Friday, May 3, 2024
HomeUncategorizedमातृपुजन परंपरा सांगणारा दर्गा

मातृपुजन परंपरा सांगणारा दर्गा

नांदगाव । संजय मोरे | Nandgaon

येथील हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मस्तानी अम्माच्या उर्स उत्सवास दि. 25 मेपासून मिरवणुकीने (Procession) प्रारंभ झाला असून त्यानिमित्त कव्वाली (Qawwali), ऑर्केट्रासह विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. उर्सनिमित्त दररोज दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने दर्गा परिसरास यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

मुस्लिम धर्माची (Muslim religion) सुफी परंपरा (Sufi tradition) असणारे अनेक दरगाह (Dargah) संपूर्ण भारतात (india) आहेत. तेथील मुख्य श्रद्धास्थानी पुरुष रुपातीलच व्यक्ती असते. परंतु स्त्रियांनाही आत्मसन्मान मिळवून देत पुुज्यस्थानी बसविणारा नांदगावचा (nandgaon) मस्तानी अम्मा दर्गा वैशिष्ट्यपूर्ण व स्त्रीमुक्तीचा उद्गाताच म्हटला पाहिजे. भारतीय समाज मातृशक्तीचा, आदिशक्तीचा उपासक आहे. या दर्ग्यातील मातृपुजनाची परंपरा सर्वसामान्यांना भावतेे, म्हणूनच नांदगावचे हे स्थान मुस्लिमांबरोबरच हिंदू बांधवांचेही श्रध्दास्थान ठरले आहे.

परमेश्वराच्या नामस्मरणात पराकोटीची तल्लीनता प्राप्त होऊन सुफियाना अंदाजात ज्याला मस्त किंवा अवलिया म्हटले जाते, अशा अवस्थेत मूळ हैदराबादच्या (Hyderabad) असणार्‍या एका फकीर साध्वीचे भ्रमण करीत नांदगावला आगमन झाले. साईबाबांच्या (sai baba) समकालिन तो काळ होता. फकिरासारखे जीवन जगावे, मिळेल ते खावे आणि प्रभुभक्तीत रममान व्हावे, असा त्यांचा दिनक्रम होता. त्यावेळी लोकांच्या मते त्यांचे वागणे वेडेपणाचे होते. परंतु जेंव्हा साक्षात्कार घडू लागले, तेव्हा त्यांचे मोठेपण लोकांना समजले.

त्या लोकादरास पात्र होऊन ‘मस्तानी अम्मा’ नावाने रुढ झाल्या. त्या काळातले पोलीसपाटील कै. रामचंद्र यशवंत (पा.) काकळीज या सत्शील वैद्यक व ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असलेल्या व्यक्तिमत्त्वाच्या घरी मस्तानीचे जाणे-येणे होतेे. पाटलांना अध्यात्मिक क्षेत्रातील अम्मांचा अधिकार कळला होता. त्यांच्या धर्मपत्नी एखाद्या आईप्रमाणे मस्तानी अम्मांची देखभाल करीत. अगदी त्यांचे केस विंचरण्यापासून वस्त्र धुण्यापर्यंत सेवा करीत. सोनूशेठ गायकवाड यांच्या मातोश्रीही त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष देत.

मस्तानी अम्मा बाजारपेठेत फिरत असताना कोणत्याही दुकानात ज्या वस्तूला हात लावीत किंवा घेत ती वस्तू अग्रक्रमाने विक्री होते, अशी प्रचिती व्यापार्‍यांना आली होती. स्वागत रेस्टॉरंटच्या मिठाई दुकानांतून अम्मा मिठाई उचलत व रस्त्याने चालत स्वतः न खाता कुत्र्यांना खाऊ घालत. आजही दर्ग्याच्या परिसरात विशेषतः दोन काळ्या कुत्र्यांचे अस्तित्व जाणवते. आज नांदगाव पोलीस ठाण्याच्या आवारात मस्तानी अम्माच्या नावाने जो कबुतरखाना आहे, त्या ठिकाणी अम्मा थांबत व तिथेच राहत. तत्कालीन पोलीस अधिकार्‍याला प्रचिती आल्याने त्यांनी अम्मांच्या निर्वाणानंतर त्यांच्या इच्छेनुसार तो कबुतरखाना कायम ठेवला आहे.

त्यामुळे अजुनही पहिल्या संदलचा मान पोलीस ठाण्याला असून महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण आहे. सन 1911 सालापासून आजतागायत दर्ग्यावर पोलीस ठाण्यातर्फे पहिली चादर संदल वाजत गाजत नेली जाते. त्याचबरोबर अम्माच्या इच्छेनुसार पाटील घराण्यामार्फत कै. देवचंद पाटील यांच्या वाड्यातून कबरीसाठी विशेष चंदन शेरणी नेली जाते व त्यानंतर ऊर्स समितीचा संदल होतो. मस्तानी अम्मांच्या हयातीत त्यांनी साक्षात्कार देऊन अनेकांना सन्मार्गाला लावले. आदिव्याधी दूर केल्यात.

‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हा संदेश दिला. सन 1911 साली त्यांनी या नश्वर देहाचा त्याग केला. मनमाड येथील हासिम शेख कच्छी यांनी भव्य दर्ग्याचे निर्माण केले. खान्देशातून भिक्षूंसाठी मजल दरमजल करणार्‍या पै. अब्बास शाह यांना दर्गा दिवाबत्ती व साफसफाईची जबाबदारी देण्यात आली आहे. आजही त्यांची तिसरी पिढी इमानेइतबारे सेवा बजावत आहे. मस्तानी अम्मांची काही वस्त्रे, चीजवस्तू आजही व्यवस्थापनाकडे सुरक्षित आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या