Monday, May 6, 2024
Homeराजकीय...तर नेते म्हणून दोष शरद पवार यांच्याकडेही जातो - चंद्रकांत पाटील

…तर नेते म्हणून दोष शरद पवार यांच्याकडेही जातो – चंद्रकांत पाटील

पुणे (Pune)

शरद पवार हे सगळ्यांचे गॉडफादर आहेत. वैचारिक मार्गदर्शक आहेत. स्वत:च्या पक्षासह महाविकास आघाडीतील पक्षावरही त्यांचा कंट्रोल आहे. त्यामुळे निर्णयाच्या पातळीवर काही होत असेल तर नेते म्हणून दोष त्यांच्याकडेही जातो,’ त्यामुळे शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच आहे असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

- Advertisement -

राज्यातील मराठा समाजाला शरद पवार यांच्यामुळेच आरक्षण मिळालं नाही. या सरकारला कुणाला आरक्षण द्यायचंच नाही,’ असा आरोप भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. त्याबाबत विचारलं असता चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ‘गोपीचंद पडळकर हे आमच्या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी काही भूमिका मांडली आहे. त्यात तथ्य देखील आहे,’ असं पाटील म्हणाले.

पाटील म्हणाले, ‘मराठा आरक्षणावर जाहीर वादविवाद करण्याची माझी तयारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी वाचला आहे. पानापानावर चुका दिसत आहेत, निष्काळजीपणा दिसतो आहे. तेच ओबीसींच्या बाबतीत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने वटहुकूम काढून ओबीसींचे राजकीय आरक्षण तात्पुरतं टिकवलं होते. त्यानंतर आमचे सरकार गेले. आता वटहुकूमचा कायदा करून ते टिकवायला हवा होता. ते केलं गेलं नाही. सर्वोच्च न्यायालयाचा आग्रह मागास आयोगाचा आहे. तो स्थापन झालेला नाही. राजकीय आरक्षण का, यामागचा तर्क सर्वोच्च न्यायालयाला हवा आहे, तो दिला जात नाही,’ असा आरोपही पाटील यांनी केला.

भेटीगाठी होत असतात!

देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली शरद पवारांची भेट, त्यानंतर एकनाथ खडसे यांच्या घरी दिलेल्या भेटीमुळं सध्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्याबाबत विचारलं असता, ‘या भेटीगाठी वेगळ्या कारणाने सुरू आहेत. शरद पवार हे आजारी आहेत. त्यांची इच्छाशक्ती मोठी आहे. त्यामुळं ते आजारी असतानाही काम करताहेत. अनेक जण त्यांना भेटून तब्येतीची विचारपूस करत आहेत. देवेंद्र फडणवीसही त्यांची विचारपूस करायला गेले होते,’ असे पाटील म्हणाले. ‘खडसेंच्या घरी दिलेल्या भेटीबद्दल म्हणाल तर त्या घरात भाजपचा खासदार आहे,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांनी नाथाभाऊ यांची भेट घेतली त्याविषयी पाटील म्हणाले, नाथाभाऊ अजूनही आमचे पालक आहेत. भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही. भेटीगाठी वेगळ्या कारणांनी सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या