नाशिक | शैलेंद्र तनपुरे- दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
पोलिसांच्या धडक कारवायांमुळे यावेळी दिवाळी कमालीची शांततेत व खर्याखुर्या आनंदात साजरी झालेली पाहायला मिळाली. पोलीस यंत्रणा आपले जीवन किती व कसे व्यापून राहिली आहे, याचा अत्यंत उत्तम व चांगला अनुभव यंदा आला. पोलीस हे त्यांच्या ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदाला जागले तर सामान्यांचे जीवन कसे सुकर होत जाते याचा सुखद अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत.
चला, झाली एकदाची दिवाळी. यंदा जीएसटीचे दर कमी झालेले असल्याने बाजारपेठा भरभरून वाहत होत्या. वाहनांच्या कंपन्यांचीही दिवाळी झाली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या असल्याने तमाम मतदारांचीही यंदाची दिवाळी अंमळ चांगलीच गेली. सतराशे साठ पक्ष आणि त्यांचे तेवढेच इच्छुक यामुळे असंख्य गोष्टी घरपोच मिळाल्या. अनेकांना तर भरपेट बरेच काही मिळाले. मतदारांनीही प्रत्येकाचेच तोंडभरून स्वागत करून आम्ही तुमचेच असे आश्वासन दिल्याने अनेक इच्छुकांचीही दिवाळी झाली. नाशिक शहरातील गुन्हेगार व गुंडांचे मात्र या दिवाळीत ‘दिवाळं’ निघालं. पोलिसांनी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असा नारा देत सुरू केलेल्या कारवाईमुळे शेकडो गुन्हेगारांना पोलिसांनीच ‘फराळ’ दिला. ‘फटाके’ही दिले. त्यामुळे या गुंडांची दिवाळी वेगळ्या अर्थाने साजरी झाली.
पाच-पन्नास गुंडांची तर दिवाळी तुरुंगातच झाली. त्यांच्या काही भाईबंदांना वनवासात दिवाळी साजरी करावी लागली. पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईमुळे ‘दिवाळी’ची सवय लागलेल्या डिपार्टमेंटमधील काहींना मात्र कर्तव्यकठोरतेच्या समाधानाची दिवाळी साजरी करता आली. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ असे संत ज्ञानेश्वरांनी म्हटले ते उगीच नाही. ज्यांनी जे जे अपेक्षिले ते त्यांना मिळाले. आता गुन्हेगारांनी थोडीच फराळ मागितला असणार, पण तरीही त्यांना तो कसा मिळाला, असा सवाल काहींच्या मनात येऊ शकतो. परंतु ही कारवाई त्यांच्या सुप्त मनातील म्हणजेच मनोवांछित असेल. गुन्हेगार, गुंड हे जनमानसात कितीही दहशत माजविणारे असोत, प्रत्यक्षात त्यांच्याएवढे भित्रे लोक नसतात, असे मानसशास्रज्ञ सांगतात. याची पुष्टी करायची असेल तर पोलीस आयुक्त व त्यांच्या सहकार्यांना जरूर विचारा.
कारण दंडातील बेटकुळ्या फुगवून लोकांमध्ये फुकाची दहशत माजविणारे जेव्हा पोलिसांच्या तावडीत येतात तेव्हा गर्भगळीत होऊन हात जोडून गयावया करताना कसे केविलवाणे भासतात हे कळेल! म्हणूनच समाज हाच धष्टपुष्ट असायला हवा. तसा तो असला तर अशा गुंड-पुंडांचे फावत नाही. असो, कोणाला काय मिळावे हा ज्याचा त्याचा कर्मसिद्धांत ठरविल. म्हणूनच चांगले कर्म करीत जावे. फळाची चिंता करू नये. ते आज ना उद्या आपसूकच मिळेल, असे संत, महात्मे नेहमीच सांगत असतात. या दिवाळीने असेही आगळेवेगळे समाधान नाशिककरांना नक्कीच दिले.
लाडक्यांची दिवाळी
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामपंचायती व महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सर्वच निवडणुका येऊ घातल्या आहेत. येत्या दोन ते तीन महिन्यांत सर्वत्र केवळ निवडणुकांचा माहौल असेल. या वातावरणाचा ज्वर गेल्या महिन्यापासून तापला आहेच, पण या दिवाळीने त्या उत्साहाला चार चाँद लावलेत हे मात्र कोणालाही नाकारता येणार नाही. निवडणुका आल्या की आपले मायबाप सरकारदेखील हल्ली गल्लीबोळातील इच्छुकांप्रमाणे मतदारांना मधाचे बोट लावत असते. यंदा तर केंद्राने बंपर लॉटरीच फोडली. जीएसटीचे दर कमी केले. साहजिकच अनेक वस्तूंच्या किमती कमी झाल्या आणि सामान्यांच्याही आवायात बाजार आला. दुचाकी व चारचाकींच्या बाजाराने तर दोन-चार वर्षांची बेगमी करून ठेवली. सोने-चांदीच्या किमती आभाळाला भिडल्या असल्या तरी त्या आणखी आवायाबाहेर जाऊ नये म्हणून अनेकांनी तशाही स्थितीत सुवर्ण खरेदीची धूम केली.
‘हम भी कुछ कम नहीं’ असे म्हणत राज्य सरकारनेही मग आपली खंगलेली आर्थिक प्रकृती बाजूला ठेवून लाडया बहिणींचे लेखापरीक्षण तूर्तास थांबवून थकलेले हप्ते देऊन टाकले. गावागावांतील ठेकेदार मात्र त्याकडे आशाळभूतपणे पाहत आपल्यादेखील थकबाकीचे कधीतरी चांगभले करा, असे मनातल्या मनात म्हणत राहिले. पण त्यांना दुसरा पर्याय नसल्याने ते काही करू धजावणार नाहीत हे कळून चुकलेल्या सरकारने मग त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. आजच्या वेगळ्या परिस्थितीत पुन्हा या लाडयाच आपल्या तारणहार असल्याचे एव्हाना सर्वच सरकारांना कळून चुकलेले असल्याने तिकडे बिहारमध्येही निवडणुकीपूर्वी लाडया बहिणींच्या खात्यात प्रत्येकी दहा हजार रुपये केंद्राने जमा केले. आपल्या ‘पारदर्शी’ निवडणूक आयोगाला अशा प्रकरणात काहीही वावगे वाटत नाही. ‘हा’ निवडणुकीतील लाचेचा भाग वाटत नाही, हे तर मतदारांचे परमभाग्यच! कारण आयोगाने आक्षेप घेतला असता तर लक्षावधी लाडयांची दिवाळी अंधारात गेली असती. मायबाप सरकार केवळ उदारच नाही तर त्यांनी निवडणुकीनिमित्ताने गोरगरीब आमदारांवरही विकासकामांसाठी कोट्यवधीची खैरात केली आहे. हा सारा विकास लोकांसाठीच असल्याने आता मतदारांचे आणखी कल्याण होणार. साहजिकच यंदाची दिवाळी असे खूप काही घेऊन आली आणि बाजाराला उठवून (झळाळून) गेली.
सांस्कृतिक क्रांती
निवडणुकीला इच्छुक असलेल्यांना तर यंदा मतदार बंधू-भगिनींसाठी काय करू अन् काय नको असे होऊन गेले होते. पहाट पाडव्याची संस्कृती अलीकडे सर्वत्र चांगली रुजली आहेच, पण अगदी गल्लीबोळातही यंदा सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहून अनेकांना नवी सांस्कृतिक क्रांतीच झाल्याचा भास झाला असणार. लोकांना बरे वाटावे म्हणून काहींनी पहाट पाडव्याला पर्याय म्हणून भाऊबीज पहाट, सांज पाडवा, नरकचतुर्दशी अभ्यंग अशा विविधांगी कार्यक्रमांद्वारे सर्वांचीच सांस्कृतिक भूक भागवून दाखविली. काहींनी तर हे सांस्कृतिक अजीर्ण तर होणार नाही ना, अशी साधार शंकाही व्यक्त केली. परंतु संस्कृती रक्षकांनी आता खरी धर्माची पहाट उगवली हा उदात्त विचार पसरवून (पक्षी-व्हायरल करून) तत्काळ ही वैचारिक बांडगुळं छाटून टाकली. असा तृप्ततेचा अनुभव घेत असतानाच घरोघरी दिवाळी अंक, फराळाचे पुडे, फटाके, भेटवस्तू, मिठाया, शुभेच्छा पत्रे अशांच्या वर्षावात नाशिककर चिंब भिजलेदेखील. हा खरा अमृत वर्षाव म्हणून अनेकांनी अशी दिवाळी गेल्या दहा हजार वर्षांत आली नव्हती, असेही बोलून दाखविले.
गेटेड कम्युनिटीज, मोठ्या हाऊसिंग सोसायट्या आदींमध्ये तर काहींनी सामूहिक दिवाळीचेच आयोजन करून जणू सार्वजनिक गोडवाच निर्माण केला. एकाच कार्यक्रमात अशी गठ्ठा कमाई करण्याच्या ‘कल्पनेची आयडिया’ म्हणजे भारीच, नाही का! अशाही स्थितीत काहींनी आपल्या तात्त्विक, वैचारिक भावनाही कमालीच्या काटेकोरपणे पाळल्या. ठराविक रंगाचा झेंडा लावलेल्या दुकानांतूनच आपल्या लोकांनी खरेदी करायची असा फतवा काढला. दुर्दैवाने हा फतवा खूपच क्षीण ठरला. कारण लोकशाहीचा उत्सवच असा काही दांडगा होता की ही धार्मिक दांडगाई कुठल्या कुठे विरून गेली. त्याची साधी चर्चाही कोणी केली नाही. कोणा माध्यमालाही ती दिसू नये एवढी ती क्षुल्लक ठरली.
आनंदी आनंद गडे..
निवडणुका खुल्या वातावरणात पार पडाव्यात, दबाव, दहशतीचे वातावरण असता कामा नये या उद्देशाने गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या मिशन कायद्याच्या बालेकिल्ल्यामुळेही यंदाची दिवाळी अनेकांच्या स्मृतिपटलावर चांगल्या आठवणी कोरून गेली असणार. दिवाळीत औद्योगिक वसाहत जवळपास ठप्प असते. म्हणजे उद्योग, कंपन्या पूर्णत: बंदच असतात. गेल्या काही वर्षांचा अनुभव असा की या काळात बाहेर दीपावलीचा उत्साह साजरा होत असला तरी प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये मात्र चोराचिलट्यांची दिवाळी होत असे. कंपन्यांमधील चोरीच्या घटनांनी अनेकदा तर उद्योजकांना डोयाला हात लावून बसण्याशिवाय पर्याय नसायचा. लघुउद्योजकांना तर छोट्या चोर्याही जीवघेण्या वाटत असत. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून दिवाळीपूर्वी पोलीस व उद्योजकांच्या संयुक्त बैठका घेतल्या जात आहेत.
कंपन्या आता स्वत:चीच सुरक्षा यंत्रणाही वापरायला लागल्या असल्या तरी त्यालाही मर्यादा असतात. कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीसच लागतात. धाक हा केवळ पोलिसांचाच असू शकतो. गणवेशातील बाऊन्सरचा नाही. गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांविरोधातील पोलिसांच्या धडक कारवायांमुळे यावेळी उद्योग वर्तुळातही समाधानाचे वातावरण दिसते आहे. चोर्यांचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. असंख्य गुन्हेगार एकतर तुरुंगाची हवा खात आहेत किंवा पोलिसी फराळ खाऊन गप्पगार तरी झालेले आहेत. याशिवाय राजकीय गुन्हेगारांना पद्धतशीर त्यांची लायकी दाखवून दिल्यामुळे त्यांच्या जीवावर माज करणारे काही व्हाईट कॉलर गुंडही बिळात लपले आहेत. केवळ एवढेच नाही तर या गुंडांच्या भरवशावर गल्लीबोळात राजकारण करू पाहणार्यांचीही हवा गुल झाली. सणासुदीला व्यापारी, गोरगरीब व्यावसायिक, ज्यांचे पोट रोजच्या हातकमाईवर आहे अशांना धाकदपटशा दाखवून दिवाळी मागण्याच्या नावाखाली लूट करणार्यांचीही बोलती यावेळी बंद झालेली दिसली.
कोणी असे उद्योग करीत असतील तर अशांची अगदी निनावी तक्रार जरी पोलिसांकडे केली तरी त्यांच्यावर कारवाई करू, त्यांची हमखास धिंड निघेल, असे जाहीर आश्वासनच नाशिक पोलिसांनी दिलेले असल्याने भाई, दादा आपापल्या घरात गपगुमान बसले. अशांच्या घरच्यांनाही त्यामुळे दिवटा घरीच राहिल्याचा आनंद व तीच खरी दिवाळी मानून समाधान वाटले असेल. पोलिसांच्या या कारवायांमुळे यावेळी दिवाळी कमालीची शांततेत व खर्याखुर्या आनंदात साजरी झालेली पाहायला मिळाली. पोलीस ही यंत्रणा आपले जीवन किती व कसे व्यापून राहिली आहे, याचा अत्यंत उत्तम व चांगला अनुभव यंदा आला. पोलीस हे त्यांच्या सद्रक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीदाला जागले तर सामान्यांचे जीवन कसे सुकर होत जाते याचा सुखद अनुभव सध्या नाशिककर घेत आहेत. या अनुभवाला कोणाची नजर न लागो, ही सदिच्छा.




