नाशिक, दि. २७ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) :
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच योग्य नियोजन करावे. जिल्ह्यात पाणीटंचाई किंवा चाराटंचाईचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. पिण्याचे पाणी, नागरिकांच्या हाताला काम, जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था याबाबत प्रशासनाने सर्वंकष तयारी करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन सभागृहात आज सकाळी आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, महाराष्ट्र राज्य विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुहास कांदे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार भास्कर भगरे, आमदार किशोर दराडे, आमदार पंकज भुजबळ, आमदार गोकुळ गीते, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार दिलीप बोरसे, आमदार नितीन पवार, आमदार दिलीप बनकर, आमदार अॅड. राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, आमदार हिरामण खोसकर, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, राकेश सेपट, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे (नाशिक), डॉ. कश्मिरा संख्ये (कळवण), जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, प्रकाश काळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने पूर्ण क्षमतेने सज्ज राहणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. दुष्काळी परिस्थितीत पाणीपुरवठा, जनावरांसाठी चारा आणि पिण्याचे पाणी या बाबतीत कोणतीही कमतरता राहता कामा नये. जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक अधिकाऱ्याने आपली भूमिका प्रभावीपणे पार पाडावी. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी उपस्थित राहून कामकाज करावे.
जिल्हा वार्षिक योजनेतील मंजूर कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामांचा दर्जा व गुणवत्ता राखावी, तांत्रिक मान्यतेची प्रक्रिया गतिमान करावी, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, वीजपुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करावे, गोदावरी नदीतील पानवेली काढण्याची कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. विकासकामांच्या अंमलबजावणीत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन राजशिष्टाचाराचे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांना गती देतानाच संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोदावरीमध्ये थेट सांडपाणी मिसळू नये, यासाठी सांडपाणी वाहिन्या आणि प्रक्रिया केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे.
आगामी चार ते पाच महिन्यांत ही कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, कुंभमेळ्याच्या मुख्य पर्वणीपूर्वी गोदावरीत स्वच्छ पाणी प्रवाहित करण्याचा प्रयत्न आहे. गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ करून ते नदीपात्रात सोडले जाईल, जेणेकरून भाविकांना रामकुंड परिसरात स्वच्छ पाण्याचा अनुभव घेता येईल. गोदावरी नदीला वर्षभर प्रवाही ठेवण्याबरोबरच तिचे प्रदूषण रोखणे हेही महत्त्वाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्यापर्यंत नाशिकमधील अनेक विकासकामे पूर्ण होतील आणि त्यानंतर नाशिकचे रूप पाहून देशाचे लक्ष वेधले जाईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला. शहरातील हरितीकरणाच्या कामाचाही त्यांनी उल्लेख केला. सुमारे ७० हजार झाडे लावण्यात आली असून, त्यांना ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत दिले जात आहे. ही झाडे मोठी होत असून, पर्यावरण संवर्धनाचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले की,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास आणि शैक्षणिक गरजांची पूर्तता करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा.या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्या शैक्षणिक सुविधा, शाळांच्या इमारती, दुरुस्ती आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत.
शाळांच्या विकासासाठी केवळ शासनाच्या आदेशांवर अवलंबून न राहता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि संबंधित विभागांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. सर्वांनी या विषयाला प्राधान्य दिल्यास जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे प्रश्न निश्चितपणे मार्गी लागू शकतील. दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व चारा तसेच रोजगार हमी योजनेच्या कामांचेही आतापासून नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. पुढील नऊ महिन्यांच्या संभाव्य परिस्थितीचा विचार करून सर्व विभागांनी आपापल्या स्तरावर पूर्वतयारी करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. आमदार कांदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
महानगरपालिका आयुक्त खत्री यांनी महानगरपालिकेतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा सादर करताना सांगितले की, नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या व जिल्हा वार्षिक योजनेच्या अनुषंगाने विविध विकासकामांना वेग आला आहे. या कामांचा स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. कृषी संलग्न क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांमध्येही वाढ झाली आहे. भविष्यात दुष्काळावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून नाशिक जिल्ह्याचा विकास दर वाढविण्यासाठी विविध उपक्रमांचीही माहिती त्यांनी बैठकीत दिली.
या बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदार संघासह जिल्ह्यातील विविध विकासकामे, नागरिकांच्या समस्या आणि दुष्काळी उपाययोजनांबाबत विविध मौलिक सूचना मांडल्या. जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे यांनी बैठकीचे सूत्रसंचालन केले.




