांनी स्थापन केलेला हा संघ बराच काळ संपूर्ण राज्यात अत्यंत नावाजलेला व आर्थिकदृष्ट्या संपन्न अशा अवस्थेत राहिला. स्व. टी. आर. पवार व शिवरामदादा हिरे यांच्या अल्प कारकिर्दीचा अपवाद वगळता या संघावर सातत्याने हिरे समर्थकांचेच वर्चस्व राहिले. आता ही अखेरची संस्थाही हिरेंच्या हातून निस़टली. गेल्या काही काळापासून होत असलेले सततचे पराभव आणि राजकीय कोंडी यामुळे हिरेंनी तसाही मालेगावला रामराम ठोकला होताच; परंतु अधूनमधून अद्वय हिरे यांना लढण्याची खुमखुमी येते. पण, आता पूर्वीसारखा प्रभाव व शक्तीचा पाया राहिला नसल्याने हिरेंची भुसेंच्या नेतृत्वाच्या झंझावातापुढे पीछेहाट होते.
विद्यमान निवडणुकीत हिरेंच्या कोणत्याही पातीने अजिबात लक्ष घातले नव्हते. दस्तुरखुद्द अद्वय हिरे गेल्या पंधरा दिवसांत मालेगावात फिरकलेदेखील नाही, त्यामुळे या पराभवाशी हिरेंचा संबंध जोडणे योग्य नाही, असा दावा हिरे समर्थकांकडून केला जात आहे. वास्तविक, भुसेंच्या पॅनलविरोधात ज्या अशोक आखाडे यांनी लंगडे पॅनल उभे केले ते आखाडे कोण आहेत, कोणाचे आयुष्यभर निष्ठावान आहेत, हे मालेगाववासीयांना माहिती असल्याने या असल्या दाव्यांवर कोणाचाही विश्वास बसत नाही. मुळात, पाच पैसे उत्पन्नाच्या नावानेही बोंब असलेल्या या संघाच्या ओसाड गावच्या पाटीलकीसाठी निवडणुकीवर दौलतजादा करणे हाच गुन्हा. तो टाळण्यासाठी दस्तुरखुद्द दादा भुसे यांनी भरपूर प्रयत्न केले; परंतु हा संघ म्हणजे पिढीजात मालमत्ता असल्यागत हिरे समर्थकांनी बिनविरोधचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्याची योग्य ती शिक्षा त्यांना मिळाली असली तरी आता या संघाला ऊर्जितावस्थेत आणण्याची अत्यंत अवघड जबाबदारी निवडून आलेल्यांना पार पाडावी लागणार आहे.
एकेकाळी राज्यातील सर्वार्थाने दुसर्या क्रमांकाचा शेतकी संघ म्हणून नावलौकिक मिळविलेल्या या संघाची दुर्दशा कोणी केली याची उत्तरे मिळायला हवीत. आजच्या बाजारभावानुसार शब्दश: कोट्यवधीच्या मालमत्ता असूनही केवळ तीन कर्मचारी आणि त्यांच्या पगारालाही छदाम नाही, अशी अत्यंत विदारक अवस्था या संघाची आहे. या अवस्थेला संघाला आणून ठेवल्याबद्दल कोणालाच ना खेद ना खंत. कोणे एकेकाळी मालेगावसह बागलाण, नांदगाव व देवळा तालुयातील शेतकर्यांसाठी खर्या अर्थाने आधारवड ठरलेला हा संघ गेल्या काही वर्षांपासून खंगत गेला. तत्कालिन सत्ताधार्यांनी आर्थिक विपन्नावस्थेची कारणे वेळीच शोधली असती तर आजही हा संघ शेकडो शेतकर्यांचा पोशिंदा ठरला असता. रासायनिक खते, बी-बियाणे, शेती अवजारे, कापड, बांधकाम साहित्य, सिमेंट, स्टील अशा शेतकर्यांना लागणार्या सर्वप्रकारच्या साहित्याची नाममात्र दरात विक्री करणारा हा संघ पेट्रोलपंपही चालवायचा. रॉकेल विक्रीचाही परवाना मिळालेला होता. एका अर्थाने हा संघ म्हणजे तत्कालिन मॉलच होता. त्याची नीट, काळजीपूर्वक हाताळणी केली गेली असती तर तो केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात एक मॉडेल म्हणून पुढे नेता आला असता.
पाच-सहा वर्षांपूर्वी खते व बी-बियाणे विक्रीचा परवाना रद्द झाला आणि शेतकर्यांच्या संघाशी असलेल्या संबंधाचीही इतिश्री व्हायला सुरुवात झाली. संघाच्या मोयाच्या जागा विकसकाला दिल्या गेल्या. तेथे बांधले गेलेले गाळे, गोदाम यांची आज काय अवस्था आहे? त्यांची मालकी कोणाकडे आहे? या शेकडो गाळ्यांचे भाडे कोण घेते? कळवाडी, झोडगे, उमराणे येथील संघाच्या मालकीच्या जागांची नेमकी स्थिती काय आहे? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे निवडून आलेल्या नव्या मंडळींनाही द्यावी लागतील. आजवर संघाची लक्तरे वेशीवर टांगणारी मंडळी कोण आहेत, कोणी संघ लुटून खाऊन टाकला याचाही छडा लागला पाहिजे, या सगळ्याच अपेक्षा खर्या असल्या व तसेही व्हावे हेदेखील पटत असले तरी मुळात संघ पुन्हा नव्याने उभा राहणे आणि चालता होणे याला प्राधान्य मिळायला हवे. राजकीय सूडचक्रात शेतकरी हिताचा मुद्दा बाजूला पडायला नको. सध्या हिरेंचे काहीही दिसले तरी त्यामागे हात धुवून लागणे, हे फॅड झाले आहे. राजकारणापुरते ते ठीक असले तरी त्याचबरोबर अशा काही संस्थांची जपणूक करणे ही खरी गरज आहे. संघ खरोखरच नव्या दमाने उभा राहिला तर चार तालुयांमधील शेकडो शेतकरी दुवा देतील. हा आशीर्वाद राजकीय सुडातून मिळविलेल्या आनंदापेक्षाही मोठे समाधान देणारा असेल, हे विसरू नका. नव्या संचालकांचे अभिनंदन..




