Monday, May 6, 2024
Homeनगरतीनशे वर्षांपूर्वीची हेमाडपंती बारव झाकून उभारले कॉम्प्लेक्स

तीनशे वर्षांपूर्वीची हेमाडपंती बारव झाकून उभारले कॉम्प्लेक्स

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

तालुक्यातील समनापूर येथील कोल्हार- घोटी राज्य महामार्गालगत सुमारे तीनशे वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात बांधलेली हेमाडपंती बांधकाम असलेली बारव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही बारव दुर्लक्षित झाली होती. याचाच गैरफायदा घेत तेथील स्थानिक रहिवासी असलेल्या इसमाने ही ऐतिहासिक बारव झाकून अतिक्रमण करून त्यावरच कॉम्प्लेक्सचे बांधकाम केले. हे अतिक्रमण रोखण्यासाठी काही ग्रामस्थांनी प्रयत्न केले मात्र सदर अतिक्रमण धारकाने त्यांचा विरोध हाणून पाडला. अखेर या अतिक्रमणाविरोधात समस्त ग्रामस्थांनी ग्रामसभेत आवाज उठवत प्रशासनाच्या सहकार्याने हे अतिक्रमण रोखले व ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

याबाबत माहिती अशी की, समनापूर येथील कोल्हा- घोटी राज्य महामार्गालगत उत्तर बाजूने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या काळात हेमाडपंती स्थापत्यशैलीची बारव बांधण्यात आली होती. ही बारव सर्व्हे नंबर 442 सदर मिळकत महाराष्ट्र शासनाच्या नावावर आहे. अनेक दशके या बारवचे पाणी स्थानिक ग्रामस्थ व वाटसरू पित होते. मात्र बदलत्या काळात सोयीसुविधा वाढल्याने या ऐतिहासिक बारवेकडे ग्रामस्थ व प्रशासनाचेही काहिसे दुर्लक्ष झाले. नेमका याचाच गैरफायदा घेत येथील रहिवासी व त्यांच्या नातेवाईकांनी पत्र्याचा आडोसा करून याठिकाणी कॉम्प्लेक्सचे (व्यापारी गाळे) बांधकाम केले.

हे बांधकाम करताना अतिक्रमणधारकाने अतिक्रमण करून ही ऐतिहासिक बारव झाकून टाकत त्यावरच बांधकाम केले. ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या बांधकामाला विरोध केला. मात्र अतिक्रमण धारकाने हा विरोध मोडून काढला. काही जागरूक नागरिकांनी थेट जिल्हाधिकार्‍यांपर्यंत पाठपुरावा करून याविरुद्ध आवाज उठविला. तसेच वेळोवेळी ग्रामसभेत ठराव करून हे अतिक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केले. अखेर ग्रामस्थांच्या प्रखर विरोधामुळे सध्या येथील बांधकाम थांबविण्यात आले आहे.

मात्र या विरुद्ध प्रशासनाने कडक कारवाई करून हे अतिक्रमण हटवावे व सदर इसमावर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ शिवाजी शेरमाळे, संतोष शेरमाळे, देवा शेरमाळे, अशोक चांडे, संदिप शेरमाळे, नितीन शेरमाळे, कृष्णा शेरमाळे, सोमनाथ शेरमाळे, सचिन शेरमाळे, अण्णासाहेब शेरमाळे, सुनिल बलमे, संदीप पोमनर, सागर शेरमाळे, बाजीराव शेरमाळे, दत्तू शेरमाळे, नामदेव शेरमाळे, अरुण चांडे, राहुल बाहूले आदींसह ग्रामस्थांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या