नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक
अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या उरल्या-सुरल्या जीवनेच्छाही मारुन टाकल्या. अजूनही तो बरसतोच आहे. दररोज नवनव्या तारखा जाहीर होत असून, पर्जन्यराजाचा मुक्काम वाढतच चालला आहे. ‘अतिथी तुम कब जाओगे’ या शीर्षकाच्या एका हिंदी सिनेमात पाहुण्याने मुक्काम वाढवल्याने यजमानांची झालेली त्रेधातिरपीट दाखवण्यात आली होती. त्यातील विनोदामुळे तो चित्रपट अनेकांनी भावलाही असेल. परंतु सध्या पावसाने जो थांबून-थांबून धुमाकूळ चालवला आहे, त्यामुळे आता जे त्याची चातकासारखी वाट पाहत असतात, तेच ‘हात जोडतो बाबा, पण तू आता जा’, असे मनोमन म्हणत आहेत. यंदा मे महिन्यापासूनच पावसाने दंगा करायला सुरुवात केली होती. तेव्हा उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्यांना हायसे वाटले होते. परंतु तेव्हापासून आजपर्यंत तो बरसतोच आहे.
दुष्काळी मराठवाड्यात तर अतिवृष्टीनेच ठाण मांडले आणि शतकातील सर्वाधिक हानी झाली. आठ ते दहा दिवस गावागल्ल्यांत, शेतीवाड्यांत पाणी साठून राहिल्याने ग्रामस्थ व शेतकर्यांच्या डोळ्यांतील अश्रूही संपले. अनेक ठिकाणी शेतातील मातीही खरवडून गेली. या महाभयंकर अस्मानी संकटामुळे आयुष्यातूनच उठलेल्या लोकांसाठी शासनाने मदतीचा हात दिला असला तरी आभाळच फाटले तेथे सरकार कुठे पुरे पडणार होते? साहजिकच ठिकठिकाणच्या संस्था, आस्थापने, धर्मादाय संस्था आदींनी मराठवाडा पूरग्रस्तांसाठी मदतनिधी द्यायला सुरुवात केली. परिस्थितीच अशी आहे की, कितीही मदत केली तरी ती पुरणार नाही. त्यामुळेच अशा संस्थाच्या मदतीने सरकारच्या मदतीलाही हातभार लागला. अनेक देवस्थानांनीही यानिमित्ताने आपापल्या मदतीचा हात खुला केला. कोणी किती मदत दिली यापेक्षा ती तातडीने दिली गेली, याला अधिक महत्व असल्याने या आलेल्या मदतीबद्दल शासनातर्फे समाधानच व्यक्त केले गेले.
देवस्थानांकडे आलेला पैसा हा भाविकांच्या श्रध्देचा असतो. देवाला शुद्ध भावनेने अर्पण केलेला हाच पैसा असा आपद्ग्रस्तांच्या मदतीला येणार असेल तर तो खर्या अर्थाने सार्थकी लागला, असा भाव संबंधितांच्या मनात येत असणार! नाशिकसारख्या तीर्थक्षेत्री भरपूर देवस्थाने असल्याने येथून पूरग्रस्तांना मोठी मदत गेली असणार यात शंकाच नाही. केवळ आताच नाही तर देशातील अनेक आपत्तींच्या काळात या देवस्थानांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. आतादेखील तोच कित्ता गिरवला गेला. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग देवस्थानाने एक कोटी अकरा लाखांचा धनादेश नुकताच मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते नाशिक दौर्यावर आले असताना विमानतळावरच त्यांची भेट घेऊन दिला. देवस्थानचे विश्वस्त हा धनादेश केवळ देऊन थांबले नाहीत तर त्यांनी समाज माध्यमांवर त्याची यथेच्छ प्रसिध्दी केली. खरे तर हल्ली अशा प्रसिध्दीलाही कोणाची हरकत नसते. ‘तळे राखील तो पाणी चाखील’ या न्यायाने विश्वस्तांनी काही चांगले काम केले असेल तर त्याची प्रसिध्दी केली तर बिघडले कुठे? असेही कोणी म्हणेल. ते अगदीच अयोग्य नाही. परंतु ही प्रसिध्दी करताना काही विश्वस्तांनी जी मखलाशी केली व त्यात ओढून-ताणून राजकारण आणले ते केवळ चुकीचेच नाही तर निषेधार्हदेखील आहे.
विश्वस्त कैलास घुले हे त्र्यंबकमधील बडे प्रस्थ! भारतीय जनता पक्षाच्या गळ्यातील ताईत! साहजिकच त्यांनी हा धनादेश देताना ‘गिरीशभाऊंच्या मार्गदर्शनाखाली’ वगैरे उल्लेख करुन भाऊंची मर्जी राखण्याचा नाहक उद्योग केला. दुसरे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनीही विमानतळावरुनच समाजमाध्यमांवर दिलेल्या देणगीची जाहिरात केली. केवळ एवढेच नव्हे तर कैलास घुलेंनी आपल्या दैवताचे नाव घेतल्यावर हे पुरुषोत्तम कसे गप्प बसतील? त्यांनीही त्यांचे दैवत असलेले रोहित पवार यांची आठवण करुन त्यांनी मराठवाड्यातील शेतकर्यांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते, हे आवर्जून सांगितले. दोन पक्षांच्या दोन नेत्यांनी आपापल्या आकांना मदतनिधीमार्गे खुश केले. त्याबद्दलही कोणाला काही वावगे वाटण्याचे कारण नाही. परंतु पैसा देवस्थानाचा! म्हणजेच श्रद्धाळू भाविकांचा. तो देणार विश्वस्त. त्यातही ते आपापल्या पक्षाच्या नेत्याचा प्रचार करुन घेणार! हे म्हणजे, ‘पाव्हण्याची कढी अन् धाव-धाव वाढी’ असे झाले.
दोघेही सुखवस्तू आहेत. कशाला म्हणजे कशालाही कमी नाही. या रकमेत त्यांनी अत्यल्प का होईना, पण वैयक्तिक मदतीचे अर्घ्य टाकले असते तर अनेकांना आनंद झाला असता. परंतु देवस्थानाच्या पैशांवर अशी वैयक्तिक प्रसिध्दी करणे कितपत योग्य? याचा केवळ त्यांनीच नव्हे तर सगळ्याच विश्वस्त जमातींना विचार करायला हवा. कैलास हे साक्षात शिवशंकराचे नाव तर पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णूचे! अशा हरिहरांच्या या जोडीने किमान आपल्या नावाला जागून तरी व्यक्त व्हायला हवे. त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी सणासुदीला तसेच श्रावणात व सोमवारी होणारी गर्दी हा आता चिंतेचा विषय बनून गेला आहे. देवस्थानच्या विश्वस्तांचीही ती डोकेदुखी झालेली आहेच. गर्दीमुळे अनेकांना केवळ कळसाचे दर्शन घेऊन व्यथित मनाने परतावे लागत आहे. इतर सोयी-सुविधांबाबत तर विचारायचीही सोय नाही. विश्वस्तांनी अशा गोष्टीत विशेष लक्ष घातले तर देशभरातील भाविक दुवा देतील.
सरकारी मंत्र्यांच्या दुवापेक्षा तो नक्कीच फायदेशीर राहील. येत्या सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकराजाच्या जलद दर्शनाची काही ठोस व्यवस्था करता आली तर फार मोठे पुण्य पदरी पडू शकेल. ज्योतिर्लिंगाचा परिसर, तेथील स्वच्छता, पार्किंगचे विषय, अतिक्रमणे अशी कितीतरी कामे आहेत, जी सरकारमधील आपल्या नेत्यांच्या माध्यमातून विश्वस्तांना मार्गी लावता येऊ शकतील. तसे झाले तर गावातील लोकही आनंदाने व समाधानाने नाव घेतील. अर्थात हे काम केवळ कैलास घुले वा पुरुषोत्तम कडलग यांचे नसून विश्वस्तपदावर असलेल्या सर्वांनाच करावे लागणार आहे.




