Friday, October 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजएमपीएससी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरण: पाथर्डी फाट्यावरील फ्लॅट ठरला मुख्य केंद्र, ओएसडीसह अधिकाऱ्यांवर गुन्हा

एमपीएससी प्रश्नपत्रिका फुटीप्रकरण: पाथर्डी फाट्यावरील फ्लॅट ठरला मुख्य केंद्र, ओएसडीसह अधिकाऱ्यांवर गुन्हा

नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचे एफआयआरनुसार समोर आले आहे.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा (मालमत्ता कक्ष) तपासात या आंतरजिल्हा घोटाळ्याची मुळे नाशिक शहरात रुतल्याचे स्पष्ट झाले आहे. नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील एका फ्लॅटमध्ये या प्रश्नपत्रिकेची देवाणघेवाण झाली आणि तिथूनच व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका लीक करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या कफ परेड पोलीस ठाण्यात दाखल एफआयआरनुसार या घोटाळ्याची सुरुवात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य कार्यालयातून झाली.

- Advertisement -

एमपीएससीचे समन्वयक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावताना संशयित विश्वेश्वर नकाते याने औषध निरीक्षक परीक्षेसाठी तज्ज्ञांनी तयार केलेल्या २९४ प्रश्नांचा संच चोरला. नकाते याने हा चोरीचा प्रश्नसंच एमपीएससीचे अवर सचिव संशयित अभिजित लेंडवे याला आयोगाच्या इमारतीमधील पार्किंगमध्ये सोपवला. लेंडवे याने हा प्रश्नसंच संशयित गोपाळ मराठे याला दिला आणि मराठेच्या माध्यमातून तो संशयित प्रविण पाटील याच्या ताब्यात पोहोचला. या कामासाठी लेंडवे आणि मराठे यांनी ५ लाख रुपयांचा आर्थिक लाभ घेतल्याचे समोर आले आहे. प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर ती अंतिम उमेदवारापर्यंत पोहोचवण्यासाठी नाशिक शहराची निवड करण्यात आली. संशयित प्रविण पाटील याने मयूर ठाकरे याच्या मध्यस्थीने अमरावती व नाशिकशी संबंधित संशयित अमृत पाटील आणि ऋतुजा पाटील यांच्याशी संपर्क साधला.

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्युज; मुख्यमंत्री सकारात्मक, राज ठाकरेंची पोस्ट करत माहिती

प्रविण पाटील याने नाशिकमधील पाथर्डी फाटा येथील फ्लॅटमध्ये अमृत पाटील व ऋतुजा पाटील यांना बोलावले आणि प्रश्नपत्रिकेची छायांकित प्रत (झेरॉक्स) दिली. ही प्रत मिळताच ऋतुजा पाटील हिने ती मोबाईलवर फोटो काढून संशयित लोकेश/ गौरव पाटील याला व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली. नाशिकमधील पाथर्डी फाटा येथे झालेला हा व्यवहार उघडकीस आल्यानंतर एमपीएससीच्या परीक्षा यंत्रणेवर आणि सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नाशिक पोलिसांच्या मदतीने यातील इतर स्थानिक मध्यस्थांचा शोध घेतला जात आहे.

तपास आणि कायदेशीर कलमे
कफ परेड पोलीस ठाण्याचे निरीक्षक मंगेश गणपतराव देसाई यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयितांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ कलम ११२ (संघटित गुन्हेगारी), ३१६(४), ३१६(१) (विश्वासघात), ३१८ (४) (फसवणूक), २३८ (ब) (पुरावे नष्ट करणे), ३१७ (२), ३०३(२), ६१ (२) आणि ३(५), महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) अधिनियम, कलन ११(१), ११(२), ११(३), १२(१), १२ (२), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, कलम १३ (२), १३(१) (अ) नुसार गुन्हा नोंद आहे

गुणवत्तेत सातवा क्रमांक
एमपीएससीद्वारे २२ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत राज्यातील ६ केंद्रांवर ही चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर १२ जून २०२६ रोजी मुलाखतीची यादी आणि २२ जुलै २०२६ रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर झाली. प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्यामुळे ऋतुजा पाटील हिची तात्पुरत्या गुणवत्ता यादीत ७ व्या क्रमांकावर निवड झाली होती.

ताज्या बातम्या

राज

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्युज; मुख्यमंत्री सकारात्मक, राज ठाकरेंची पोस्ट करत...

0
मुंबई | Mumbaiपुण्यात गेल्या ९ दिवसांपासून सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी...