Friday, May 3, 2024
Homeनगरनळाला पाणी येत नसल्याने संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन

नळाला पाणी येत नसल्याने संतप्त महिलांचे ठिय्या आंदोलन

कोर्‍हाळे |वार्ताहर| korhale

राहता तालुक्यातील कोर्‍हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकल्याची घटना राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे येथे घडली आहे.

- Advertisement -

ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. त्यावेळी उद्या पाणी सोडू असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र दुसर्‍या दिवशी म्हणजेच 23 मार्च रोजी पाईपलाईन फुटल्याचे कारण देत ग्रामपंचायतीने पाणी सोडले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेतली जात नसल्याने या महिलांनी कोर्‍हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. यातील बहुतांश महिला रोजंदारीने कामाला जातात. मात्र पाण्यासाठी काम सोडून महिला आणि पुरुषांना आंदोलनाची वेळ आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. ग्रामपंचायत फक्त आश्वासने देत असून पाणी विकत घेण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर पाणी उपलब्ध करून द्यावे,अशी मागणी या महिलांनी केली आहे.

कोर्‍हाळे गावासाठी पाणीपुरवठा करणारा साठवण तलाव कॅनॉलला पाणी न आल्याने कोरडाठाक आहे. सध्या तलावाशेजारी असणार्‍या विहिरीतून पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु साठवण तलावावरून गावापर्यंत येणारी पाईपलाईन तीस वर्षे जीर्ण झाली असल्याने कमी-जास्त दाब येऊन फुटत आहे. फुटलेल्या पाईपलाईनचे तात्काळ दुरुस्तीचे काम झाले आहे. तोपर्यंत गावात तात्काळ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 14 कोटी रुपये निधीसाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे लवकरच पाणी प्रश्न मार्गी लागेल. नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच गावातील अंतर्गत गटातटाच्या राजकारणामुळे पाणीप्रश्न चिघळत आहे

– वैशाली थोरात, सरपंच, ग्रामपंचायत कोर्‍हाळे

- Advertisment -

ताज्या बातम्या