मुंबई | प्रतिनिधी |Mumbai
भाजप सरकारच्या काळात पेपरफुटीने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. पेपरफुटीने त्रस्त विद्यार्थ्यांना एमपीएससीच्या भोंगळ कारभाराचाही फटका बसला आहे. एमपीएससीच्या कारभाराविरोधात लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले तरीही सरकारला जाग येत नाही. राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून एमपीएससीचे अध्यक्ष व सचिव यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी येथे केली.
आज टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सपकाळ यांनी एमपीएससीच्या पेपरफुटीवरून सरकारला लक्ष्य केले. एमपीएससीच्या गोंधळावर काँग्रेस पक्षाने सातत्याने विद्यार्थ्यांना पाठिंबा देत आवाज उठवला आहे. पण कारभार काही सुधारत नाही. एमपीएससीच्या या भोंगळ कारभाराला कंटाळून निराशेतून धाराशीव जिल्ह्यातील प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याने आपले जीवन संपवले. ही घटना संताप आणणारी असून या हत्येस जबाबदार असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सपकाळ यांनी यावेळी केली.
एसआयआरमधून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम
निवडणूक आयोगाने एसआयआर मोहीम राबवून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. भाजपच्या मदतीसाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचे एसआयआरमधून स्पष्ट होत आहे. पश्चिम बंगालमध्ये ९१ लाख मतदार वगळले होते. आता हाच बंगाल पॅटर्न महाराष्ट्रातही राबविला जात आहे. १ कोटी २२ लाख मतदारांना ऍनामोली आणि अनमॅप्ड यादीत टाकले असून ती यादी निवडणूक आयोग जाहीर करत नाही. भाजप निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होट चोरी करत आहे, या काँग्रेसच्या आरोपात तथ्य आहे हेच यातून दिसत असल्याचा दावा सपकाळ यांनी यावेळी केला.
राज्यात दुष्काळ जाहीर करा
पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम पुरता वाया गेला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. भाजप सरकारची शेतकरी कर्जमाफी फसवी निघाली असून पीकविम्याचे पैसेही मिळाले नाहीत. शेतकऱ्यांची अवस्था पाहता सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा आणि रब्बी हंगामासाठी बी-बियाणे, खते मोफत द्यावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.


