
नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – संपादक
सिंहस्थाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आयोजित केलेला ‘भक्ती संगम’ महोत्सव हा प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा, अनागोंदीचा आणि जनतेपासून तुटलेल्या नाळेचा उत्तम नमुना ठरला. कोट्यवधींचा खर्च करूनही रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन ही मोठी धोयाची घंटा आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे, विशेषतः रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देत नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि सामान्यजन यांना विश्वासात घेत नाहीत तोपर्यंत अशा कोणत्याही ‘संगमा’त जनता सहभागी होणार नाही.
नाशिक म्हणजे तीर्थाटन, नाशिक म्हणजे अध्यात्म आणि नाशिक म्हणजे सिंहस्थ कुंभमेळ्याची पवित्र भूमी. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचे वेध आतापासूनच नाशिककरांना आणि प्रशासनाला लागलेले आहेत. याच सिंहस्थाचा एक आश्वासक माहौल तयार व्हावा तसेच संपूर्ण परिसरात आध्यात्मिक वातावरणनिर्मिती व्हावी या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने ‘भक्ती संगम’ या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सलग तीन दिवस चालणार्या या भरगच्च कार्यक्रमात प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन, प्रख्यात शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची अभंगवारी, भारतीय संत व समरसता तसेच राष्ट्रीयदृष्ट्या संतपरंपरेचा सहभाग व समन्वय या विषयांवर मान्यवरांचे भक्ती संमेलन, ह.भ.प डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे महाराजांचे कीर्तन, सुप्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांचे भजन, अमृतसर येथील श्री दरबार साहिबचे हजुरी रागी भाई मनिंदर सिंहजी यांचे गुरुबानी शबद कीर्तन, मणिपूरचे नटसंकीर्तन महाज्येग्या आणि प्रसिद्ध सामाजिक कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन अशा असंख्य आकर्षक उपक्रमांची रेलचेल आहे.
आज या सोहळ्याचा समारोप होत आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून नाशिकचे नाव पुन्हा एकदा राज्य आणि देशाच्या आध्यात्मिक पटलावर झळकेल, अशी प्रशासनाची अपेक्षा असावी. मात्र, प्रत्यक्षात उद्घाटन सोहळ्याचे जे चित्र समोर आले, ते प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचे आणि जनतेच्या रोषाचे उत्तम उदाहरण ठरले.
कोणत्याही मोठ्या शासकीय किंवा प्रशासकीय सोहळ्याचे यश हे त्यातील लोकसहभागावर अवलंबून असते. ‘भक्ती संगम’ सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मंत्रिगणांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. मुख्यमंत्र्यांसारखा राज्याचा प्रमुख नेता उपस्थित असताना, या कार्यक्रमाला हजारो नागरिकांची गर्दी अपेक्षित होती. तयारी तर तशीच केली गेली होती. साधारण आसन क्षमता चार हजार जणांची होती. पण प्रत्यक्षात उद्घाटनाच्या वेळी अवघे दोन-चारशे लोकच मंडपात उपस्थित होते. त्यातही पोलीस, शासकीय कर्मचारी, सिंहस्थाचे स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि पत्रकार यांचाच भरणा होता.
एवढ्या मोठ्या प्रमाणावर गाजावाजा करून आयोजित केलेल्या कार्यक्रमाकडे नाशिककरांनी अक्षरशः पाठ फिरवली. मुख्यमंत्र्यांच्या समोर असलेल्या शेकडो खुर्च्या रिकाम्या होत्या. या रिकाम्या खुर्च्यांचे व्हिडिओ काही क्षणांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रशासनाची मोठी नाचक्की झाली. मुख्यमंत्र्यांसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला गर्दी जमवता न येणे, हे मोठे अपयश मानले जात आहे. या फ्लॉप शोला नियोजनशून्य कामकाज मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरले.
सुरुवातीला हा कार्यक्रम सर्वसामान्यांसाठी खुला म्हणजेच ‘मुक्त’ असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात जेव्हा काही मोजके नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर त्यांना ‘पासेस’ची विचारणा करण्यात आली. मुक्त कार्यक्रम असताना पासेसचा आग्रह का? या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नव्हते. यामुळे प्रवेशद्वारावरच गोंधळ आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले. या अनागोंदीचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच बसला नाही, तर नेहमीप्रमाणे स्थानिक लोकप्रतिनिधींनाही दुय्यम वागणूक देण्यात आल्याचा आक्षेप होता.
आपली नाराजी त्यांनी कार्यक्रमस्थळीच वरिष्ठांकडे बोलून दाखविली. सिंहस्थाच्या सादरीकरण कार्यक्रमात दोन तास उशीर करून प्रमुख अधिकार्यांनी आधीच नगरसेवकांचा रोष ओढवून घेतला होताच, आता या कार्यक्रमातही त्यांना मागच्या रांगेत बसवून त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेल्याचा आरोप होत आहे. ज्या लोकप्रतिनिधींचा जनतेशी थेट संपर्क असतो, त्यांनाच डावलल्यामुळे कार्यक्रमाला गर्दी कुठून जमणार? असा सवाल आता पक्षाचेच पदाधिकारी उपस्थित करीत आहेत.
सर्वात संतापजनक बाब म्हणजे या ‘भक्ती संगम’ महोत्सवावर प्रशासनाने कोट्यवधी रुपयांची उधळण केली. भव्य मंडप, रोषणाई, कलाकारांचे मानधन यावर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला. भक्ती संगमाचे इव्हेंटीकरण केले गेल्याने सामान्य नाशिककरांनी झगमगाटाकडे पाठ फिरवल्याचे दिसले. यामागे नाशिककरांची केवळ उदासीनता नसून, प्रशासनाविरुद्धचा सुप्त संताप आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे. सध्या नाशिक शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, पावसामुळे रस्त्यांवर जीवघेणे खड्डे पडले आहेत. रोजच्या प्रवासात खड्ड्यांमुळे नागरिकांना मणयाचे आणि कमरेचे आजार जडत आहेत. रस्त्यातील खड्डे आणि चिखलामुळे बळी जाणार्यांचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे.
वाहतूककोंडी आणि धुळीच्या साम्राज्याने नाशिककर त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याऐवजी जर इव्हेंटबाजीवर कोट्यवधी रुपये उधळले जात असतील तर जनता अशा कार्यक्रमांना का उपस्थित राहील? रस्त्यांच्या दुर्दशेचा आणि प्रशासनाच्या बेपर्वाईचा हा थेट परिणाम असावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा तीन प्रमुख कार्यक्रमांसाठी हा दौरा होता. पैकी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीचे व मराठा विद्या प्रसारक समाजाच्या दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्याही नूतन इमारतीचे उद्घाटन होते. हा संपूर्ण दौरा भक्ती संगम कार्यक्रमातील केवळ रिकाम्या खुर्च्यांमुळेच नव्हे, तर राजकीय टोलेबाजीमुळेही चांगलाच गाजला.
मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच छगन भुजबळ, दादा भुसे, नरहरी झिरवाळ या नाशिककर मंत्र्यांसह उदय सामंत, पालकमंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल आदी मंत्र्यांचीही उपस्थिती होती. शिवनई येथील विद्यापीठ उपकेंद्राचा तसेच चाचडगाव येथील मविप्रचा असे दोन्ही कार्यक्रम दिंडोरी तालुयात होते. पैकी या तालुयाचे आमदार व मंत्री नरहरी झिरवाळ हे मविप्रच्या कार्यक्रमास हजर राहिले तर विद्यापीठाच्या कार्यक्रमासोबतच भक्ती संगमालाही त्यांनी दांडी मारली. आपल्याच मतदारसंघातील महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे त्यांनी पाठ का फिरविली याची चर्चा आता केली जात आहे. हीच बाब मंत्री छगन भुजबळ यांची. त्यांनी दोन कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावताना सिंहस्थाच्या कार्यक्रमाकडे जाणे टाळले.
सिंहस्थाच्या संपूर्ण तयारीत ज्या रीतीने राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पद्धतशीरपणे दुर्लक्षिले गेले, त्याचा परिणाम म्हणून भुजबळ व झिरवाळ या दोन्हीही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी भक्ती संगम कार्यक्रमास जाणे टाळले असावे. विद्यापीठ कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी फडणवीस यांना उद्देशून एक अत्यंत सूचक आणि मार्मिक कोपरखळी मारली. फडणवीस साहेब, तुम्ही नेहमी नाशिकला येत जा, म्हणजे तुमच्या निमित्ताने का होईना, नाशिकचे खड्डे तरी बुजतील, भुजबळांच्या या कोपरखळीला टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात उपस्थितांची मिळालेली दाद ही नाशिकच्या वास्तवावर आणि प्रशासकीय व्यवस्थेवर जळजळीत प्रकाश टाकणारी ठरली. व्हीव्हीआयपी नेते शहरात येणार असल्यावरच प्रशासनाला जाग येते, रातोरात खड्डे बुजवले जातात आणि रस्ते चकाचक केले जातात, हे कटू सत्य भुजबळांनी मिश्किलपणे पण अचूक मांडले.
यातून त्यांनी एकापरीने पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही टोला लगावला. सर्वसामान्य करदात्या नागरिकांसाठी खड्डे न बुजवणारे प्रशासन नेत्यांच्या दौर्यासाठी मात्र तत्परतेने कामाला लागते, हा दुटप्पीपणा यानिमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. एवढेच नव्हे तर उद्घाटनानंतर झालेल्या प्रतिथयश सेलेब्रिटींच्या कार्यक्रमासही लाभलेली अत्यल्प उपस्थिती बरीच सूचक होती. शनिवारी झालेल्या संत संमेलनात तर शंभर लोकही हजर नसावेत यातून या कार्यक्रमाच्या एकूणच आयोजनातच मोठे अपयश दडलेले दिसते. थोडयात सांगायचे तर, सिंहस्थाची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी आयोजित केलेला ‘भक्ती संगम’ महोत्सव हा प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचा, अनागोंदीचा आणि जनतेपासून तुटलेल्या नाळेचा उत्तम नमुना ठरला.
कोट्यवधींचा खर्च करूनही रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन ही प्रशासनासाठी मोठी धोयाची घंटा आहे. इव्हेंट मॅनेजमेंटच्या पलीकडे जाऊन जोपर्यंत प्रशासन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे, विशेषतः रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष देत नाही, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि सामान्यजन यांना विश्वासात घेत नाहीत तोपर्यंत अशा कोणत्याही ‘संगमा’त जनता सहभागी होणार नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळा हा जागतिक स्तरावरचा सोहळा आहे. जर एका तीन दिवसांच्या कार्यक्रमात प्रशासनाची अशी तारांबळ उडत असेल, तर लाखो भाविकांचे नियोजन कसे होणार? त्यामुळे प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे नाचवणे आणि इव्हेंटबाजी करणे थांबवून प्रत्यक्ष ग्राऊंडवर उतरून काम करण्याची, खड्डेमुक्त नाशिक देण्याची नितांत गरज आहे, हाच मोठा धडा या दौर्याने दिला आहे.
मो. ९३२५३८३०९२




