Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : बघतोय रिक्षावाला…

पडसाद : बघतोय रिक्षावाला…

नाशिक | शैलेंद्र तनपुरे – दै. ‘देशदूत’ – सल्लागार संपादक

नाशिक पोलिसांना धन्यवाद द्यावे तितके कमी, अशी कामगिरी सध्या त्यांनी चालविली आहे. माध्यमांना शयतो पोलीस वा प्रशासनाविषयी चांगले लिहिण्याची संधी फारशी कधी मिळत नाही. पण, गेल्या महिनाभरापासून असे काही चालू आहे की नाशिक पोलीस हे केवळ माध्यमांमध्येच नव्हे तर आम जनतेतही प्रिय झाले आहेत. शहरातील धनदांडग्या गुंडांचा बंदोबस्त करताना राजकीय उपटसुंभांना वेचून ठोकल्याने आम पब्लिक जाम खुश झाली होती. मुख्यत्वे पक्ष वा जातीपातीचा विचार न करता कारवाया होत असल्याने कोणालाही भलत्या कुशंका काढायला जागाच राहिली नव्हती. नाही म्हणायला काही महाभागांनी जातीवरून आयुक्त संदीप कर्णिकांना लक्ष्य केले जात असल्याचा अपप्रचार करून पाहिला, पण दस्तुरखुद्द आयुक्त हेच सर्व प्रकरणात ठाम तर राहिलेच पण असा अपप्रचार करणारेच तोंडावर आपटल्याने गुंडपुंडांविरोधी मोहिमेला बळ मिळाले.

- Advertisement -

शहराच्या सर्वच भागातील नामचीन राजकीय गुन्हेगारांची गठडी वळल्यानंतर पोलिसांनी ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांची ठसठसती जखम बनलेला रिक्षाचालकांचा विषय हाती घेतला. पूर्वी असे काही झाले असते तर लागलीच रिक्षाचालक-मालकांनी रस्त्यावर येऊन दबाव आणण्याचा प्रयत्न केला असता. परंतु पोलिसांनी रिक्षाचालकांना हात लावण्यापूर्वीच त्यांच्या आकांना भरपूर प्रसाद दिलेला असल्याने मुजोर रिक्षाचालक काहीही न करताच सुतासारखे सरळ झाले होते. साहजिकच पोलिसांनी रिक्षा वाहतुकीचा विषय हाती घेत असल्याचे जाहीर करून कारवाईला सुरुवात केली. परिणामी गेल्या दहा-बारा दिवसात लक्षणीय बदल झाला तो म्हणजे, ठिकठिकाणच्या रिक्षा थांब्यांवर शिस्तीत रिक्षा लागलेल्या दिसतात. बव्हंशी रिक्षाचालक खाकी वा पांढर्‍या गणवेशात असतात. छातीला बिल्लाही लावायला त्यांनी सुरुवात केलेली दिसते. पोलिसांनी ठरवून काही ब्लॅकस्पॉट हाती घेत त्याची स्वच्छता हाती घेतल्याने ‘लेकी बोले सुने लागे’ या उक्तीप्रमाणे उर्वरित ठिकाणांची आपसूक साफसफाई होऊ लागली. मुजोर, टवाळखोर, गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून भूमिगत होणे पसंत केले. परिणामी रस्त्यावरील असंख्य रिक्षा गायब झाल्याचा अनुभव येऊ लागला.

YouTube video player

रिक्षा शिस्त मोहिमेत आतापावेतो ९६० रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ४३७ हून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली. वाहतूक शाखेचे सगळे सात युनिट कार्यरत झाल्याने सगळीकडे एकदम शिस्तीचा माहौल तयार झाला आहे. गंगापूररोड, कॉलेजरोड, मुंबई नाका, त्र्यंबक नाका, रविवार कांरजा, अशोकस्तंभ, शालिमार, सीबीएस, सिटी सेंटर मॉल, आनंदवल्ली, सारडा सर्कल, ठक्कर बाजार, कॅनडा कॉर्नर, बाजारपेठ, मालेगाव स्टॅन्ड, दिंडोरी नाका, पंचवटी कारंजा, पेठ फाटा, मखलमाबाद नाका, रामकुंड, संतोष टी पॉइंट, छत्रपती संभाजीनगर नाका, नांदूर नाका, जत्रा हॉटेल, अमृतधाम, जेलरोड, बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्टेशन, सुभाष रोड, मुक्तिधामसमोर, उपनगर नाका, दत्तमंदिर, द्वारका, त्रिमूर्ती चौक, पाथर्डी फाटा, सातपूर, श्रमिकनगर, बारदान फाटा, पपया नर्सरी, एस्लो पॉइंट, फाळके स्मारक, गरवारे टी पॉइंट, लेखानगर, इंदिरानगर, भगूर, देवळाली गाव, देवळाली कॅम्प, संसरी नाका अशा प्रमुख पन्नास ठिकाणच्या प्रमुख चौकांमध्ये पोलीस व आरटीओची धडक तपासणी मोहीम सुरू आहे.

या कारवाईत अनेकांना योग्य तो धडा मिळाला असला तरी अजूनही काहींच्या शेपट्या वाकड्याच आहेत. त्या पिरगाळण्याची गरज आहे. कारवाईच्या धाकाने भूमिगत झालेल्या गुंड प्रवृत्तीच्या रिक्षाचालकांना हुडकून काढून त्यांची धुलाई केली तर अनेकांना त्यातून शहाणपण येऊ शकेल. गेली काही वर्षे नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर ‘ओला’ व ‘उबर’ या कंपन्यांच्या टॅसी, रिक्षांना हे रिक्षाचालक येऊ देत नाहीत. आले तर मारहाण करण्यासही मागे पुढे पहात नाहीत. पोलिसांसमोर हे सारे चालत असतांना कोणीही कधीही त्यांना हटकले नाही. पोलिसांच्या या पुचाटपणामुळे रिक्षाचालकांची दादागिरी वाढली, हे नाकारून चालणार नाही. त्यामुळेच पोलीस जेव्हा अ‍ॅशन मोडमध्ये आले तेव्हा रिक्षाचालक वठणीवर आल्याचे सध्या तरी दिसते आहे. हे जे दिसणे आहे, ते प्रासंगिक असता कामा नये. अन्यथा, मोहीम थांबली की रिक्षाचालक पुन्हा आपापल्या उद्योगाला मोकळे असे व्हायचे. म्हणूनच सध्या रिक्षाचालकांचे नेते जेलची हवा खात असताना त्यांच्या उर्वरित ‘आकां’नी तरी आपल्या बांधवांच्या भल्यासाठी सर्व संबंधितांना शिस्तीचे पाठ द्यायला हवे.

प्रवाशांशी कसे वागावे याचा संस्कार यानिमित्ताने रुजला तर याच रिक्षाचालक संघटनेलाही नाशिककर दाद निश्चितच देतील. परंतु त्यांनी पहिले पाढे पंचावन्न केले तर मग पोलिसांना पुन्हा हाती दंडुका घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. आयुक्तांनी रुद्रावतार घेतलेला असल्याने वाहतूक शाखेच्या उपायुक्त किरिथिका सी. एम. तसेच सहायक आयुक्त अद्विता शिंदे यांना पुढील कामकाज करणे सोयीचे झाले. दोन्ही अधिकारी प्रथमच नाशिकला आलेल्या आहेत. त्या महिला असूनही त्यांनी कोणाचीही भीडभाड न बाळगता धाडसाने सुरू केलेली कारवाई प्रशंसनीय ठरते. अर्थात असे असले तरी ही केवळ सुरुवात आहे. अद्याप बरेच काही साध्य करावे लागणार आहे. हे रिक्षाचालक एवढे बनचुके झाले आहेत की आता शांत बसून नंतर फणा काढतील. त्यामुळेच अशांना वेळीच ठेचण्याची गरज आहे. भविष्यात या मंडळींनी पुन्हा कधी आवाज वाढवता कामा नये. यानिमित्ताने आणखीही एक करता येईल, अनेक रिक्षाचालक प्रामाणिक, शिस्तबद्ध तसेच प्रवासीस्नेही आहेत. अशांना जाणीवपूर्वक हुडकून त्यांचा गौरव करता येईल. त्यांच्याविषयीचे चांगले, प्रेरक अनुभव सादर करून रिक्षा वाहतुकीचाही एक आगळा संस्कार रुजविता येऊ शकेल. तसे झालेच तर ‘बघतोय रिक्षावाला, वाट बघतोय रिक्षावाला’ या गाजलेल्या गाण्यातील परिस्थिती प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही.

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...