Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखस्वर्गीय सूर आता स्वर्गलोकी!

स्वर्गीय सूर आता स्वर्गलोकी!

गानकोकिळा लता मंगेशकर म्हणजे भारतवर्षाला पडलेले एक स्वरमधूर सूरस्वप्न! चार-पाच दशकांपूर्वी मनोरंजनासाठी आकाशवाणी, चित्रपट, नाटके, लोकनाट्ये आदी हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी माध्यमे होती. रेडिओच्या रूपाने आकाशवाणी त्या काळी घराघरात जाऊन पोहोचली होती. बहुतेक घरात रेडिओ सुरू असला तर त्यावर लतादीदींनी गायलेले गाणे हमखास कानावर पडत असे. कित्येक घरांतील लोकांची पहाट-सकाळ रेडिओवरील लतादीदींच्या स्वरांतील भक्तिगीतांच्या प्रसन्न सुरावटीवर सुरू व्हायची. सायंकाळ भावगीतांत न्हाऊन निघायची तर रात्री सुमधूर गाणी ऐकत लोक निद्राधीन होत. लतादीदींनी गायलेली गीते गुणगुणत अनेक तरुण-तरुणी आपल्या भावविश्वात रममाण होत. किमान तीन-चार पिढ्या त्यांच्या सुरेल स्वरलहरींवर डोलत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. मराठी संगीतकार आणि नाट्य अभिनेते पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या पोटी जन्मलेल्या लतादीदींना गाण्याचे बाळकडू घरातूनच मिळाले. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी त्यांच्या गानकारकिर्दीला सुरूवात झाली. वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबांची जबाबदारी त्यांच्यावर आली, पण न डगमगता ती जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलली. भावंडांनीही त्यांना पूरक साथ दिली. वटवृक्षाच्या सावलीत लहान झाडे सहसा फुलत नाहीत, असे म्हटले जाते. तथापि स्वरलतेच्या मायेच्या सावलीत आशा, उषा, मीना, हृदयनाथ ही भावंडेदेखील संगीत साधनेत पुढे आली. भारतीय संगीत क्षेत्रात मंगेशकर कुटुंबाने अनेक दशके अधिराज्य गाजवले. आजही गाजवत आहे. ७ दशकांच्या गानकारकिर्दीत लतादीदींनी मराठी, हिंदी, तमिळ, बंगाली, सिंहली अशा विविध भाषांमधील ३० हजारांहून जास्त गाणी गायली. ती गाणी गाताना जात, धर्म, भाषा, प्रांत अथवा देश आदी सीमा त्यांच्या स्वराला अडवू शकल्या नाहीत. ही सर्व बंधने झुगारून प्रत्येक संगीत रसिकाच्या जीवनात ‘आनंदाचे डोही आनंद तरंगा’च्या तारा झंकारण्याचे व्रत त्यांनी अंगिकारले. ते आयुष्यभर जपले. भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार असे बरेच पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले. गोड गळ्याइतकेच त्यांचे बोलणेही सुरेल आणि मृदू होते. १९६२ सालच्या चीनविरुद्धच्या युद्धातील पराभवाने सारा भारत निराश झाला होता. देशवासीयांमध्ये पुन्हा आत्मविश्वास जागवण्यासाठी आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एखादे देशभक्ती गीत लिहावे असा विचार कवी प्रदीप यांच्या मनात आला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरताना ‘ए मेरे वतन के लोगों…’ हे गीत त्यांना सुचले. लतादीदींनी ते गावे असे त्यांना वाटत होते, पण गाण्याच्या तयारीसाठी पुरेसा वेळ नसल्याने ते गाणे गाण्यास त्यांनी नकार दिला होता. मात्र कवी प्रदीप यांच्या आग्रहाखातर लतादीदी गाणे गाण्यास राजी झाल्या. १९६३ च्या नवी दिल्लीतील प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सर्वप्रथम त्यांनी हे गाणे गायले. लतादीदींच्या स्वरांतील दर्दभरे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूसुद्धा हेलावून गेले होते, असे सांगतात. हेच गीत पुढे अजरामर झाले. प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते हमखास वाजवले जाते. लता दीदींच्या जादुई आवाजाचाच हा महिमा आहे. मराठी, हिंदी आणि इतर भाषिक चित्रपटांतील नायिका लतादीदींचा मंजूळ स्वर उसणा घेऊन वेगवेगळ्या भावभावनांमधील दृश्यांत रुपेरी पडद्यावर गायल्या, बागडल्या आणि नृत्याविष्काराने गाजल्या. चित्रपटात लतादीदींचाच आवाज मिळावा म्हणून अनेक अभिनेत्री आग्रही असत. अनेक कवी, गीतकार, संगीतकार आणि निर्मात्यांनीदेखील लताजींसोबत सूर-संगीत प्रवास केला. ‘गंगा-जमुना डोळ्यांत उभ्या का…’ या लतादीदींनी गायलेल्या भावगीताने लग्न झालेल्या लेकीला निरोप देणाऱ्या कितीतरी माता-पित्यांना पुनःपुन्हा रडवले आहे. लतादीदींचे मोठेपण वादातीत असले तरी अनेक उदयोन्मुख गायिकांना संगीत क्षेत्रात विहरण्यास पुरेसे अवकाश त्यांच्यामुळे मिळाले नाही, असा आक्षेप घेतला जातो. मात्र त्या आक्षेपांचा त्यांनी कधी बाऊ केला नाही. लतादीदींचा स्वर हा त्यांना मिळालेली दैवी देणगी आहे. त्यांची थोरवी नाकारता येणार नाही. गायनाच्या रूपात ती देणगी रसिकांवर भरभरून उधळण्यात कोणतीही कसर त्यांनी ठेवली नाही हेही तितकेच खरे! गीत-संगीत विश्वात ‘दीदीगिरी’ गाजवणाऱ्या लतादीदींचे सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यही उल्लेखनीय आहे. मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह तसेच पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय या संस्था त्याची साक्ष देतात. लतादीदींच्या स्वरांचा नुसता आशीर्वाद लाभला तरी मोठे कार्य उभे राहते याची प्रचिती मराठी मुलखालाच नव्हे तर साऱ्या भारताला आली आहे. ९ दशकांचा जीवनप्रवास करून हा स्वर्गीय स्वर आता अनंतात विलीन झाला आहे. मात्र गाण्यांच्या रूपाने प्रत्येक रसिकाच्या मनावर लतादीदी तहहयात अधिराज्य गाजवत राहतील. ‘माझे गाणे, एकच माझे नित्याचे गाणे, अक्षय गाणे, अभंग गाणे, गाणे हे गाणे’ असे गात गाण्याची महती सांगणाऱ्या लतादीदींना ‘देशदूत’ परिवाराची विनम्र आदरांजली!

- Advertisment -

ताज्या बातम्या