Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखमहाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळिमा फासणारे गुन्हे किती काळ?

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळिमा फासणारे गुन्हे किती काळ?

अवैध गर्भपात आणि भ्रूण हत्येच्या प्रकरणाने महाराष्टात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. हे अमानुष प्रकरण नुकतेच उघडकीस आले. या प्रकरणाची उघड झालेली दुसरी बाजूही तितकीच भयंकर आहे. एका अल्पवयीन मुलीवर एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केला होता. पोट दुखत असल्याची तकार मुलीने केली. तिची तपासणी झाल्यानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. बलात्काराचा आरोप असलेल्या मुलाच्या वडिलांनी मुलीच्या घरच्यांना धमकावले. त्यानंतर तिचा डॉ. रेखा कदम यांच्या दवाखान्यात अवैध गर्भपात करण्यात आला असे समजते. यासंदर्भात आर्वी पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या प्रकरणाला वाचा फुटली. पोलिसांनी संबंधित रुग्णालयावर घातलेल्या धाडीत माणसांच्या अंगावर काटा यावा अशा अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. त्या माध्यमांत प्रसिद्धही झाल्या आहेत. अवैध गर्भपाताचे प्रकरण अनेक वर्षांपासून सुरु असणार. संबंधित मुलगी गर्भवती झाली म्हणून या प्रकरणाला पाय फुटले. अन्यथा हा भयंकर प्रकार उघडकीस यायला किती काळ जावा लागला असता आणि किती कोवळे जीव बळी गेले असते कोणास ठाऊक? काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात असेच प्रकरण उघडकीस आले होते. त्या प्रकरणातील गुन्हेगार डॉ. मुंडे दाम्पत्यावर हजारो अवैध गर्भपात केल्याचा आरोप होता. त्यांना सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावली गेली होती. अशी प्रकरणे उघडकीस येतात. तेव्हा खळबळ माजते आणि कालांतराने ती शांतही होते. गुन्हा सिद्ध झाला तर आरोपीला शिक्षा होते. पण तरीही असे गुन्हे घडतच राहातात हे प्रगत महाराष्ट्राचे दुर्दव! वैद्यकीय व्यवसाय सन्मान्य असा उमदा व्यवसाय (नोबेल प्रोफेशन) मानला जातो. लोक डॉक्टरांना देवासमान मानतात. करोना काळात संसर्गाचा सर्वात जास्त धोका असूनही कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांची समाजाने यथोचित दखल घेतली. त्यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले. पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला गेला. अशा या उमद्या व्यवसायाला काळिमा फासणारे काही गणंग अजूनही शिल्लकच आहेत. ज्या हातांनी गरजूना जीवदान द्यायचे ते हात जीव घ्यायला कसे धजावतात? असे बेमुर्वतखोर वर्तन करून उमद्या व्यवसायाला आणि तमाम डॉक्टरांना संशयाच्या घेऱ्यात ढकलतो याची जराही शरम अशा गणंगांना का नसावी? त्यांच्या पापाचे वाटेकरी होणारांनाही याची जाणीव नसावी का? जे असे गुन्हे जाणीवपूर्वक करतात त्यांना सुशिक्षित तरी कसे म्हणावे? अमुक एका डॉक्टरच्या नुसत्या बोलण्याने रुग्ण अर्धा बरा होतो असा विश्वास अनेक डॉक्टरांनी कमावला होता. कमावत आहेत. त्याचीही चाड त्याच व्यवसायातील काहींनी ठेऊ नये? अवैध गर्भपाताची प्रकरणे उघड होतात. समाजाची नीतिमूल्ये घसरत चालली आहेत असे मानावे का? मुलामुलींचे पालकही अंतर्मुख होऊन याचा विचार करतील का? असे गुन्हे बिनभोबाटच घडवले जातात. संबंधित भणंग तशी काळजीही घेतात. पण माणुसकीला आव्हान देणाऱ्या गुन्ह्यांना वर्षानुवर्षे वाचाही फुटू नये? तशी कुजबुजही कोणाच्या कानी पडतच नसेल का? महाराष्ट्राला लाभलेल्या सुधारकी विचारांच्या वारशाचा अभिमान वेळोवेळी व्यक्त केला जात असतो. तथापि तो वारसा पुढे चालू ठेवण्याची जबाबदारी आजच्या समाजावर आहे याचा विसर पडून कसे चालेल? नुसते बोलून वारसा टिकत नसतो याची जाणीव समाजाला होईल का? आर्वी प्रकरणाने असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. याची कारणे जाणते शोधतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या