पेठ | प्रतिनिधी Peth
पेठ तालुक्यातील भाटविहीरा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी झाला असून या परिसरात वनविभागाने तातडीने बिबट्याच्या बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पेठ तालुक्यातील एकदरे येथील धर्मराज अशोक किरकिरे (२५) या युवकावर सकाळी ८:३० वाजे दरम्यान भारविहीरा येथील शेतात जात असतांना बिबट्याने हल्ला केला. सोबत त्यांचा भाऊ असल्याने व धर्मराज यानेही अत्यंत धाडसाने हल्ला परतवून लावला असला तरीही झटापटीत मानेजवळ नख लागले. डाव्या हातावर खोलवर जखमा झाल्या आहेत.
अतिदुर्गम भागातील मानवी जीवन अद्यापही कष्टपद व संकटांनी भरलेले असल्याचे दिसून आले. जखमी अवस्थेतील धर्मराज किरकिरे यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयापर्यंत पोहचविणे हे अग्रीदिव्य होते. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली तेथे जाण्यासाठी वाहनास रस्ता नाही.मोबाईलचे रक्तबंबाळ धर्मराज यांना उपचारासाठी कसे न्यावे हा प्रश्न निर्माण झाला होता.
या बाबत वनविभागास माहिती दिली असता त्यांचे वाहन जामुनमाळ पर्यंत येऊ शकले. मात्र किरकिरे यांना मिळेल त्या जवळच्या कच्च्या रस्त्यावरून मोटार सायकलने ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात येऊन त्याच्यांवर उपचार सुरू करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.




