मुंबई / प्रतिनिधी Mumbai
आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने कार्यरत असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या कामकाजाला आता सोशल स्टॉक एक्स्चेंजच्या माध्यमातून नवी दिशा मिळू शकते. सोशल स्टॉक एक्स्चेंज हे सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणीचे नियमबद्ध व्यासपीठ आहे.
या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या पात्र संस्था आणि देणगीदार यांच्यात समन्वय साधता येतो. राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या नव्या व्यासपीठाद्वारे मिळणाऱ्या अतिरिक्त मदतीचा लाभ राज्यातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी होणार आहे.
राज्यात मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून हृदयरोग, कर्करोग, किडनी विकार, यकृतविकार, मेंदूविकार तसेच अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या काही वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे मदत मिळावी यासाठी अर्ज करणाऱ्या रुग्णांची संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजमुळे अशा निधी उभारणीला व्यापक स्वरूप मिळण्याची शक्यता आहे.
सोशल स्टॉक एक्स्चेंज म्हणजे नेमके काय?
सामान्य शेअर बाजारात कंपन्यांचे शेअर्स खरेदी-विक्री केले जातात. मात्र सोशल स्टॉक एक्स्चेंजमध्ये सामाजिक आणि लोककल्याणकारी कामांसाठी निधी उभारणी केली जाते. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) येथे सेबीच्या (एसईबीआय) नियमनाखाली हे व्यासपीठ उपलब्ध आहे. पात्र ना-नफा संस्था या व्यासपीठावर नोंदणी करून झिरो कूपन झिरो प्रिन्सिपल या माध्यमातून निधी उभारू शकतात. या माध्यमातून देणगीदारांना सामाजिक कामांसाठी योगदान देण्याची संधी मिळते.
गरजू रुग्णांसाठी मोठी संधी
मुख्यमंत्री सहायता निधीचा मुख्य उद्देश आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गरजू रुग्णाचे उपचार थांबवू नयेत हा आहे. सोशल स्टॉक एक्स्चेंजसारख्या निधी उभारणीच्या माध्यमातून सामाजिक सहभाग वाढविणे आणि कॉर्पोरेट क्षेत्राला जोडणे शक्य होणार आहे.
‘येत्या काळात दुर्मीळ, महागड्या आणि अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाच्या प्रस्तावांची नोंदणी आता सोशल स्टॉक एक्सचेंज या नव्या व्यासपीठावर करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग वाढणार आहे’
रामेश्वर नाईक, कक्षप्रमुख, मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष




