Monday, July 22, 2024
Homeनगर240 गावांचा पाणीप्रश्न सुटणार

240 गावांचा पाणीप्रश्न सुटणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन अंतर्गत 830 पाणी योजनांपैकी 225 पाणी योजनांची यशस्वी चाचणी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झाली आहे. त्यामुळे या 225 योजनांद्वारे 240 गावांतील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकारण यांच्यामार्फत जिल्ह्यात जल जीवन मिशन योजना राबवण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेमार्फत 830 योजना 927 गावांमध्ये सध्या प्रगतीपथावर आहेत. या योजनांमार्फत अतिदुर्गम, दुष्काळी, तसेच वाड्या-वस्त्यांना प्रति माणसी 55 लिटर प्रति दिन शुध्द पाणी पुरवठा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून या योजनांची कामे सुरू होती.

15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला यातील सुमारे 225 योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यामुळे या योजनांव्दारे संबंधीत गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. नजिकच्या काळात योजनांची किरकोळ उर्वरित कामे पूर्ण करुन लोकप्रतिनिधींच्या हस्ते या योजना कार्यान्वीत होणार आहेत. या 225 योजनांच्या माध्यामातून 240 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मिटणार असून यातील बहुतांश गावांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळाव्दारे शुध्द पाणी उपलब्ध होणार आहे. उर्वरित योजना डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिली.

ही गावे होणार टँकरमुक्त

या योजनेमुळे बहुतांश गावे टँकरमुक्त होणार आहेत. नुकतेच मुधोळवाडी (ता. संगमनेर), नवसारवाडी, औटेवाडी व नेटकेवाडी (ता. कर्जत) ही गावे टँकरमुक्त झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आला आहे.

पाणी योजनेची चाचपणी झालेली गावे

कोपरगाव 20, संगमनेर 23, पाथर्डी 16, श्रीगोंदा 20, पारनेर 10, श्रीरामपूर 13, जामखेड 20, कर्जत 21, नगर 17, नेवासा 12, राहुरी 24, शेवगाव 15, राहाता 6 आणि अकोले 8 अशा 225 गावाचा यात समावेश आहे.

जलजीवन मिशनमुळे जिल्ह्यातील 225 योजनांची चाचणी यशस्वी झाल्याचे समाधान आहे. शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील योजना उत्तम प्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पाणी योजनांसंदर्भात नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्याबाबत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.

- Advertisment -

ताज्या बातम्या