Wednesday, May 8, 2024
Homeनगरउन्हाची तीव्र वाढली, प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याकडे दुर्लक्ष

उन्हाची तीव्र वाढली, प्राथमिक शाळांच्या वेळा बदलण्याकडे दुर्लक्ष

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरसह राज्यात वाढत्या तापमानामुळे अंगाची लाही लाही होत आहेत. अशात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळा दिवसभर भरविण्यात येत असून यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटना यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांची वेळ बदलण्याची मागणी होत आहे. लवकरच याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाला निवदेन देण्यात येणार असल्याचे शिक्षक समन्वय समितीकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पारा चढत आहे. नगर जिल्ह्यात देखील तपमानाने 40 अंशाचा टप्पा ओलांडला आहे. येत्या काही दिवसात जिल्ह्यातील उष्णतेची लाट सांगण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे माणसांसह जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांवर पत्राचे छत आहे. वाढत्या तपमानामुळे त्याठिकाणी उकाडा वाढण्याची शक्यता अधिक आहे. अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. दिवसभर शाळा सुरू राहिल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता शिक्षकांमधून व्यक्त होत आहे. सकाळची शाळा झाल्यास विद्यार्थी दुपारी 1 पर्यंत त्यांच्या घरी पोहचू शकतात आणि सुरक्षित राहू शकतात.

नगरच्या जिल्ह्या शेजारी असणार्‍या बीड, सोलापूर आणि नाशिक जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळांच्या वेळा बदलण्यात आलेल्या आहेत. आधीच प्रशासनाने उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शाळांची वेळ बदलण्यास हरकत नाही, असा सूर शिक्षकांमधून आवळण्यात येत आहे. यासाठी सर्व शिक्षक संघटनांची समन्वय समिती लवकरच जिल्हा परिषद प्रशासला भेटणार आहेत. तसेच जिल्ह्यातील 3 हजार 569 झेडपीच्या शाळांची वेळ बदलण्याची मागणी करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. दरवर्षी नगर जिल्ह्यात उन्हाळ्यात शाळांची वेळ बदलण्याकडे प्रशसनाचे दुर्लक्ष होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे असून त्यासाठी शिक्षकांना आवाज उठवण्याची वेळ असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शिक्षण समिती अथवा जिल्हा प्रशासनाने शिक्षक डोळयासमोर न ठेवता ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची अवस्था जाणून घ्यावी. मुळात संघटनांना सकाळच्या शाळेची मागणी करावी लागते हेच दुर्देव्य आहे. प्रशासन स्वत:च असा निर्णय घेऊ शकत नाही का? उष्णतेच्या लाटेत विद्यार्थ्यांची काय हाल होत असेल याची जाणिव शिक्षण व शिक्षकांवर नेहमी बोलणार्‍यांना झाली तर बरं होईल.

– डॉ. संजय कळमकर, शिक्षक नेते.

- Advertisment -

ताज्या बातम्या