
मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार)संघटनात्मक विस्तारासाठी व्यापक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सध्या पक्षाकडे लोकसभेतील १ खासदार आणि विधानसभेतील ४१ आमदार असून, आगामी २०२९ च्या निवडणुकांमध्ये ही संख्या लक्षणीयरीत्या वाढविण्याचा स्पष्ट निर्धार पक्षाने केला आहे. याशिवाय पक्षाची ध्येयधोरणे सर्व स्तरातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे राज्यस्तरीय ‘चिंतन शिबिर’ आयोजित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी ‘देवगिरी’ येथे पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील आगामी २२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका तसेच २०२९ मध्ये होऊ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने बूथ पातळीपर्यंत पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तळागाळातील संघटन विस्तार, पक्षाचा मतदार वर्ग टिकवून ठेवणे आणि पक्ष तसेच सरकारमधील समन्वय अधिक मजबूत करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण प्रक्रियेत पक्षाच्या समर्थक मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करण्यासाठी माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र टास्क फोर्सची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी २२ जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीसाठी माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती स्थापन केल्याची माहिती दिली. ही समिती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षाच्या तळागाळातील ताकदीचा आढावा घेणार असून, निवडणुका स्वतंत्रपणे लढवायच्या की महायुतीत लढवायच्या याबाबतही अभ्यास करणार आहे.
‘माझा बूथ, माझे गाव’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश पदधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. आगामी मतदारसंघ पुनर्रचना आणि सीमांकनातील बदलांपूर्वी पक्षाचे बालेकिल्ले अधिक मजबूत करण्यावर नेतृत्वाचा भर राहणार आहे. तसेच २७ सप्टेंबर रोजी नाशिक येथे दिवसभराचे राज्यस्तरीय ‘चिंतन शिबिर’ आयोजित करण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, आजच्या बैठकीत पक्ष संघटना, आगामी निवडणुका आणि भविष्यातील राजकीय दिशा यावर सविस्तर चर्चा झाली. तसेच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात पक्षाचे संघटनात्मक जाळे अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या बैठकीला प्रफुल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव-पाटील, नरहरी झिरवळ, इंद्रनील नाईक, पार्थ पवार, जय पवार आदी उपस्थित होते.




