Saturday, May 4, 2024
Homeनगरइंग्रजी माध्यमांच्या तुलनेत जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली- सौ. नाईकवाडी

इंग्रजी माध्यमांच्या तुलनेत जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली- सौ. नाईकवाडी

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जाते. येथील शिक्षक हे शिक्षण क्षेत्रातील बदलत्या प्रवाहात नाविन्यपूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत. खासगी इंग्लिश मीडियम स्कुलच्या तुलनेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली असल्याचे प्रतिपादन अकोलेच्या नगराध्यक्षा सोनालीताई नाईकवाडी यांनी केले.

- Advertisement -

प्राथमिक शिक्षक अकोले तालुका बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने नवोदय प्रवेश पात्र, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव सोहळा प्राथमिक शिक्षक भवनात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा झाला. यावेळी अध्यक्षीय भाषणात सौ. नाईकवाडी बोलत होत्या.

यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, रोटरी क्लबचे संस्थापक अमोल वैद्य, शिक्षक बँकेचे माजी व्हा.चेअरमन बाळासाहेब मुखेकर, पेन्शनर संघटनेचे अध्यक्ष सखाराम आवारी, माजी केंद्रप्रमुख विलास वाकचौरे, नगरसेविका शितल वैद्य, ज्येष्ठ सल्लागार उमाजी बांबळे, सी. के. भांगरे, शिवनाथ वाकचौरे आदींसह गुणवंत विद्यार्थी, आजी-माजी शिक्षक व पालक उपस्थित होते.

सौ. नाईकवाडी यांनी जि. प. शाळेत विद्यार्थ्यांना घडविणे मोठी कसरत असते, नवोदयचा तालुक्यातील एका प्राथ. शाळेचा निकाल 100 टक्के लागतो यावरून शिक्षक आपल्या पाल्याप्रमाणे शाळेत विद्यार्थ्यांना घडवत असल्याबद्दल त्यांनी शिक्षकांचे कौतुक केले.

आ. डॉ. लहामटे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात कंजूशी करू नका, त्यांना भरभरून दाद द्या, त्यांचे कौतुक करायला समाजाने कमी पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्राथ.बहुउद्देशीय संघटनेचे अध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे यांनी संस्थेचा उद्देश स्पष्ट केला. एमपीएससी व युपीएससी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी आमदार निधी मधून अर्थसहाय्य मिळावे तसेच नगरपंचायतने शिक्षक बँकेच्या इमारतीला लावलेला अधिकचा कर कमी करावा. ही संस्था व्यवसायिक नसून बहुउद्देशीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर, प्रा. चंद्रशेखर हासे, कन्या विद्यामंदिरची गुणवंत विद्यार्थिनी कु. प्रांजल धुमाळ, कु. वैष्णवी भांगरे यांची भाषणे झाली.

अकोले तालुक्यातील कळस जि. प. प्राथ.शाळेची विद्यार्थिनी कु. अनन्या सदानंद चव्हाण ही नवोदय परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत सर्वप्रथम आली. याबद्दल तिच्या पालक व मार्गदर्शक शिक्षिका माधवी गोरे- चव्हाण यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविक व स्वागत गोरक्ष देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन व आभार सदानंद चव्हाण यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या