Friday, May 3, 2024
HomeजळगावExclusive # शिवसेनेतील बंड अन् खान्देशातील पडझड!

Exclusive # शिवसेनेतील बंड अन् खान्देशातील पडझड!

हेमंत अलोने

जळगाव ।jalgaon ।

- Advertisement -

एकनाथ शिंदे (Eknath Shinde’s) यांच्या बंडामुळे (rebellion) शिवसेना (Shiv Sena) चांगलीच घायाळ झालेली दिसून येत आहे. याआधी छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांचे बंड शिवसेनेने अनुभवले आहे मात्र या बंडांच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) शिवसेनेचे नेतृत्व करीत होते. त्यामुळे डॅमेज कंट्रोल (Damage control) करणे लगेच शक्य झाले. मात्र बाळासाहेबांनंतर झालेले हे पहिलेच बंड शिवसेनेला सत्तेपासून पायउतार करणार (Stepping down from power) असे दिसते आहे. शिवसेनेत झालेले बंड आणि त्या अनुषंगाने खान्देशात (Khandesh!) झालेली पडझड याचीही आता चर्चा रंगू लागली आहे.

1991 साली छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. तेव्हा त्यांच्यासोबत नऊ आमदार होते. 1990 मध्ये भुजबळ पहिल्यांदाच आमदार झाले होते. विरोधी पक्षनेते पदापासून त्यांना दूर ठेवल्यानंतर भुजबळ यांनी बंड पुकारले होते. भुजबळ यांचे बंड शिवसेनेच्या आयुष्यातील पहिले बंड म्हणून ओळखले जाते.

भुजबळ यांच्यासोबत तेव्हाच्या एरंडोल मतदारसंघाचे आमदार स्व.हरिभाऊ महाजन यांनी शिवसेनेतून पोबारा केला होता. भुजबळांना तत्कालीन काँग्रेस नेते शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये आश्रय दिला होता. भुजबळ काँग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी मध्ये रमले मात्र स्व.हरीभाऊ महाजन यांना मतदारांनी पुढील निवडणुकीत नाकारले होते.

नारायण राणे यांना नगरसेवक, आमदार व मुख्यमंत्रीपदाची संधी बाळासाहेबांनी दिली होती. मात्र उद्धव ठाकरे यांना उत्तराधिकारी नेमले आणि राणे यांनी बंड केले होते. राणे यांच्या बंडाचा खान्देशात फार मोठा परिणाम दिसला नाही. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी आमदार रामकृष्ण दोधा पाटील हे एकमेव राणे यांच्यासोबत काँग्रेसमध्ये गेले होते.

2005 सालीच शिवसेनेत भाऊबंदकी पाहायला मिळाली. राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केली. राज ठाकरे यांच्या बंडालाही खान्देशातून फार काही गळाला लागले नाही. तत्कालीन आमदार गुलाबराव पाटील राज ठाकरे यांच्या भेटीला नाशिक मुक्कामी गेले होते असे सांगितले जाते. मात्र ते राज यांच्यासोबत थांबले नाहीत. शिवसेनेचे विधान परिषदेतील माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर हेच एकमेव राज यांच्यासोबत गेले होते व आजतागायत ते सोबत आहेत.

भुजबळ यांच्यासोबत एरंडोलचे आमदार स्व.हरिभाऊ महाजन, राणे यांच्यासोबत शिंदखेडाचे माजी आमदार रामकृष्ण पाटील व राज यांच्यासोबत शिवसेनेचे माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर एवढीच काय ती पडझड शिवसेनेतील बंडामुळे खान्देशात पाहायला मिळाली होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे खान्देशातही शिवसेनेत मोठी हानी पाहायला मिळत आहे.

पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील, पाचोरा-भडगावचे आमदार किशोरआप्पा पाटील. चोपड्याच्या आ. सौ. लता सोनवणे शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत. सौ.लता सोनवणे या तूर्त शिवसेनेसोबतच राहतील असे त्यांचे पती प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी सकाळी देशदूतला सांगितले होते. मात्र शिंदेंसोबत असलेल्या आमदारांचे छायाचित्र रात्री उशिरा माध्यमांत आले. त्यात सौै.सोनवणे दिसत आहेत. धुळे जिल्ह्यातील साक्री येथील शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदार सौ.मंजुळा गावित यादेखील सध्या तरी नॉट रिचेबल आहेत.

हे चौघे आमदार स्वगृही न परतल्यास खान्देशातील शिवसेनेत मोठा स्फोट होणार आहे. हे बंड यशस्वी झाल्यास आणखी काही जण शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे. चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. मात्र स्थानिक पातळीवर विश्वासात घेतले जात नसल्याची त्यांची खंत आहे. त्यांना विचारात न घेता सरळ त्यांच्याच तालुक्यातील जिल्हाप्रमुख नेमून शिवसेना नेतृत्वाने चिमणराव आबांना डिवचले होते.

पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या कार्यपद्धती बाबत तक्रारी करूनही श्रेष्ठींकडून दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे चिमणरावआबा अस्वस्थ होते. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे चिमणराव यांच्या अस्वस्थतेला वाट सापडली आहे. असाच काहीसा प्रकार हा किशोर आप्पा पाटील यांच्या बाबतीत आहे. किशोर पाटील यांच्या मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे.

दोन ते तीन वेळा शिंदे यांनी पाचोरा भडगाव मतदारसंघात सार्वजनिक कार्यक्रम घेतले आहेत. किशोरआप्पा देखील पालकमंत्र्यांवर नाराज होते. शिंदेंच्या बंडामुळे किशोरआप्पांच्या नाराजीला बळ मिळाले आहे.

साक्री येथील अपक्ष आमदार मंजुळा गावित या काल रात्री उशिरापर्यंत विधान परिषदेत निवडून आलेल्या आमशा पाडवी यांच्यासोबत होत्या. त्या सध्या नॉट रिचेबल आहेत. मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील हे कट्टर शिवसैनिक आहेत.

त्यामुळे सध्यातरी या बंडाला ते साथ देतील असे वाटत नाही. मात्र एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादीतील पुनर्वसनामुळे आ.चंद्रकांत पाटील यांचे भविष्यातील राजकीय गणित प्रभावित होऊ शकते. खडसेंविरोधातील लढाईत शिवसेना नेतृत्वाने बळ दिले नाही तर भविष्यात चंद्रकांत पाटील यांनीही काही वेगळी भूमिका घेतल्यास आश्चर्य वाटायला नको.

खान्देश कनेक्शन!

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीत खान्देश कनेक्शन प्रकर्षाने दिसून आले. एकतर शिंदेंसोबत जिल्ह्यातील आ. चिमणराव पाटील, आ. किशोरआप्पा पाटील यांनीही बंडाचे निशान फडकावले. धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार सौ. मंजुळा गावित या देखील शिंदे यांच्या बंडात सहभागी असल्याची चर्चा आहे. ज्या सुरतमध्ये बंडखोरांनी रात्र आणि दिवस घालविला त्या सुरतचे भाजपाचे खासदार सी.आर.पाटील हे जळगावचे सुपूत्र आहेत. गुजराथच्या हद्दीत प्रवेश केल्यापासून बंडखोरांना मिळालेले पोलिस संरक्षण, हॉटेलात ठेवलेली बडदास्त सी.आर. पाटील यांच्या प्रभावाशिवाय शक्यच नसल्याचे बोलले जाते. शिवाय फडणविसांचे संकटमोचक जामनेरचे आ. गिरीश महाजन हे देखील गुजरातमध्ये पोहोचल्याच्या बातम्या पसरल्या. एकूणच या बंडात खान्देश कनेक्शन दिसून आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या