Friday, May 3, 2024
HomeUncategorizedरजनीकांतचा ‘रामराम’

रजनीकांतचा ‘रामराम’

– अभिमन्यू सरनाईक

चित्रपटातील वलयाचा लाभ घेऊन राजकारणात पाय रोवण्याचा प्रयत्न अनेक मंडळींनी केला होता. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, गोविंदा या मंडळींनी राजकारणात उडी घेतली. परंतु फारसा फायदा न झाल्याने त्यांनी राजकारणातून काढता पाय घेतला.

- Advertisement -

दक्षिणेतही एम.जी. रामचंद्रन, जयललिता, अलीकडच्या काळात कमल हसन यांनीही पडद्यावरून मैदानात डाव टाकले. यात रामचंद्रन, जयललिता यांना चित्रपटाप्रमाणेच राजकारणातही घवघवीत यश मिळाले. परंतु सर्वांचे लक्ष होते ते थलैवा रजनीकांत यांच्याकडे. सुपरस्टार रजनीकांत यांनी पंचवीस वर्षापूर्वी राजकारणात येण्याचे संकेत दिले होते. आज ना उद्या ते राजकारणात येतील, अशी आशा चाहते बाळगून होते. यादरम्यान, पूलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि दोन आठवड्यापूर्वी त्यांनी राजकारणाला रामरामही ठोकला.

गेल्या 25 वर्षांपासून तमिळनाडूच्या नागरिकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित व्हायचा आणि तो म्हणजे रजनीकांत यांची राजकारणातील एंट्री कधी होणार. पण यापुढे आता चर्चा होणार नाही. कारण त्यांनी 12 जुलै रोजी राजकारणात प्रवेश करण्याच्या तर्कवितर्कांना पूर्णविराम दिला. आपण कोणताही पक्ष स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले. राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी रजनीकांत यांनी रजनी मक्कल मंद्रम (रजनी पीपल्स फोरम) च्या कार्यकर्त्यांसमवेत बैठक घेतली आणि चाहत्यांच्या नावाने एक पत्र जाहीर केले.

त्यात म्हटले की, भविष्यात राजकारणात येण्याचा कोणताही इरादा नाही. आपण रजनी मक्कल मंद्रम पक्ष देखील बरखास्त करत असल्याचे गोषित केले. अर्थात रजनी फॅन्स क्लब मात्र कायम राहणार आहे. राजकीय तज्ञांच्या मते, रजनीकांत यांच्या घोषणेनंतर तमिळनाडू राजकारणातील त्यांचा प्रभाव हा आपोआप कमी होईल. कारण काही दिवसांपर्यंत त्यांच्याकडे गेम चेंजर म्हणून पाहिले जात होते. आता त्यांचे चाहते केवळ अभिनेते म्हणून त्यांच्याकडे पाहतील. तमिळनाडू राजकारणावर लक्ष ठेवणारे निरीक्षक उमेश म्हणतात की, प्रत्येक निवडणुकीच्या वेळी चाहते रजनीकांतची वाट पाहायचे. थलैवा निवडणूकीसाठी काय संदेश देतात, याकडे ते डोळे लावून बसायचे. परंतु आता तसे काही घडणार नाही. अभिनेते म्हणून चाहते त्यांच्यावर कायम प्रेम करत राहतील.

दुसरीकडे रजनी मक्कल मंद्रममध्ये सामील झालेले अनेक कार्यकर्ते, चाहते हे दुसर्‍या पक्षात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रजनीकांत यांनी आता राजकारणाच्या विषयावर फुलस्टॉप दिल्याने ते चित्रपट आणि आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ शकतील, असे चाहत्यांना वाटते. मात्र राजकारणातही रजनीकांत यशस्वी ठरले असते असे आजही अनेकांना वाटते. अर्थात चाहत्यांना रजनीकांत यांचा प्रत्येक निर्णय मान्य आहे आणि त्यांनी घोषणेचे स्वागतही केले आहे. वय आणि आरोग्याकडे पाहूनच राजकारणापासून दूर राहण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचेही चाहते सांगायला विसरत नाहीत.

रजनीकांत यांनी घोषणा करण्यापूर्वी कार्यकर्त्यांच्या बैठकीत रजनीकांत यांनी काही विचार मांडले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या चाहत्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक आणि आरोग्यसंबंधी मदत करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला. या ट्रस्टची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांच्याप्रमाणेच अन्य सेलिब्रिटींनी देखील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या चाहत्यांसाठी पुढाकार घ्यायला हवा. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबतची चर्चा पहिल्यांदा 1996 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळात झाली होती.

तेव्हा त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा विचार बोलून दाखवला होता. पण तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने जयललिता यांच्या नेतृत्वाखाली अण्णाद्रमुकला पाठिंबा दिल्याने रजनीकांत यांनी हा विचार सोडून दिला. सुपरस्टार रजनीकांत म्हणाले होते की, जर जयललिता सत्तेत परत येत असतील तर भगवान देखील तमिळनाडूला वाचवू शकत नाही. या निवडणुकीत अण्णाद्रमुक आघाडीचा पराभव झाला आणि द्रमुक आणि तमिळ मनिला काँग्रेसची आघाडी सत्तेवर आली. या आघाडीला रजनीकांतचा पाठिंबा होता. 2004 मध्ये रजनीकांत यांनी एनडीएच्या नेतृत्वाखाली आघाडीला पाठिंबा दिला, परंतु यासाठी त्यांनी अट घातली. देशातील पाणीटंचाई संपवण्यासाठी नदी जोड प्रकल्पाची कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन त्यांनी एनडीएकडून घेतले.

2014च्या लोकसभा निवडणुकीत रजनीकांत यांच्या राजकारणात येण्याच्या चर्चेला परत उधाण आले. त्यावेळी पंतप्रधानपदासाठीचे भाजपचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. 31 डिसेंबर 2017 रोजी रजनीकांत यांनी 2021 ची तमिळनाडू विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली. तमिळनाडूच्या सर्व जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली. या निर्णयाने तमिळनाडूच्या राजकारणात खळबळ उडाली. परंतु पुढे काहीच घडले नाही.

2020 मध्ये त्यांनी प्रकृतीचे कारण सांगत राजकीय पक्ष स्थापन करण्यास आपण सक्षम नसल्याचे सांगितले. त्यानंतरही ते राजकारणात सक्रिय होतील, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु 12 जुलै रोजी त्यांनी 25 वर्षांपासूनच्या राजकीय चर्चेला पूर्णविराम दिला. सध्या ते चित्रपट ङ्गअन्नाथेफच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट दिवाळीपर्यंत पडद्यावर येण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या