Saturday, July 25, 2026
Homeनगरगोदावरीला मोठा पूर, निळवंडेही ओव्हरफ्लोच्या मार्गावर

गोदावरीला मोठा पूर, निळवंडेही ओव्हरफ्लोच्या मार्गावर

राहाता (तालुका प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसाने ९४४९७ क्युसेकने पाणी नांदुर मधमेश्वर बंधाऱ्यातून सोडले जात असल्याने गोदावरीला पूर आल्याने काही ठिकाणी गोदावरीने पात्र सोडले आहे. कोपरगावचा लहान पूल वाहतुकीसाठी बंद झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर बंधारा पाण्याखाली गेला आहे. खाली जायकवाडीत काल सायंकाळी ६ वाजता ३५.४९ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीचा घाटमाथा संततधार पावसाने झोडपून काढला आहे. त्यामुळे मध्यम प्रकल्प असलेले भावली, भाम, बालदेवी हे पूर्ण क्षमतेने भरून त्यांच्या सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग होत आहे. दारणा, गंगापूर, कडवा, पालखेड, पुणेगाव, गौतमी गोदावरी, भोजपूर तांत्रिकदृष्ट्या भरून नवीन पाण्याची आवक पाहता त्यातून विसर्ग सुरू आहेत. गंगापूर मधून १५३९४ क्युसेक, दारणातून १६९५८ क्युसेक, कडवातून १५७८० क्युसेक, भावलीतुन २५०० क्युसेक, पालखेड मधून ३१० क्युसेक, पुणेगाव मधून १७४८ क्युसेक, गौतमी गोदावरी १००० क्युसेक, वालदेवीतून २८३२ क्युसेक, भाम मधून ६१३८ क्युसेक, भोजपूर मधून २८०० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

काल दिवसभरात दारणाच्या पाणलोटातील इगतपुरी, घोटीला जोरदार पाऊस सुरू होता. भामच्या भिंतीजवळ दिवसभरातील १२ तासांत ९९ मिमी, भावलीच्या भिंतीजवळ १०९ मिमी, दारणा च्या भिंतीजवळ १७ मिमी पावसाची नोंद झाली. गंगापूरच्या पाणलोटात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. गंगापूर धरणाच्या पाणलोटात आंबोलीला काल दिवसभरात ५७, त्र्यंबकला २३, गंगापूरला १२, कश्यपीला २८०, गौतमीला १७ मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी संपलेल्या मागील २४ तासात दारणा धरणाच्या भिंतीजवळ १२१, मुकणे ११६, वाकी ११४, भाम २१२, भावली २४९, वालदेवी ८०, गंगापूर १६८, कश्यपी ९२, गौतमी गोदावरी १२४, त्र्यंबक १८९, आंबोली २०२, नाशिक ११९ मिमी असा पाऊस नोंदला गेला.

वरील धरणांचे विसर्ग आणि नांदुरमधमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोटात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी या बंधाऱ्यात दाखल झाल्याने गोदावरीत ९४४९७ क्युसेकने विसर्ग केला जात आहे. ९० हजाराच्या पुढे पाणी वाहू लागल्यानंतर गोदावरी तिचे पात्र सोडते. बंधाऱ्याच्या पश्चिम बाजूला असणारे सायखेडा, चांदोरी हा नाशिक जिल्ह्यातील परिसराचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे. राहाता तालुक्यातील शिर्डी पिंपळवाडी पुणतांबा रस्ता पाण्याखाली गेला आहे. कोपरगाव रस्ताही पाण्याखाली गेला. कोपरगावच्या लहान पुलाला पाणी लागले आहे. पुणतांबा पुरणगांव, नाऊर, कमालपूर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून २ दिवसात ४.५ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला आहे. काल सकाळी ६ पर्यंत १ जून पासून ८.६ टीएमसी पाणी गोदावरीतून जायकवाडीच्या दिशेने वाहून गेले आहे.

जायकवाडी ३५.४९ टक्के

जायकवाडीला काल सायंकाळी ६ वाजता नागमठाण सरिता मापन केंद्राजवळ गोदावरीत तीन तासांत सरासरी ५६३४० क्युसेकने पाण्याची आवक होत होती. याच वेळी जायकवाडी जलाशयात उपयुक्त साठा २७२०४ दलघफू म्हणजेच २७.२ टीएमसी पाणी साठा झाला होता. तर मृतसह एकूण साठा ५३.२७ टीएमसी झाला आहे.

निळवंडेही ओव्हरफ्लोच्या मार्गावर

भंडारदरा (वार्ताहर)

पाणलोटात आषाढ सरींचे तांडव सुरूच असून उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानंतर आता निळवंडे धरणही ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने ११०३९ दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू असल्याने ९० टक्के पाणीसाठा स्थिर ठेऊन गुरूवारी दुपारपासून प्रवरा नदीत पाणी सोडण्यास सुरूवात झाली आहे. पाऊस सुरूच असून पाण्याची आवक वाढल्याने भंडारदरातून मोठ्या प्रमाणात पाणी प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. परिणामी निळवंडेतील पाणीसाठा तासागणिक वाढत आहे.

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या घाटघर आणि रतनवाडीत आषाढसरींनी धुडगूस घातल्याने डोंगरदऱ्यांवरील धबधबे आक्राळविक्राळ रूप धारण करीत असून पाण्याच्या लोंढे धरणात विसावत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी सातत्याने वाढत आहे. काल सकाळी संपलेल्या २४ तासांत धरणात नव्याने तब्बल १२६६ दलघफू पाणी दाखल झाले. त्यापैकी ८३६ दलघफू पाणी धरणात जमा झाले. उर्वरित पाणी प्रवरा नदीत सोडण्यात आले हे पाणी निळवंडेत जमा झाले. सकाळी निळवंडेतील साठा ४६९४ दलघफू (५६टके) झाला होता. त्यानंतरही धो धो पाऊस कोसळत असल्याने भंडारदरातून सकाळ ८.१५ वाजता १४१८२ क्युसेकने सोडण्यात येत होते. पुन्हा पाण्याची प्रचंड आवक वाढल्याने सकाळी १० वाजता तब्बल २०११० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. काहीसा पाऊस कमी झाल्याने सायंकाळी ६ वाजेपासून धरणातून १४१८१ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यामुळे निळवंडेतील पाणीसाठा सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ७० टक्क्यांवर पोहचला होता. पाण्याची आवक अशीच राहिल्यास लवकर हेही धरण ओव्हरफ्लो सोडण्यात येणार आहे.

काल सायंकाळी भंडारदरातील १०१०० दलघफू (९१.४९टक्के) होता. तर गत ३६ तासांत तब्बल १८४९ दलघफू पाणी दाखल झाल्याने निळवंडेतील पाणीसाठा ५७७१ दलघफू (६९.२५टक्के) झाला होता. आढळातून ५८०२ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान, डोंगररांगा, रस्ते धुक्याने दाटून गेले असून जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी दिसत आहे.

ताज्या बातम्या

सहा लाखांच्या एमडी ड्रग्जसह राजस्थानच्या तरुणाला पकडले; दोघे कारसह पसार

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी निंबळक बायपास परिसरात कारवाई करत सुमारे पाच लाख ८३ हजार २०० रूपये किमतीचे २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह राजस्थानमधील एका...