Monday, May 6, 2024
Homeनगरशिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे

शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे

कोळपेवाडी, शिर्डी |वार्ताहर| Shirdi

दुसर्‍या क्रमांकाचे देवस्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी अखेर कोपरगावचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची तर उपाध्यक्षपदी अ‍ॅड. जगदीश सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंडळाचे पदाधिकारी आणि विश्वस्त अशी 12 जणांची नावे राजपत्र जारी करून जाहीर करण्यात आली आहेत. पाच जणांची नियुक्ती अद्याप करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

विश्वस्तपदी राष्ट्रवादीच्या श्रीरामपूरच्या नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, काँग्रेसचे अविनाश दंडवते, काँग्रेसचे संगमनेर वकील बार संघटनेचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची समर्थक अ‍ॅड. सुहास आहेर, राहुरी येथील साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे, गणेश कारखान्याचे माजी संचालक महेंद्र शेळके, माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, शिवसेनेचे राहुल कणाल, नाशिकचे माजी आमदार जयवंतराव जाधव, यांच्यासह शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांची पदसिध्द विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. यापैकी 12 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची धुरा काँग्रेसच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे या जागांवर कुणाची लॉटरी लागते याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता. त्यामुळे शिर्डी राष्ट्रवादीकडे आले आहे.

35 वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार स्वर्गीय शंकरराव काळे यांचे ते नातू आहेत. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचीही धुरा आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.

शिर्डी येथील साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची मुदत पूर्वीच संपली आहे. मात्र, सत्ता बदलानंतर महाविकास आघाडी सरकारकडून नव्या मंडळाची नियुक्ती करण्यात आली नसल्याने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यामध्ये न्यायालयाने नव्या विश्वस्त मंडळाची नियुक्ती करण्याचे निर्देश सरकारला दिले होते. मधल्या काळात सरकारने राजकीय मेळ घालणारी यादी तयार केली. मात्र, ती अधिकृतपणे जाहीर होण्याआधीच बाहेर आली. त्यामध्ये नियमांचे पालन झाले नसल्याची टीका सुरू झाली. त्यामुळे या यादीला न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता गृहित धरून सरकारने यासंबंधीच्या कायद्यातच काही बदल केले. त्यासाठी न्यायालयाकडून मुदत वाढवून घेण्यात आली होती. काल अचानक गॅझेटद्वारे ही नावे जाहीर करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या