Sunday, May 19, 2024
Homeमुख्य बातम्याकांदा दरात घसरण; हमी भावाची मागणी

कांदा दरात घसरण; हमी भावाची मागणी

निफाड । प्रतिनिधी Niphad

मागील आठवड्यात सरासरी 2030 रुपये प्रतिक्विंटल भावाने विकला जाणारा कांदा ( Onion ) अवघ्या 1500 रु. क्विंटल दराने विक्री होत असून कांद्याचे भाव ( Onion Rate ) असेच कोसळत राहिले तर कांदा पिकावर झालेला उत्पादन खर्च फिटणेदेखील अवघड होणार आहे.

- Advertisement -

उन्हाळ कांद्याचे भाव वाढत असतानाच केंद्र सरकारने पाकिस्तानचा कांदा आयात करून कांद्याचे भाव पाडण्याचे काम केले. त्यातच भारतीय कांद्याला परदेशी बाजारपेठेत मागणी असतानाही बांगलादेशामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता तेथील सरकारने कांदा आयातीवर बंदी घातल्याने देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याला फारशी मागणी नाही. त्यातच देशातदेखील लॉकडाऊन असल्याने हॉटेल, खानावळ, आठवडे बाजार बंद आहेत. साहजिकच भारतीय बाजापेठेत कांद्याला पाहिजे तेवढी मागणी नाही.

बाजापेठेतील कांद्याची वाढती आवक आणि घटती मागणी यामुळे कांद्याचे भाव दिवसागणिक कोसळू लागले आहेत. यावर्षी सुरुवातीला उन्हाळ कांद्याला बर्‍यापैकी भाव असल्याने पुढेदेखील चांगला भाव राहील या आशेवर शेतकर्‍यांनी कांदा प्रतवारी करून चाळीत साठवला. मात्र आता सुरुवातीच्या भावापेक्षाही कांदा भावात घसरण झाली आहे. एकतर यावर्षी बियाणांची टंचाई त्यामुळे मुँह मांगा दाम देऊन शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा बियाणे घेतले. त्यात अनेकांचे बियाणे निकृष्ट निघाले. त्यात अवकाळी पाऊस, प्रतिकूल हवामान यामुळे उत्पादनात घट झाली.

साहजिकच आता चांगला भाव मिळेल ही अपेक्षा शेतकर्‍याला होती. सुरुवातीच्या काळात घडलेही तसेच. मात्र आता दिवसागणिक कांद्याचे भाव कोसळू लागल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. कांदा पीक उभे करण्यासाठी 10 हजार रुपये पायलीप्रमाणे बियाणे घ्यावे लागले. त्यात शेती मशागत, वाफे बांधणी, कांदा लागवड, मजुरी, निंदणी, खते, ओषधे, पाणी देणे, कांदा काढणी, निवडणी आदींचा खर्च हिशेबात धरता कांदा उत्पादन घेण्यासाठी एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. त्यातच प्रतिकूल हवामानामुळे उत्पादन कमी निघते. साहजिकच आजचा कांदा बाजारभाव बघता कांदा पीक आतबट्ट्याचा खेळ ठरत आहे. चार महिने मोठी मेहनत घेत व रात्रीचा दिवस करून पिकाला पाणी दिले.

कांदा पिकाच्या भरवशावर मला-मुलींची लग्ने जमवली. नानाविध स्वप्ने रंगवली, मात्र या बाजारभावाने शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा चुराडा करून टाकला आहे. सध्या पिंपळगाव बाजार समितीत जिल्हाभरातून कांदा विक्रीला येत आहे. तर लासलगाव बाजार समितीतदेखील विक्रमी कांदा आवक होत आहे. या दोन्ही बाजार समितींच्या उपबाजार आवारातदेखील कांदा आवक होत असून दररोजची होणारी कांदा बाजारभावातील घसरण शेतकर्‍यांपुढे डोकेदुखी ठरत असल्याने ऊस पिकाप्रमाणे कांद्याला हमीभाव देण्याची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या