Monday, May 6, 2024
Homeजळगाव‘वेगळं असं काहितरी’ : सर्वांगसुंदर, विनोदी नाट्याविष्कार!

‘वेगळं असं काहितरी’ : सर्वांगसुंदर, विनोदी नाट्याविष्कार!

अनादी, अनंत काळापासून म्हणजे जेव्हापासून सृष्टी अस्तित्वात आली तेव्हापासून स्त्री-पुरुष संबंधातील नवरा बायकोचं नातं हा सर्वांसाठीच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत तर सामाजिकदृष्ट्या लग्न संस्था आणि लग्न संस्काराला अतिशय महत्व आहे. साध्या-सोप्या भाषेत सांगायचे तर अस म्हणतात की, लग्नगाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर प्रत्यक्षपणे वैवाहिक संस्कार होवून स्त्री-पुरुष नात्याने नवरा-बायको होतात.

प्रारंभीच्या काळात मेड फॉर ईच अदर म्हणणारे पती-पत्नी नात्यातील गोडवा संपल्यानंतर भ्रमनिरास होवून रडगाणे गावू लागतात. तो जोडीदार म्हणून तिला नकोसा होतो तर, त्याला ती बायको म्हणजे सप्तरंगी इंद्रधनुष्य, घरातलं देवासाठी गायलेलं भजन गोड स्वरातलं असे म्हणणारा तो मनातल्या मनात ती बदलली तर असे मांडे खावू लागतो. तिलाही तो कुठे हवा असतो. खरं तर व.पू. म्हणतात त्याप्रमाणे नवरा म्हणजे करंजीच वरच आवरण तर बायको म्हणजे आतील गोड सारणं. हे म्हणायला ठिक आहे हो, पण आपल्या प्रत्येकाला वेगळ काहीतरी हवं असतं. हे वेगळेपण कधी-कधी अफलातून अशा जादुई चमत्कारानेही निर्माण होतं. कोणीतरी सुत्रधाराच्या रुपात भेटतं आणि त्याच्या जवळ असलेल्या पर्सोना (मुखवटा) नामक यंत्रामुळे तो सर्वांना खेळवतो. ती एक अद्भूत शक्तीच असते. चक्क माणुस बदलण्याची दाबलेल्या बटणासोबतचं क्षणार्धात मेकअप, गेटअपसह सर्व पात्रच बदलतात आणि नेमका इथच धोळ सुरु होतो. पर्सोनामुळे म्हणजेच मुखवट्यामुळे हवे असलेले वेगळेपण काही काळ सुखकारक वाटते. परंतू नंतर मात्र स्वतःचा मुळ चेहरा आणि व्यक्तिमत्व प्रत्येकाला हवे असते. या सगळ्या दुष्टचक्रातून एक ज्येष्ठ मानस शास्त्रज्ञ या बदललेल्या पात्रांची सुटका करतो. आणि नात्यांची विण मात्र कायम राहतेय अशी ही तुमच्या-आमच्या जीवनातील वेगळेपणा सांगणारी गोष्ट जळगावातील अनुभवी, संवेदनशिल रंगकर्मी, नाट्यलेखक आणि दिग्दर्शक यांच्या सृजनशिल मनाला भुरळ घालते. आणि मग जन्म होतो तो, स्त्री-पुरुष संबंधातील नवरा-बायकोच नात सांगणार्‍या गंभीर विषयावरील दोन अंकी ‘वेगळं असं काहीतरी’ या नाटकाचा हे नाटक आपल्याला पदरात पडल आणि पवित्र झालं असा सकारात्मक संदेश देते.असो…!

खास हिरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेकरीता ही अगदी नवीकोरी नाट्यसंहिता. या सहज सुंदर, खास विनोदी शैलीत बेतलेल्या नाट्य संहितेचा रंगमंचीय अविष्कार आज रात्री छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात व.वा. जिल्हा सार्वजनिक वाचनालयाने सादर केला. प्राथमिक फेरीच्या अखेरच्या टप्प्यात म्हणजे. लास्ट बटवन असलेला हा नाट्य प्रयोग त्याच्या सादरीकरणा एकूणाक विचार करता, कॉम्पॅक्ट संहितेचा अपेक्षित इम्पॅक्ट, डॉ.हेमंत कुळकर्णी यांचे अनुभव संपन्न, कल्पक दिग्दर्शन जोडीला सर्वच गुणी कलावंतांनी अत्यंत समरसून ताकदीने साकारलेल्या भूमिका, तंत्रज्ञाची कुशल आणि चोख कामगिरी यामुळे कोरोनोत्तर काळात या सर्वांग सुंदर विनोदी नाट्यविष्काराने उपस्थित नाट्य रसिक चांगल्यापैकी सुखावले. व्यावसायिक दर्जाचा नाट्यानुभव दिल्याबद्दल समस्त टीमचे मनस्वी अभिनंदन!

- Advertisement -

प्राथमिक फेरीच्या उत्तरार्धात, अंतीम टप्प्यात सादर झालेल्या आणि आपआपले चेहरे घेवूनच अवघा संसार सुखाचा करा. उगाच मुखवट्यांच्या फंद्यात पडू नका. प्रत्येक वेळेस घोळ निस्तरुन सुटका करण्यासाठी तुमच्या मदतीला डॉ.अरविंद संकर्षण सारखा मानसशास्त्रज्ञ येईलच असे नाही. असा सुखी संसाराचा कानमंत्र देणारे ‘वेगळं असे काहीतरी’ हे नाटक रेकॉर्ड ब्रेक गर्दीत (अगदी हाऊस फुल्लचा बोर्ड लागलेला) सादर झाले.

अभिनयाच्या बाबतीत सुत्रधार बळवंत उर्फ तेजस गायकवाड, लग्नाला 15 वर्ष झालेले आणि जोडीदार बदलू इच्छीत असलेले दाम्पत्य पद्मनाभ देशपांडे (दिपू) मंजुषा भिडे (मालू), दुसरे जोडपे योगेश शुक्ल (श्याम) आणि दिप्ती बारी (सरु) तसेच डॉ.हेमंत कुळकर्णी मानसशास्त्रज्ञ (अरविंद संकर्षण) या सर्वच रंगकर्मींचा रंगमंचावरील वावर अतिशय आत्मविश्वासपुर्वक, प्रत्येकाच्या भूमिकेचे बेअरींगही उत्तम, शिवाय अचुक टायमिंग, चोख पाठांतर यामुळेच सर्वच भूमिका अविस्मरणीय झाल्याय. अचूक पात्र निवड अनुभवी दिग्दर्शक डॉ. कुळकर्णी यांनी स्वतःच्याच नाट्यसंहितेवर केलेले कल्पक आणि तंत्रशुध्द नाट्यसंस्कार यामुळे अगदी प्रारंभापासूनच रसिक मनाची पकडं घेवून हशा आणि टाळ्या वसूल करण्यात हा नाट्यप्रयोग यशस्वी झाला.

तांत्रिक बाबतीत नेपत्थकार सचिन आठारेंनी संहितेबरहूकुम रंगमंचाची केलेली विभागणी, त्यावरची सूचक मांडणी अ‍ॅक्टींग एरियाचा केलेला पुरेपूर वापर यामुळे थेट व्यावसायिक नाटकाचा अनुभव आला. निलेश जगतापांची प्रकाश योजना अतिशय सफाईदार आणि प्रसंगांना उठाव देणारी. हर्षल पवारांची पार्श्वसंगीत योजना सादरीकरणाची गती वाढविणारी तर सुहानी बारींची ध्वनी संकेत योजना प्रसंगांना पोषक ठरली. याशिवाय श्रध्दा पाटील यांची रंगवेषभूषा विविध रंगी भूमिकांत पात्रांना साजेशी व काळसुसंगत. गणेश बारी, श्रेयस शुक्ल यांची रंगमंच व्यवस्था एकदम चोख.

थोडक्यात ए वन प्रोडक्शन, परफेक्ट कास्टींग, कसलेल्या रंगकर्मींचा कसदार अभिनय, डॉ.हेमंत कुळकर्णींची सशक्त, संदेशग्राही नाट्य संहिता त्यांचेच अनुभवी दिग्दर्शन यामुळे एक दर्जेदार वेगवान आणि विनोदी, सर्वांगसुंदर असा नाट्याविष्कार पहावयास मिळाला हे अगदी निर्विवाद…!

आजचे नाटक- फक्त चहा,

युवा ब्रिगेडीयर्स फाऊंडेशन, जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या