Friday, May 3, 2024
Homeनगरराहुरी-वांबोरी रस्त्यावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

राहुरी-वांबोरी रस्त्यावर दरोडेखोरांची टोळी जेरबंद

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी पोलीस पथकाने 17 एप्रिल रोजी मध्यरात्री दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीवर छापा टाकला. त्यावेळी दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांच्या मुसक्या आवळून सुमारे 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर पाचजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

- Advertisement -

दरम्यान, दिवसेंदिवस राहुरी तालुक्यात गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

दि. 17 एप्रिल रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजे दरम्यान पोलिसांना राहुरी वांबोरी रस्त्यावर काही अज्ञात इसम संशयास्पद फिरताना दिसत आहेत, अशी गुप्त खबर मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, हवालदार वाल्मिक पारधी, आजिनाथ पाखरे, होमगार्ड शिंदे आदी पोलीस पथकाने राहुरी ते वांबोरी रस्त्यावर खडांबे शिवारात छापा टाकला. त्यावेळी त्या ठिकाणी आठ अज्ञात इसम दरोड्याच्या तयारीत असलेले दिसले. पोलीस पथकाने क्षणाचाही विलंब न करता त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी तिघा जणांना पकडण्यात यश आले. मात्र, पाचजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

पकडलेल्या तीन दरोडेखोरांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची नावे गणेश गोवर्धन कल्हापुरे, वय 36 वर्षे रा. खडांबे खुर्द, विकास कैलास कुर्‍हे, वय 32 वर्षे रा. वांबोरी ता. राहुरी, तसेच आशपाकअली मोहम्मद शेख रा. आष्टी ता. बीड आणि आशपाकअली शेख याचे इतर पाच साथीदार असे एकूण आठ जण दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली.

यावेळी त्यांच्याकडून मोबाईल, मिरची पूड, नायलॉन दोरी, चाकू, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दोन वाहने त्यात एक विनानंबरची मोटारसायकल व एक एम. एच. 12- बी. जी. – 4355 नंबरची ओमिनी चारचाकी गाडी असा एकूण 5 लाख 45 हजार 310 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

हवालदार सुशांत दिवटे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी गणेश कल्हापुरे, विकास कुर्‍हे, आशपाकअली शेख व इतर पाचजण अशा एकूण आठ जणांवर दरोड्याच्या तयारीत असलेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा हे करीत आहेत. काल त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या