Thursday, May 2, 2024
Homeनगरदेवळालीतील खासगी कोविड सेंटर शासकीय करा

देवळालीतील खासगी कोविड सेंटर शासकीय करा

देवळाली प्रवरा (वार्ताहर) – देवळाली प्रवरा येथील नगरपालिका इमारतीमध्ये सुरु असलेले खासगी कोविड सेंटर शासकीय करावे किंवा नागरिकांना मोफत सुविधा देण्यासाठी नगरपालिकेने स्वतः ते कोविड सेंटर चालवावे, अन्यथा नगरपालिकेच्या गेट समोर 10 जूनपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांनी दिला आहे.

याबाबत अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले, इमारत नगरपालिकेची, पाणी नगरपालिकेचे, वीज नगरपालिकेची, सफाई कामगार नगरपालिकेचे, मग कोविड सेंटरच खासगी का? असा देवळाली प्रवराच्या नागरिकांना प्रश्‍न पडला आहे. नगरपालिकेच्या मालमत्तेमध्ये खासगी कोविड सेंटर चालवून रुग्णाला भरमसाठ बिलाची आकारणी कशी काय करू शकता? असा सवाल आप्पासाहेब ढुस यांनी विचारून तात्काळ हे कोविड सेंटर शासकीय करा नाहीतर ‘चले जाव आंदोलन’ छेडावे लागेल, असा इशारा दिला होता. तसेच चार दिवसांचे चाळीस हजार रुपये बिल भरायला पैसे नसल्याने या खासगी कोविड सेंटरमध्ये अडकून पडलेल्या देवळाली प्रवरा येथीलच रुग्णाला सोडवायला आंदोलन करायची वेळ आल्याने ढुस यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांना आमरण उपोषणाचे निवेदन दिले आहे.

- Advertisement -

देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोविड सेंटरची माहिती मिळणे कामी संदर्भीय पत्रान्वये आम्ही दि. 13 मे रोजी नगरपालिकेला विनंती केली आहे. तथापि आज पावेतो नगरपालिकेने आम्हास माहिती उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या इमारतीमध्ये सुरू असलेल्या खासगी कोविड सेंटरमध्ये करोना रुग्णांची लुटमार होत असल्याबद्दल आमची खात्री झाली आहे. तशा तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत.

तसेच करोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी या खासगी कोविड सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून त्याचे शासकीय मोफत कोविड सेंटरमध्ये रुपांतर करावे किंवा नगरपालिकेने ते स्वतः चालवावे, याबाबत आम्ही नगरपालिकेला वारंवार विनंती केली आहे. त्यावरही नगरपालिकेने अद्यापपावेतो कोणताही निर्णय घेतला नाही.

या खासगी कोविड सेंटरची नगरपालिकेकडून माहिती मिळावी. या कोविड सेंटरची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि या सेंटरमध्ये आणखी काही बेड वाढवून ते शासकीय सेंटर करावे. किंवा नगरपरिषदेने ते कोविड सेंटर स्वतः चालविसाठी आवश्यक ती उपाययोजना करावी व येथील नागरिकांना मोफत सेवा उपलब्ध करून करोनाची तिसरी लाट येण्यापूर्वी देवळाली प्रवरा परिसरातील नागरिकांना आश्‍वस्थ करावे.आदी मागण्यासाठी गुरुवार दि. 10 जून 2021 रोजी सकाळी 10 वाजे पासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या गेटसमोर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, असे निवेदनात ढुस यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या