Friday, May 3, 2024
Homeनगरआभासी पद्धतीने मेंटॉरशिप कार्यक्रमास संपूर्ण भारतातून संगमनेर महाविद्यालयाची निवड

आभासी पद्धतीने मेंटॉरशिप कार्यक्रमास संपूर्ण भारतातून संगमनेर महाविद्यालयाची निवड

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

भारत सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्यावतीने आयोजित केेलेल्या मेंटॉरशिप कार्यक्रमांतर्गत संगमनेर महाविद्यालयाची आभासी पद्धतीने मेंटॉरशिप कार्यक्रमास संपूर्ण भारतातून निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील निवडक स्टार महाविद्यालयांना स्टार स्कीमच्या स्ट्रेंथनिंग कंपोनंट अंतर्गत मार्गदर्शन करण्यासाठी निवडण्यात आले.

- Advertisement -

कार्यक्रमाचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह (स्वतंत्र प्रभार) यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी स्टार दर्जा असलेल्या महाविद्यालयांना आमंत्रित करण्यात आले होते. मंत्री महोदयांनी संपूर्ण भारतातील काही निवडक विद्यार्थ्यांशी या विषयावर संवाद साधला. त्यामध्ये भारतातल्या कर्नाटक, पंजाब, दिल्ली, कलकत्ता, महाराष्ट्र अशा विविध राज्यांमधून सात महाविद्यालयांची आभासी पद्धतीने होणार्‍या मेंटॉरशिप कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. या सात महाविद्यालयांमधून संगमनेर महाविद्यालयाची स्नेहल भंडारी हिला आपल्या महाविद्यालयाचे नेतृत्व करण्यासाठी निवडण्यात आले. ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने अत्यंत गौरवशाली अशी आहे. महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष 2019 मध्ये प्रतिष्ठित स्टार स्टेटस बहाल करण्यात आले आहे.

संगमनेर महाविद्यालयातील स्नेहल भंडारी यांना महाविद्यालय योजनेबद्दलचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांचे समवेत आभासी पद्धतीने झालेल्या मेंटॉरशिप कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ग्रामीण पार्श्वभूमी असूनही उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन करणार्‍या आणि स्टार दर्जा प्राप्त करणार्‍या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिला बोलावण्यात आले. स्नेहल भंडारी यांनी आपले विचार आभासी पद्धतीने व्यक्त करताना सांगितले की स्टार योजनेमुळे विशेषत: ग्रामीण पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना अनुभवात्मक शिक्षण, विषयातील प्रगती शोधण्यासाठी, महानगरीय महाविद्यालयांशी स्पर्धा करू शकतील असा आत्मविश्वास निर्माण झाला आणि शेवटी त्यांच्या सर्वांगीण विकासात मदत झाली आहे.

या मेंटॉरशिप कार्यक्रमाच्या आयोजनामागे बायोटेक्नॉलॉजी विभाग, भारत सरकार यांचा मुख्य उद्देश असा आहे की, स्टार महाविद्यालये, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सुधारण्याच्या उद्देशाने सेवा देण्याव्यतिरिक्त, ज्ञानाची मशाल वाहकाची भूमिका देखील स्वीकारतील आणि त्यांचे नेटवर्किंग, हँड होल्डिंग आणि आउटरीच या क्षेत्रात त्यांचे प्रयत्न वाढवतील आणि आकांक्षाविषयक महाविद्यालयांवर विशेष लक्ष केंद्रित करतील. यासाठी मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते आणि सहकार्य वाढविण्यासाठी त्यांनी महाविद्यालयांना स्थानिक शैक्षणिक आणि औद्योगिक आर अ‍ॅण्ड डी युनिट्सशी जोडणे अपेक्षित आहे. बायोटेक्नॉलॉजी विभाग (डीबीटी) पदवी महाविद्यालयांना स्टार कॉलेज योजनेद्वारे पदवीपूर्व विज्ञान शिक्षणाला बळकटी देण्यासाठी प्रगतिशील आहे. संगमनेर कॉलेजला या मार्गदर्शन कार्यक्रमाचा भाग होण्याचा मान मिळाला आहे. या कार्यक्रमाच्या यशाबद्दल शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सचिव डॉ. अनिल राठी, खजिनदार राजकुमार गांधी, जनरल सेक्रेटरी नारायण कलंत्री, व्यवस्थापनातील सदस्य यांनी शुभेछा दिल्या.

महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील सहकारी शिक्षकांच्या मदतीने ‘स्टार कॉलेज योजना’ यशस्वीपणे राबवली जात आहे. या यशामध्ये प्रा. डॉ. आर. एस. लड्ढा, उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. बी. तसिलदार, आयक्यूएसी समन्वयक प्रा. एस. ए. पिंगळे, योजना समन्वयक डॉ. पी. पी. बर्दापूरकर यांच्या विशेष योगदानामुळे ही संधी महाविद्यालयास मिळाली. तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ.व्ही.व्ही.भवरे, डॉ.एस.एन. दळवी, डॉ. एस. डी. जाधव, डॉ. एम. एस. मोरे, विभागीय समन्वयक प्रा. पी. एम. गर्जे, डॉ. डी.एल. गपाले, डॉ. ए. एन. तांबे, प्रा. पी. टी. त्र्यंबके आणि विज्ञान शाखेतील सर्व शिक्षक कर्मचारी यांचा सहभाग व योगदानामुळे डीबीटी स्टार कॉलेज अंतर्गत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविता येत असल्याने प्राचार्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या