
मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
भरधाव इनोव्हा कारने रस्ता ओलांडणार्या बारा वर्षीय विद्यार्थीनीस जोरात धडक दिल्याने ती गंभीररित्या जखमी होवून जागीच गतप्राण झाली. कुसूंबा-मालेगाव रस्त्यावर लेंडाणे गावालगत सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. गतीरोधकाअभावी वाहने भरधाव नेली जात असल्याने अपघात घडून बालिकेचा बळी गेल्याने संतप्त झालेल्या लेंडाणे व परिसरातील महिला व ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या मांडत रास्तारोको आंदोलनास प्रारंभ केला. यामुळे कुसूंबा-मालेगाव रस्त्यावरील वाहतूक पुर्णत: ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, महामार्गावरील लेंडाणेसह इतर गावांलगत गतीरोधक टाकावे व उड्डाणपुलाची निर्मिती करावी या मागण्या जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी मान्य करत उपाययोजनेस प्रारंभ करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा व रास्तारोको सुरूच ठेवण्याचा पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनाची माहिती मिळताच पोलीस व महामार्ग प्राधिकरण अधिकार्यांनी लेंडाणे येथे धाव घेत महामार्गावर गतीरोधक टाकण्याचे काम तात्काळ सुरू केले जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांना दिल्यानंतरच चार तासानंतर हे रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले.
या अपघाताचे अधिक वृत्त असे की, आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास आरोही बालाजी चव्हाण (१२) ही विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी रस्ता ओलांडत असतांना कुसूंबामार्गे मालेगावकडे भरधाव जात असलेल्या इनोव्हा कार क्र. एम.एच.-०६-बी.ई.-०५५५ ने आरोहीस धडक दिल्याने ती फेकली जावून गंभीररित्या जखमी झाली. ही घटना पाहणार्या ग्रामस्थांनी धाव घेत इनोव्हा अडवित तिच्यातूनच जखमी असलेल्या आरोहीला मालेगाव येथे खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासणीअंती ती मृत असल्याचे घोषीत केले.
बालिकेचा कारच्या धडकेने मृत्यू झाल्याचे वृत्त लेंडाणे येथे पसरताच महिलांसह ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पसरले. गतीरोधक टाकला जात नसल्यानेच या मार्गावर आरोहीसह काहींचा बळी गेला तर अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. गतीरोधकाची मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संतप्त महिला व ग्रामस्थांनी महामार्गावर ठिय्या देत रास्तारोको आंदोलनास प्रारंभ केला. या आंदोलनाची माहिती मिळताच वडनेर-खाकुर्डी व तालुका पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
लेंडाणे गावालगत गतीरोधक नसल्याने भरधाव जाणार्या वाहनांमुळे दर आठवड्याला लहान-मोठे अपघात घडत आहेत. लेंडाणे गाव दोन विभागात विखुरलेले असल्याने ग्रामस्थांना रस्ता ओलाडतांना जीव मुठीत धरावा लागतो. तीव्र उतारावरून वाहने भरधाव वेगात येत असतात. त्यामुळे मुलांसह ग्रामस्थ व वृध्दांना रस्ता ओलांडणे अवघड झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत रास्तारोको मागे घेतला जाणार नाही, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. पोलीस उपअधिक्षक घोरपडे, सपोनि प्रिती सावंतजी यांच्यासह महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढली. महामार्गावर गतीरोधक टाकण्याचे काम तातडीने सुरू केले जाईल, असे आश्वासन या अधिकार्यांनी दिल्यानंतरच संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात बाजार समिती माजी उपसभापती सुनिल देवरे, अण्णा पवार, शरद देसले, संभाजी मोरे, अशोक सोनवणे यांच्यासह मोंठ्या संख्येने लेंडाणे येथील महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
कुसूंबा-मालेगाव महामार्गावर अपघातस्थळ ठरलेल्या लेंडाणे गावालगत गतीरोधक टाकावेत अशी मागणी ग्रामपंचायतीतर्फे अनेकदा संबंधित विभागाकडे केली गेली. मात्र याकडे अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच बालिकेचा बळी गेला आहे. या मार्गावर दुभाजक देखील चुकीच्या पध्दतीने तयार केल्याने ते अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहे. अपघातात निरपराधांचा बळी टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
सुनिल देवरे,
माजी उपसभापती, बाजार समिती




