Thursday, August 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलिस ठाण्याबाहेर दुसऱ्या दिवशीही ठिय्या

Nashik News : रिंगरोड बाधित शेतकऱ्यांचा इंदिरानगर पोलिस ठाण्याबाहेर दुसऱ्या दिवशीही ठिय्या

मुख्यमंत्र्यांच्या भेटीशिवाय आंदोलन मागे घेणार नाही

- Advertisement -

सातपूर l प्रतिनिधी Satpur

नाशिक परिक्रमा मार्ग (रिंगरोड) व हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर पोलिस ठाण्याबाहेर सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाचा बुधवारी दुसरा दिवस होता. पाऊस, ऊन आणि प्रतिकूल परिस्थितीची पर्वा न करता शेतकरी व महिला मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी ठामपणे बसले आहेत. या आंदोलनाला किसान सभा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर पाठिंबा दिला.

किसान सभेचे कॉम्रेड राजू देसले, मनसेचे नेते सुदाम कोंबडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सुनील कोथमीरे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.

दरम्यान, रिंगरोडच्या प्रश्नामुळे निर्माण झालेल्या नैराश्यातून पिंपळगाव खांब येथील संपत नथु बोराडे, प्रेमा गोपाळ बोराडे आणि रेखा रामदास मुंडे या तीन शेतकऱ्यांचे अनुक्रमे २२, २३ आणि २४ ऑगस्ट रोजी दुःखद निधन झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. आंदोलनस्थळी या तिन्ही शेतकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या घटनांमुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र दुःख आणि संतापाचे वातावरण असून, ‘शासनाला अजून किती शेतकऱ्यांचे बळी पाहिजेत?’ असा सवाल करण्यात आला.

नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन यापूर्वी दिले होते. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी यापूर्वीचे उपोषण मागे घेतले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक बैठक झाली असली तरी त्यानंतरची अपेक्षित बैठक अद्याप झालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ‘पालकमंत्र्यांना रक्षाबंधनासाठी वेळ आहे; मात्र न्यायासाठी पोलिस ठाण्याबाहेर बसलेल्या शेतकरी महिलांना भेटण्यासाठी वेळ नाही,’ अशी खंत आंदोलनकर्त्या महिलांनी व्यक्त केली.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधून आपल्या घर-संसार आणि शेतीचे रक्षण करण्याचे आवाहन करण्यासाठी शेतकरी महिला मुंबईकडे रवाना झाल्या होत्या. मात्र त्यांना मुख्यमंत्र्यांची भेट घेता आली नाही. त्यामुळे ‘लाडकी बहीण ही केवळ राजकारण आणि मतांसाठी आहे का? न्याय मागणाऱ्या त्याच लाडक्या बहिणींचा आर्त आवाज शासन कधी ऐकणार?’ असा सवाल महिलांनी उपस्थित केला.

रिंगरोडच्या भूसंपादन आणि अलाइनमेंटबाबत शासनाच्या वरिष्ठ स्तरावर चुकीची माहिती दिली जात असल्याचा आरोप शेतकरी प्रतिनिधींनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत झालेली जमीन खरेदी सुमारे १४ टक्केच आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. आंदोलनाचा दुसरा दिवस उलटूनही जिल्हाधिकारी किंवा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची विचारपूस न केल्याबद्दलही आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

करण गायकर म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आणि कार्यक्षम नेते असून सकारात्मक दृष्टिकोनातून रिंगरोडचा प्रश्न सोडवतील, असा शेतकऱ्यांना आजही विश्वास आहे. मात्र निर्णयास होणारा विलंब आता शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. आणखी शेतकरी गमवायचे नाहीत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांशी चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

रिंगरोड व हायवे क्रमांक २९ बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर बैठक होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, शिवाजी मोरे, प्रवीण पाटील, वैभव दळवी, योगेश गांगुर्डे, भारत पिंगळे, गोरख जाधव, आकाश जाधव, शुभम देशमुख, सोमनाथ बोराडे, संजय नवले, त्र्यंबक कोंबडे, सुनील कोथमीरे, तानाजी गवळी, सागर जाधव, संदीप दोंदे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : तरुणाचा गळा आवळून खून

0
ओझर | प्रतिनिधी Ozar ओझर शहरातील मध्यवर्ती असलेल्या संभाजी चौक परिसरात एका तरुणाची गळा आवळून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. भरवस्तीत घडलेल्या...