Monday, June 15, 2026
Homeब्रेकिंग न्यूजIndia Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत SIR बाबत मोठा निर्णय, 'या'...

India Alliance Meeting : इंडिया आघाडीच्या बैठकीत SIR बाबत मोठा निर्णय, ‘या’ पाच मुद्द्यांवर सहमती; पुढील रणनीतीही ठरली

नवी दिल्ली | New Delhi

लोकसभा आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीतील घटक पक्षांची आज (सोमवारी) दिल्लीत महत्त्वाची बैठक (India Alliance Meeting) पार पडली. या बैठकीस काँग्रेससह (Congress) एकूण २५ पक्षांनी हजेरी लावली होती. यामुळे इंडिया आघाडीची एकजूट पुन्हा बघायला मिळाली. तर तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांच्या डीएमके आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष गैर हजर राहिला. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला.

- Advertisement -

या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीत पाच मुद्द्यांवर एकमत झाल्याची माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की,”इंडिया आघाडीच्या बैठकीत आज पाच मुद्द्यांवर एकमत झाले आहे. त्यामध्ये, एसआयआर, नीट पेपरफुटीवरुन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, देशाची आर्थिक स्थितीसंदर्भाने प्रामुख्याने चर्चा झाली. इंडिया आघाडी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे मुद्दे जोरदारपणे मांडणार असून, विद्यार्थ्यांसाठी न्यायाची मागणी करेल, असे खर्गे यांनी स्पष्ट केले.

मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, बैठकीत आर्थिक परिस्थिती, महागाई (inflation) आणि बेरोजगारी यांवर सविस्तर चर्चा झाली. कारण सामान्य जनतेसाठी जीवन जगणे कठीण होत असतानाही सरकार या मुद्द्यांबाबत गंभीर दिसत नाही. वाढत्या किमती आणि बेरोजगारीचा सर्वाधिक फटका तरुणांना आणि मध्यमवर्गीयांना बसला आहे. त्यामुळे ‘इंडिया’ आघाडीने पुढील महिन्यांत या मुद्द्यांवर संयुक्त मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हेच मुद्दे पुढील निवडणुकांमध्ये निर्णायक ठरू शकतात, असा विश्वास विरोधी पक्षांना वाटत असल्याचे ते म्हणाले.

दर दोन महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार

यावेळी मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीची पुढील बैठक ०८ ऑगस्ट रोजी हैदराबाद येथे होईल, असे जाहीर केले. सर्व पक्षांमध्ये भक्कम समन्वय राखण्यासाठी इंडिया आघाडी आता दर दोन महिन्यांनी बैठक घेईल, असेही ते म्हणाले. १७ एप्रिल २०२६ रोजी लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक फेटाळून लावून विरोधी पक्षांनी आपली एकता सिद्ध केली होती आणि ही एकता आता पुढेही कायम ठेवली जाईल. तसेच संसदेच्या आत आणि बाहेर भाजप सरकारचा सामना करण्यासाठी संयुक्त रणनीती आखण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती खर्गे यांनी दिली.

इंडिया आघाडीच्या बैठकीत खालील पाच मुद्द्यांवर सहमती

१) लवकरच सरन्यायाधीश यांना एसआयआर वर पत्र लिहिणार.
२) धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे.
३) आर्थिक स्थिती, बेरोजगारी आणि शेतकरी मुद्द्यांवर केंद्र सरकारने तात्काळ सर्वपक्षीय बैठक बोलवावी.
४) प्रत्येक दोन महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार, पुढील बैठक हैदराबाद येथे होणार.
५) पावसाळी अधिवेशनात इंडिया आघाडीतील पक्षाचे समन्वय साधला जाणार, दररोज विरोधी पक्षाच्या कक्षात बैठक होणार.

बैठकीला कोणते नेते होते उपस्थित

या बैठकीस मल्लिकार्जुन खर्गे (काँग्रेसचे अध्यक्ष), राहुल गांधी (काँग्रेस खासदार), ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट), ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), सीपीआयचे नेते, तेजस्वी यादव (राष्ट्रीय जनता दल), अखिलेश यादव (समाजवादी पार्टी), मेहबुबा मुफ्ती (पीडीपी) हे प्रत्यक्षात उपस्थित होते. तर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे ऑनलाईन सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...