Thursday, May 2, 2024
Homeनगरगोळीबार प्रकरणातील फरार सराईत जेरबंद

गोळीबार प्रकरणातील फरार सराईत जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

शेतकर्‍याच्या शेळ्या चोरून नेताना शेतकर्‍यांनी विरोध केल्यानंतर गोळीबार करून दोन शेतकर्‍यांना जखमी केल्याच्या घटनेतील फरार झालेल्या सराईतास कर्जत पोलिसांनी सहा महिन्यांनंतर उस्मानाबाद येथून जेरबंद केले.

- Advertisement -

करण पंच्याहत्तर काळे असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना 10 एप्रिल 2021 रोजी निंबोडी (ता. कर्जत) येथे घडली होती. येथील शेतकर्‍याची शेळी चोरून घेऊन चोरटे जात असताना शेतकरी व त्याच्या नातेवाईकांनी चोरट्यांचा पाठलाग करून पकडले होते. सुटकेसाठी त्यांनी शेतकर्‍यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून दोन शेतकर्‍याना गंभीर जखमी केले होते.

या प्रकरणी कर्जत पोलिसांनी अमर्‍या दत्तु पवार व करण पंच्याहत्तर काळे यांनी गुन्हा केला असल्याचे निष्पन्न झाल्याने 23 एप्रिल रोजी अमर्‍या उर्फ अमर दत्तू पवार यास (नळी व़डगाव ता. भुम जि. उस्मानाबाद) येथून मोठ्या शिताफीने अटक केली होती. मात्र सराईत करण पंच्याहत्तर काळे पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तेव्हापासून तो फरार होता. काळे हा पाथरुड ता. भूम जि. उस्मानाबाद येथे येणार असल्याच्या गोपनिय माहितीवरून कर्जत पोलिसांनी त्यास शिताफिने अटक केली.

विभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक अमरजित मोरे, कर्मचारी रवींद्र वाघ, शाम जाधव, देविदास पळसे, महादेव कोहक, शाहुराजे तिकटे यांनी ही कामगिरी केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अमरजित मोरे करत आहेत.

सराईत काळे

करण पंचाहत्तर काळे हा सराईत गुन्हेगार असून त्यावर कर्जत पोलीस ठाणे, नगर तालुका पोलीस ठाणे, भूम पोलीस ठाणे, सातारा तालुका पोलीस ठाणे, सातारा तालुका ठाणे, मेंढा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ठिकाणी जीवे मारण्याचा प्रयत्न, लुटमार, जबरी चोरी, दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या