Saturday, July 25, 2026
Homeनगरसहा लाखांच्या एमडी ड्रग्जसह राजस्थानच्या तरुणाला पकडले; दोघे कारसह पसार

सहा लाखांच्या एमडी ड्रग्जसह राजस्थानच्या तरुणाला पकडले; दोघे कारसह पसार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)

एमआयडीसी पोलिसांनी निंबळक बायपास परिसरात कारवाई करत सुमारे पाच लाख ८३ हजार २०० रूपये किमतीचे २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह राजस्थानमधील एका तरूणाला अटक केली. या कारवाईत ११ लाख ४३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोन संशयित साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. दरम्यान, गेल्या रविवारी तोफखाना पोलिसांनी सावेडीत कारवाई करून सुमारे १५५ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होतो. आता एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केल्याने अहिल्यानगर शहर व परिसरात मेफेड्रोन विक्रीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज मोंढे, पोलीस अंमलदार उमेश शेरकर, सचिन हरदास, सूरज देशमुख, अक्षय रोहोकले आदींचे पथक शुक्रवारी (२४ जुलै) सकाळी हद्दीत गस्त व फरार आरोपींचा शोध घेत होते. यावेळी निंबळक बायपास रोडवरील लामखेडे पेट्रोल पंपाच्या पुढे दोन विनानंबर चारचाकी वाहने संशयास्पदरीत्या उभी असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी चौकशीसाठी जवळ जाताच दोघे एका कारमधून पळून गेले. मात्र तेथे उभ्या असलेल्या विनानंबर स्विफ्ट कारजवळील तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव रविप्रकाश भेराराम बिश्नोई (वय २९, मूळ रा. विरावा, ता. शितलवाना, जि. जालोर, राजस्थान, सध्या रा. करमाळा, जि. सोलापूर) असे सांगितले. त्याच्याकडील माहिती संशयास्पद वाटल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार एनडीपीएस कायद्यानुसार पंचांसमक्ष तपासणी
करण्यात आली.

स्विफ्ट कारच्या मागील सीटवरील प्लास्टिकच्या पिशवीत २५.४९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) तसेच १.२६ ग्रॅम, १.१९ ग्रॅम आणि १.२२ ग्रॅम वजनाच्या तीन स्वतंत्र पुड्या आढळून आल्या. संशयित आरोपीने हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी फिर्यादीत नमूद केले आहे. जप्त केलेल्या एमडीची एकूण वजन २९.१६ ग्रॅम असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोनसह, स्विफ्ट कार, मोबाईल असा ११ लाख ४३ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

कारवाईदरम्यान दुसऱ्या कारमधून पळून गेलेल्या दोन संशयितांपैकी एका व्यक्तीचे नाव तांबे (पूर्ण नाव माहिती नाही) असल्याचे समोर आले असून दुसरा संशयित अद्याप अनोळखी आहे. दोघांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजस्थानहून एमडी ड्रग्जचा पुरवठा ?

अटक करण्यात आलेल्या संशयितरविप्रकाश बिश्नोई याने चौकशीदरम्यान हे एमडी ड्रग्ज विक्रीसाठी अहिल्यानगरात आणल्याची माहिती दिली आहे. तसेच हे ड्रग्ज राजस्थानमधून आणले जात असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. संशयित रविप्रकाश बिश्नोई हा मूळचा राजस्थानचा असून सध्या तो सोलापूर जिल्ह्यात वास्तव्यास आहे. सोलापूरमधून तो अहिल्यानगर शहर व परिसरात एमडी ड्रग्जचा पुरवठा आणि विक्री करत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या अनुषंगाने त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू असून ड्रग्ज पुरवठा साखळीतील इतर साथीदारांची माहितीही मिळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ताज्या बातम्या