Friday, May 3, 2024
Homeशब्दगंधमाध्यम चांगले; प्रश्न वापराचा

माध्यम चांगले; प्रश्न वापराचा

आजच्या गतिमान युगात लोकांना एकमेकांच्या जवळ आणण्यात सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे. परंतु त्याचा वापर हिंसाचार, अफवा पसरवणे आणि तत्सम देशविरोधी आणि समाजविरोधी कृत्ये करण्यासाठी होतो. सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारनेही अनेक पावले उचलली आहेत. परंतु यादिशेने बरेच काही व्हायचे बाकी आहे. कारण सोशल मीडियाच्या क्षेत्रात दररोज वेगवेगळी, नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत.

भारत हा विविधतेचा देश मानला जातो. पण देशात सोशल मीडियाचा वापर आणि गैरवापराचे घातक परिणाम इतक्या झपाट्याने समोर येत आहेत की त्यावर लक्ष ठेवून गैरप्रकार करणार्‍यांवर वेळीच कारवाई करण्याची गरज वाढत आहे. सोशल मीडियावर सध्या फायद्यापेक्षा नुकसान होईल, अशीच चर्चा होत आहे. अलीकडच्या अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, सोशल मीडियाचा सामान्य व्यक्तींच्या जीवनावर शारीरिक आणि मानसिक परिणामही होतो. सध्या जवळपास प्रत्येक व्यक्ती इंटरनेटच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या सोशल नेटवर्किंग साईटशी जोडली गेली आहे. सोशल मीडियाने ज्या वेगाने लोकांच्या जीवनात प्रवेश केला आहे, त्याचे दुष्परिणामही त्याच वेगाने समोर येत आहेत.

भारत ही खूप मोठी बाजारपेठ आहे आणि भारताची सरासरी लोकसंख्या गरीब असूनही देशात व्हॉटस्अ‍ॅपचे 53 दशलक्ष, फेसबुकचे 41 दशलक्ष, यूट्यूबचे 448 दशलक्ष, इन्स्टाग्रामचे सुमारे 21 कोटी तर ट्विटरचे 1.75 कोटी वापरकर्ते आहेत.

- Advertisement -

पण याच माध्यमाचा वापर दहशतवादीही तितक्याच प्रभावीपणे करतात हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. देशात जिथे जिथे हिंसाचार घडतो तिथे परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत इंटरनेट सेवा अनेकदा बंद केली जाते, जेणेकरून अफवांना बळ मिळू नये. अशा परिस्थितीत देशाची सामाजिक जडणघडण कायम राखणे हे मोठे आव्हान बनले आहे. सोशल मीडियाचा गैरवापर थांबवण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. उत्तर प्रदेश आणि देशातील इतर अनेक शहरांमध्ये यापूर्वी झालेल्या हिंसक आंदोलनांमध्ये सोशल मीडिया वापराची नकारात्मक भूमिका समोर आली आहे.

सोशल मीडियाचा भरपूर वापर करणार्‍या मुलांना सकाळी उठल्याबरोबर आणि रात्री झोपण्यापूर्वी या साईटस् पाहण्याची सवय लागली आहे. ज्ञान वाढवणे, लोकांशी संवाद राखणे यासह सर्वच विषयांत या व्यासपीठाने चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत, यात शंकाच नाही. त्यामुळे नाईलाज म्हणा किंवा काळाची गरज म्हणा, पण त्याचा वापर टाळणे अशक्य झाले आहे. परंतु आपली मुले जेव्हा त्यात अडकतात तेव्हा समस्या निर्माण होतात. मुले अशाप्रकारे या जाळ्यात गुरफटून जातात जणूकाही त्यांना सोशल मीडियाचे व्यसनच लागले आहे. या प्रभावामुळे सोशल मीडियाचा अतिवापर आणि त्यामुळे होणारे मानसिक दुष्परिणाम यांच्या बातम्या सतत येत आहेत.

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, जी मुले सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर करतात त्यांच्या मनात जीवनाबद्दल अधिक असंतोष असतो. मुलांना सोशल मीडियावर लोकांना पाहण्याची इतकी सवय होते की ते आपल्या पालकांकडून भलत्यासलत्या गोष्टींची मागणी करू लागतात. तासन्तास ऑनलाईन राहण्याच्या या सवयीमुळे मुलांना त्यांचे छंद जोपासायला किंवा आत्मपरीक्षण करायलाही वेळ मिळत नाही. मुलांवर ताण येत आहे. या तणावामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व, वागणूक, विचार आणि करिअर या सर्वांवरच दुष्परिणाम होत आहेत. लहान मुलेही अनेक प्रकारच्या नैराश्याचे आणि गुन्हेगारीचे बळी ठरू लागली आहेत. या प्रकरणांमध्ये बहुतेक पालकांना एखादी अप्रिय घटना घडल्यावरच माहिती मिळते.

सोशल मीडियाच्या मर्यादित वापरातून फायदेही मिळू शकतात. सोशल मीडियाच्या मर्यादित वापरामुळे समवयस्कांशी जलद आणि चांगले संबंध प्रस्थापित करणे शक्य झाले आहे. सोशल मीडियावरून आवश्यक माहिती देणे किंवा घेणे सोपे झाले आहे. सोशल मीडियावरून अभ्यासाचे साहित्य शेअर करण्याची सोय आहे. तसेच सोशल मीडियामुळे मिळणारी कौशल्ये भविष्यात उपयुक्त ठरू शकतात. तंत्रज्ञान आणि गॅझेटस्ची माहिती सोशल मीडियावरून मिळवली पाहिजे. सोशल मीडियावरून प्रोफाईल, डिझाईन आणि नेटवर्किंग कौशल्ये शिकता येतात. सोशल मीडिया सर्जनशील शौकिनांना त्वरित अभिप्राय मिळवून देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करतो. सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया हे प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे.

सोशल मीडिया नावाचे हे अस्त्र सामान्य लोकांच्या हाती आले असून येत्या काळात त्याची मारक शक्ती आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत त्याचा गैरवापर रोखण्यासाठी व्यवस्था करावी लागेल. अडचण अशी आहे की, हे शस्त्र समाजकंटकांकडून जितके वापरले जाण्याची शक्यता आहे तितकाच धोका त्याला राजकीय पक्षांकडून आहे. पक्षांकडून त्यांच्या संकुचित हितसंबंधांसाठी त्याचा लोकशाहीविरोधी मार्गाने वापर केला जाण्याची शक्यता आहे.

तरुणांमध्ये नैराश्याच्या वाढत्या प्रमाणामागील एक कारण म्हणजे या वयातील लोकांचा सोशल मीडियावर अधिक वेळ जातो. अस्सल, माहितीपूर्ण आणि तार्किक म्हणता येईल असे फार थोडे विषय असतील, पण भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज पोर्टल इत्यादींसाठी कोणतीही जबाबदारीविषयक संहिता अस्तित्वात नाही. यामुळे अनेक मर्यादा आधीच ओलांडल्या गेल्या आहेत. श्रद्धांची खिल्ली उडवली जाते आणि संबंधित व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा घोष करत राहते. अभिव्यक्ती स्वातंत्र्यही अमर्यादित नसते, असे सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे.

सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी सरकारनेही अनेक पावले उचलली आहेत. परंतु यादिशेने बरेच काही व्हायचे बाकी आहे. कारण सोशल मीडियाच्या क्षेत्रात दररोज वेगवेगळी, नवनवीन आव्हाने उभी राहत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या