Thursday, May 2, 2024
Homeनगरकर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या अध्यक्षपदी आशुतोष काळे तर उपाध्यक्ष बोरनारे बिनविरोध

कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या अध्यक्षपदी आशुतोष काळे तर उपाध्यक्ष बोरनारे बिनविरोध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

आशिया खंडात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व सहकाराची पंढरी असणार्‍या अहमदनगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ना. आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दिलीपराव आनंदराव बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र घुमरे यांनी मांडली. या सूचनेस अनिल कदम यांनी अनुमोदन दिले. तसेच उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना सूर्यभान कोळपे यांनी मांडली. त्यास प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदी ना. काळे यांची व उपाध्यक्षपदी श्री. बोरनारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी जाहीर केले.

निवडीनंतर आशुतोष काळे म्हणाले, मागील पाच वर्षापासून कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याची जबाबदारी पार पाडत असताना तोट्यात असणारा कारखाना सभासद व संचालक मंडळाच्या सहकार्याने नफ्यात आणला. त्याचबरोबर सभासदांच्या हिताचे निर्णय घेवून जिल्ह्यात उसाला एफआरपी पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

मागील काही वर्षापासून अतिरिक्त उसाचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्यामुळे मागील संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेतले असून हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे 2022-23 चा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून सुरु होणार आहे.

निसर्गाचा लहरीपणा आणि साखर धंद्याविषयी असलेली अनिश्चितता यामुळे साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने आहेत. परंतु सहकाराची जपवणूक करताना सभासद हित डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार शंकरराव काळे साहेब यांच्या आशीर्वादाने कारखान्याच्या प्रगतीसाठी माझी बांधिलकी कायम राहील. माझ्यावर पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने संचालकांनी आणि सभासदांनी टाकलेली जबाबदारी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडून या कामधेनुच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हिताचाच विचार होईल, अशी ग्वाही दिली.

यावेळी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांचेसह नवनिर्वाचित संचालक राजेंद्र घुमरे, सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, अशोक मवाळ, शंकरराव चव्हाण, मनोज जगझाप (माळी), शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, दिनार कुदळे, प्रवीण शिंदे, डॉ. मच्छिंद्रनाथ बर्डे, वत्सलाबाई सुरेश जाधव, इंदुबाई विष्णू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

माझ्यावर कोपरगाव विधानसभा मतदार संघाची जबाबदारी असून ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत असतांना पुन्हा एकदा कर्मवीर काळे कारखान्याची जबाबदारी सभासद व संचालक मंडळाने मोठ्या विश्वासाने दिली आहे. काटकसर करून सहकारी साखर कारखानदारी चालविली तरच शेतकर्‍यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकार टिकेल व शेतकरी समृद्ध होईल, अशी कर्मवीर शंकरराव काळे यांची उदात्त विचारसरणी होती. ती विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सभासद हित व कारखान्याबरोबरच उद्योग समुहाची सर्वांगीण प्रगती हा संचालक मंडळाचा मुख्य अजेंडा राहील. आपला कारखाना सर्वच बाबतीत आजही जिल्ह्यात आघाडीवर असून सभासद व शेतकरी यांच्याबरोबरच सर्वच घटकांचे हित जोपासत असतांना कारखाना प्रगतीच्या दिशेने वेगाने घोडदौड करीत असून हि परंपरा यापुढेही अशीच सुरु राहील.

– ना. आशुतोष काळे

- Advertisment -

ताज्या बातम्या