अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
पुणे शहरातून काही दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या व बुधवारी (दि.19) सुखरुप सापडलेल्या डुग्गू उर्फ स्वर्णव सतीश चव्हाण याच्या मावशीचा नगर जवळ गुरुवारी (दि.20) पहाटे झालेल्या अपघातात मृत्यू झाला तर त्याचे काका व दोन मावस भाऊ जखमी झाले आहेत.
पुण्याच्या बाणेर परिसरातून स्वर्णव चव्हाण उर्फ डुग्गूचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी डुग्गूच्या शोधासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले होते. सोशल मीडियावरून देखील मुलाच्या तपासाबाबत पोलिसांकडून आवाहन करण्यात आले होते. डुग्गूचा शोध सुरू असतानाच अपहरणकर्त्याने काल त्याची सुटका केली. त्यामुळे चव्हाण कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण होते. डुग्गूला पाहण्यासाठी त्याचे नातेवाईक देखील घरी जमले होते. डुग्गू चव्हाण याची पुणे पोलिसांनी बुधवारी (दि.19) अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला भेटण्यासाठी त्याचे नांदेड येथील काका व मावशी त्यांच्या कारने (क्र.एम.एच.12, एन.एल.5772) गुरुवारी (दि.20) पहाटे नगरमार्गे पुण्याकडे जात होते.
त्यांची कार नगर-औरंगाबाद रस्त्यावर इंद्रायणी हॉटेल जवळ आली असता कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला. या अपघातात डुग्गू याची मावशी सुनीता संतोष राठोड (वय 36, रा.कापूस वसाहत केंद्र, नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला. तर डुग्गूचे काका व दोन मावसभाऊ समर राठोड (वय 14) आणि अमन राठोड (वय 6) या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मयत सुनीता राठोड यांचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.